कोविड विषाणू : नवा ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंट

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर.

कोविड-१९ हा रोग निर्माण करणारा सार्स-कोव्ह-२ विषाणू (व्हायरस) हा एक आरएनए जातीचा विषाणू आहे.

हे विषाणू आपल्या प्रतिकृती (कॉपी) तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रेरकांमधील (एन्झाइममधील) दोषांमुळे सतत बदलत असतात, ज्याला आपण जनुक-बदल किंवा म्यूटेशन म्हणतो. मूळ ‘वूहान’ विषाणूंच्या तुलनेत, सध्या अमेरिकेत आणि जगातही वेगाने पसरणाऱ्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणू-विकारामध्ये (व्हेरियंट) सुमारे ५० फेरफार (म्यूटेशन्स) आहेत, आणि त्यातले ३६ हे केवळ त्याच्या मानवी पेशींत प्रवेशासाठी वापरात येणाऱ्या काटेरी "एस" या प्रथिनांत आहेत, जे विषाणूच्या बाह्य पृष्ठभागावर असते.

लस (वॅक्सीन) किंवा संसर्गातून (इन्फेक्शन) निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे (इम्युनिटी) दोन भाग पडतात - प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) आणि टी पेशी (टी सेल्स, रक्तातील प्रतिकारक्षम पांढऱ्या पेशींचा एक प्रकार). विषाणू आपल्या पृष्ठभागावरील ‘एस’ प्रथिन ‘किल्ली’सारखे वापरून मानवी पेशीत घुसतो. या प्रथिनाविरुद्धची मानवनिर्मित प्रतिद्रव्ये या प्रक्रियेला प्रतिबंध करतात, पण ओमायक्रॉनचे हे बाह्यप्रथिन बरेच बदलल्यामुळे प्रतिद्रव्यांची परिणामकारकता पुष्कळच कमी झालेली दिसते. त्यामुळे लशीच्या दोन मात्रा (डोसेस) घेतलेल्यांमध्येही संसर्ग होताना आढळतो. फायझर कंपनीने तयार केलेल्या लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांमध्ये ही परिणामकारकता २५ टक्केच असल्याचे दिसते. तिसरी मात्रा (बूस्टर डोस) घेतल्यास ती ७५ टक्क्यांपर्यंत वर जाऊ शकते असे दिसते. त्यामुळे अमेरिकन सरकारने लोकांना तिसरी मात्रा देणे वेगाने सुरु केले आहे, ती जरूर घ्यावी.

विषाणूबाधित (व्हायरस-इन्फेक्टेड) मानवी पेशी नष्ट करण्याचे जे काम टी पेशी करतात, त्याची परिणामकारकता मात्र ओमायक्रॉनविरुद्धही चांगली टिकून दिसते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे, हा एक चांगला भाग. ओमायक्रॉन विषाणू मुख्यतः श्वसनसंस्थेच्या वरच्या भागांना बाधित करतो असे दिसते. त्यामुळे घशाची खवखव, खोकला, सर्दी ही लक्षणे दिसतात, पण खाली फुफ्फुसात विषाणू घुसल्यामुळे होणारा न्यूमोनिया फार कमी दिसतो. त्यामुळे रुग्णालयांमध्ये व्हेन्टिलेटर्स वापरावा लागण्याचे प्रमाणही अगदी कमी दिसते.

कोविड झालेल्या रोग्यांमध्ये अमेरिकन एफडीएने नुकतीच मान्यता दिलेल्या ह्या दोन औषधांनी पुढील पातळीवरची परिणामकारकता दाखविली आहे:

मोलनूपिराव्हीर (मर्क ): ३०% (मात्र गरोदर स्त्रियांनी हे औषध घेऊ नये.)

पॅक्सलोव्हिड (फायझर) : ८९% :

ही दोन्ही औषधे ओमायक्रॉनवर लागू पडण्यात काही अडचण दिसत नाही.

ओमायक्रॉन खूपच अधिक संसर्गकारी आहे (ओमायक्रॉनबाधित होणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण दर दोन दिवसाला दुप्पट होत आहे). यामुळे मास्क, शारीरिक अंतर ठेवणे आणि गर्दी टाळणे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बदललेल्या त्रिमिती रचनेमुळे हा विषाणू जुन्या शीघ्र प्रतिजन चाचणीला (रॅपिड अँटीजेन टेस्ट) प्रतिसाद देत नाही असे दिसते. त्यामुळे ‘फसवे नकार’ दाखवणारे निकाल ("फॉल्स निगेटिव्ह" रिझल्ट्स) येत आहेत. त्यामुळे करोनाबाधित व्यक्ती सामूहिक समारंभात सहभागी होऊन त्यांद्वारे विषाणूचा प्रसार वाढत जाऊ शकतो.

अमेरिकेत मुलांमध्ये विषाणूचा संसर्ग वाढत आहे. दररोज सुमारे ८००च्या घरात मुले रुग्णालयांत दाखल होत आहेत. रोगाच्या तीव्रतेबद्दल अजून भाष्य आलेले नाही. अमेरिकेत ५ ते १८ वयाच्या मुलांसाठी लस उपलब्ध आहे. (प्रौढांच्या एक-तुतीयांश मात्रा), पण काही पालकांचा विरोध असल्यामुळे जेमतेम १६ टक्के मुलांनी ती घेतली आहे. रुग्णालयांत दाखल झालेली बहुतांश मुले लस न घेतलेली आहेत असे दिसते. २ ते ५ वयोगटातल्या मुलांची फायझर लशीची चाचणी नुकतीच अयशस्वी ठरली (प्रौढांच्या एक दशांश मात्रा)- यात पुरेशी प्रतिद्रव्ये (अँटीबॉडी) मिळाली नाहीत. खास ओमायक्रॉनसाठी बनवलेली लस आम्ही मार्चपर्यंत आणू शकू असे फायझरने म्हटले आहे.

जग सावधानतेने या नव्या व्हेरियंटकडे पाहत आहे, पण आपल्या हातात आता नवनवीन साधनेही आहेत.
सर्व ज्ञात खबरदाऱ्या चालू ठेवणे सर्वांच्या हिताचे ठरेल.



Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय