दिवाळीचा फराळ आणि आठवणी

पद्मा लोटके

ऑक्टोबर महिना आला आणि थंडी पडायला लागली की दिवाळीच्या आठवणी दाटून येतात. कोजागरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या एकादशीला आकाशदिवा लावला की दिवाळीची लगबग सुरु व्हायची. कॅनडाला आल्यावर सुरुवातीला बरीच वर्षं फराळ स्वतः घरीच बनवायचे.

काही वर्षांनी मात्र कोणी घरगुती फराळ विकत आहे का याची चौकशी केली. मैत्रिणीकडून एक कॉन्टॅक्ट नंबर मिळाला आणि फराळ मागावला. आठ दिवसांनी फराळ तयार असून घ्यायला या असा मेसेज आला. आम्ही सर्वच निघालो फराळ आणायला. तो घरी आणेपर्यंत कोणालाच वाट बघायची इच्छा नव्हती. फराळ घेतला आणि गाडीत येऊन बसलो. कोणाला काय आवडते त्या नुसार पुडे उघडले. मुलगा चिवडा, तर नवरा चकली खाण्यात दंग झाला. करंजी माझी आवडती. इथे करंजी घरी केली तरच खायला मिळते. दुकानात सहसा नाही मिळत. करंजी खायला सुरुवात केली आणि मी रडायला लागले. माझे हमसून हमसून रडणे बघून नवरोजींची घाबरगुंडी उडाली. "काय होतंय तुला? करंजीमुळे काही त्रास होतोय का?" "नाही. मला आईची आठवण येतीये," हे ऐकून तो हसायला लागला. लहानपणी दिवाळीत करंज्या नेहमी शेवटी करायची आई. सगळ्यांना सुट्ट्या लागल्यावर. म्हणजे कोणी लाटी करून देई, कोणी बाकुर भरून देई आणि आई करंज्या तळे. मग करंज्या जर फुटत असतील तर काय करायला हवं याबद्दल ती सूचना देऊन नीट करून घेई. चकल्यांसाठी लागणारे भाजणीचे पीठ निदान दोन वेळा दळून आणावे लागे. चकल्या सगळ्यांच्या आवडत्या. तीच गत अनरशांची.

त्यावेळी क्रिकेटच्या महत्त्वाच्या मॅचेस नेमक्या दिवाळीच्या दिवशी यायच्या. त्यातून शारजामध्ये आणि भारत विरुद्व पाकिस्तान मॅच असेल तर विचारायलाच नको. सगळे फराळ बनवायचे सामान घेऊन टीव्हीसमोर बसायचो. आपण हरलो तर फटाके कसे वाजवावे असा प्रश्न पडायचा! मॅच नसेल तर मराठी सिनेमा ‘धुमधडाका’ नक्की लागायचा टीव्हीवर. मग काय सिनेमा बघता बघता उरलेली कामे आटोपतांना खूप मजा यायची. मग संध्याकाळी अंगणात सडा टाकून रांगोळी काढायची. एकादशीला लावलेला आकाशदिवा रांगोळीच्या सोबतीला असायचाच. हा आकाशदिवा वर्षानुवर्षं नीट जपून ठेवलेला असायचा.


ह्यानंतर सगळे स्वतःचे आवरायला घ्यायचे. खास दिवाळीसाठी आणलेला ड्रेस घालायचा. आई तिचा शालू नेसायची आणि तिची खास नथ व दागिने घालून तयार व्हायची तेंव्हा ती खरेच लक्ष्मी असल्यासारखी भासायची. आम्ही वडिलांसोबत जाऊन आणलेले फटाके बाहेर काढून ठेवायचो. आधी लक्ष्मीपूजन व्हायचे आणि त्यानंतरच ते फटाके आमच्या ताब्यात येत असत. पूजेनंतर फटाके उडवून झाले की घराजवळ असलेल्या गणपतीच्या दर्शनाला जाऊन यायचो. मग घरी आल्यावर पुरणपोळीवर ताव मारायचा. दोन दिवस पहाटे उठल्यामुळे डोळ्यांत झोप साठलेली असायची. सगळे आवरून झाले की कधी एकदा अंथरुणे घालून झोपू असे होऊन जायचे. दिवाळीचा दुसरा आणि तिसरा दिवस कधी एकदा जातो असे व्हायचे, कारण भाऊबीजेला मामा, मामेभाऊ-बहीण येणार असत. आजीने पाठवलेला फराळ येणार असायचा.

अशा पद्धतीने भारतातील आमची दिवाळी साजरी व्हायची. भरपूर सुंदर आठवणी साठवून शाळा कधी सुरु व्हायची कळायचेसुद्धा नाही.


Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय