सिद्दी (ला) जोहार

बाळकृष्ण पाडळकर

सध्या वास्तव्य ट्रॉय, मिशिगन येथे.

डिसेंबर, २०२१मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये श्री. पाडळकरांच्या 'कथेकरी या पुस्तकाचे विमोचन श्री. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक नाशिकच्या सुप्रसिद्ध दिशोत्तमा प्रकाशन यांनी प्रकाशित केले. यापूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'कथनी' या कथा संग्रहाबरोबर 'कथेकरी' ग्रंथ विक्रीस उपलब्ध होता. वाचकांनी दोन्ही ग्रंथांना पसंती दर्शवून त्यांच्या प्रति विकत घेतल्या.

सीताराम सिद्दी त्याच्या कॉलेजच्या मित्रांबरोबर सहलीला आला होता. त्याच्या सोबत त्याच्या वर्गातले दहा-बारा मित्र आणि एक प्राध्यापकही होते.

विभूती धबधबा आणि त्याच्या जवळपासचा परिसर पायी तुडवून सिद्दीची सहल दोन दिवसानंतर परत माघारी फिरणार होती. धबधब्याला लागून असलेल्या दांडेली जंगलामध्येही त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांचा फेरफटका मारण्याचा इरादा होता. विभूती, त्याचे मित्र धबधब्याच्या माथ्यावर असलेल्या सरकारी टुरिस्ट रिसॉर्टमध्ये मुक्कामाला थांबले होते. सीताराम सिद्दी यापूर्वी कॉलेजच्या कोणत्याही सहलीला गेला नव्हता. या वर्षाअखेर त्याचे शिक्षण संपून तो आर्टस्-सायन्स कॉलेज, कारवारचा निरोप घेणार होता.

टुरिस्ट रिसॉर्टमधील एका मोठ्या हॉलमध्ये सगळे विद्यार्थी जेवणाच्या टेबलाभोवती बसले होते. सीताराम त्याच्या एका मित्राबरोबर व्हरांड्यात गप्पा मारीत होता. त्याच्या मित्रांपैकी एकाने त्याला हॉलमधून जोराने हाक मारली,”ए काळुराम आफ्रिकन, जेवायला आत ये.“ त्यासरशी सीताराम आणि त्याचा मित्र आत आले. पुन्हा त्या मित्राने सीतारामकडे पाहून म्हंटले,“याला जरा कमी ऐकायला येते का ? आम्ही तुला दोन आरोळ्या दिल्या, एवढा काय गप्पात दंग झाला होता?”यावर सीताराम काही बोलला नाही. मित्राकडे पाहून तो गालांतल्या गालांत हसला. मघाचा मित्र त्याला पुन्हा खवचटपणे म्हणाला,“सीताराम,तू खरंच आफ्रिकेतल्या लोकांप्रमाणे एवढा काळाकुट्ट कसा काय निपजला रे?” यावर सीताराम थोडीशीही नाराजी न दाखवता त्याला म्हणाला,“अरे! मी खरोखरच आफ्रिकन आहे, म्हणून तर मी एवढा काळाकुट्ट आहे आणि डोक्यावर कुरळे केसही आहेत.“ यावर कोणी काही बोलले नाही, पण तो मघाचा मित्र म्हणाला, “कसे काय?” सीताराम म्हणाला, “मी काळा असण्यामागे आणि आफ्रिकन दिसण्यामागे फार मोठा इतिहास आहे. आपली सगळ्यांची जेवणं झाली म्हणजे मी तो इतिहास तुम्हाला सांगेन.“ यावर बहुतेकांनी होकार दिला.

जेवणे आटोपल्यावर बाहेरून येणाऱ्या थंडगार वाऱ्याचा आस्वाद घेण्यासाठी प्राध्यापकांसह सगळे व्हरांड्यात बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर सीतारामच्या मित्राने त्याला तो सांगणार असलेला इतिहास कथन करायला सांगितले. सीताराम तयारच होता, त्याने घसा साफ केला. सगळे जण त्याचा इतिहास ऐकण्यासाठी सावरून बसले. प्राध्यापकांशेजारी सीताराम बसला होता, त्याने बोलायला सुरवात केली. “जवळपास चार-पाचशे वर्षांपूर्वीचा काळ असावा, त्यावेळी भारतात बऱ्याच ठिकाणी छोटी मोठी संस्थाने अस्तित्वात होती. त्या संस्थानांचे आपापसात नेहमी काही ना काही कारणांमुळे युद्ध होत असे. युद्धामध्ये बरेच सैनिक कामी येत असल्यामुळे संस्थानांना सैनिकांची कमी भासे. यावर तोडगा म्हणून काही संस्थानांनी दक्षिण पूर्व आफ्रिकेमधून हबशी लोकांना खरेदी करून त्यांच्या सैन्यात सामील करून घेण्याचा सपाटा लावला. लढण्याचे काम करण्याशिवाय सैन्यदलातील छावण्यांमधून छोट्या-मोठ्या कामालाही हबशी लोकांना लावले जाई. बन्टु वंशाच्या या लोकांना बहुतेककरून मोंझांबिकमधून गुलाम म्हणून आणले जाई आणि त्यांची विक्री संस्थानिकांना केली जाई. या व्यवसायात पोर्तुगीझ आणि अरब व्यापाऱ्यांचाच मुख्यत्वे करून सहभाग असे. ‘सिद्दी’ हा आफ्रिकन शब्द आहे, आपण आदराने बऱ्याच जणांना ‘साहेब’ असे संबोधतो. त्याच अर्थाने ‘सिद्दी’ या उपाधीचा वापर करण्याची प्राचीन प्रथा आहे. गुलामांना भारतात आणणाऱ्या जहाजाचे नावही सईदी असे होते पण या शब्दाचा अपभ्रंश होऊन सिद्दी हे नाव रूढ झाले आणि या जहाजामधून भारतात येणाऱ्यांना ‘सिद्दी’ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. पुढे पुढे या गुलामांना ‘हबशी’ म्हणूनही संबोधण्यात येऊ लागले. हबशी या नावाने ओळखले जाणे कमीपणाचे मानतात. जे सिद्दी गुलाम म्हणून भारतात येत त्यांना हबशी म्हणून संबोधण्यात येई.

अशाप्रकारचा व्यापार बरेच दिवस अस्तित्वात होता. परंतु या व्यापारावर टीका होऊ लागल्यामुळे पोर्तुंगिझांनी इ.स. अठराशेच्या शेवटी शेवटी व्यापारावरील त्यांची पकड सैल केली. पोर्तुगिझांचे वर्चस्व गोव्यात असल्यामुळे बरेच सिद्दी पोर्तुगिझांच्या गोव्यात गुलाम म्हणून वास्तव्यास होते. त्यापैकी बऱ्याच जणांना पोर्तुगिझांच्या तावडीतून पळून जाण्यात यश आले. अठराशेनंतर पोर्तुगिझांनी त्यांच्या तावडीत असलेल्या गुलामांची मुक्तता केली. स्वसंरक्षणासाठी म्हणून हे गुलाम सह्याद्रीच्या पश्चिम घाटावर येऊन राहू लागले. आपल्याला पुन्हा पकडून घेतले जाऊ नये म्हणून त्यांनी गोव्यापासून अधिक लांब अशा उत्तर कॅनरा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात आश्रय घेतला आणि ते वस्त्या करून राहू लागले. जंगल घनदाट असल्यामुळे साप विंचवाच्या दंशाने कित्येक सिद्दी गुलामांना प्राणास मुकावे लागले तर काहींचा मृत्यू त्यांच्या वस्तीवर दरड कोसळल्यामुळे झाला. या यातना सिद्दी सहन करायला तयार होते पण त्यांना गुलामगिरी नको होती. जंगलाची साफसफाई करून सिद्दी जमातीने जमेल त्या ठिकाणी शेती व्यवसाय करायला सुरवात केली. सगळ्याच जणांना शेती व्यवसाय शक्य नसल्यामुळे काही जणांनी वेठबिगार मजूर म्हणून तर काहींनी अर्धवेळ मजूर म्हणून काम करायला सुरवात केली.

जंगलात अनेकविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. समाज सिद्दी जमातीकडे कनिष्ठ नजरेने पाहत होता. वेगवेगळ्या ठिकाणी वस्त्या करून राहत असल्यामुळे स्वसंरक्षण अवघड बाब बनली होती. त्यामुळे आश्रयासाठी बरीच सिद्दी कुटुंबे येल्लापूर, हल्लियाळी, शिरशी या सारख्या ठिकाणी स्थलांतरित झाली. काही सिद्दी कुटुंबे थेट गुजराथ आणि हैदराबाद येथे जाऊन स्थायिक झाली. परंतु त्यांना समाजात मानाचे स्थान कुठेही मिळाले नाही. एवढेच काय, त्यांना अनुसूचित जातीत अथवा जमातीतही स्थान दिले गेले नाही, त्यामुळे दारिद्र्यात खितपत पडण्याशिवाय त्यांच्याजवळ काही पर्याय नव्हत .

जसजसा काळ लोटला तसतसा सिद्दी समुदाय वेगवेगळ्या धर्मात विलीन झाला. काही सिद्दींना हिंदू धर्म जवळचा वाटला, तर काहींनी इस्लाम धर्माला जवळ केले. बरेच सिद्दी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून त्या धर्माच्या चालीरीतींप्रमाणे वागू लागले. परंतु सिद्दी समुदायाने त्यांची नितांत श्रद्धा असणारा हिरियास प्रघात सोडला नाही. आपल्या पूर्वजांचे मनोभावे स्मरण करण्याचा हा प्रघात वर्षभरातून दोनवेळा सिद्दी साजरा करतातच. मग ते हिंदू असोत, मुसलमान असोत अथवा ख्रिश्चन असोत. नवरात्र आणि होळी या सणांच्या आगेमागे हिरियास महोत्सव साजरा केला जातो. याशिवाय कुटुंबात कोणाचा जन्म, मृत्यू अथवा लग्न सोहोळा असेल तरीही या महोत्सवाची आठवण ठेवली जाते.”

सीतारामचे निवेदन ऐकून काही जणांना कंटाळा आला. ते जांभया देऊ लागले, त्यापैकी दोन जण उठून गेले आणि त्यांनी बाजूच्या खोलीत पथाऱ्या लावल्या. मात्र उरलेल्या मित्रांना सीतारामची संपूर्ण कहाणी ऐकायची होती. त्यांनी सीतारामला त्याचे निवेदन पुढे चालू ठेवण्याकरता सांगितले. प्राध्यापकांनी सीतारामला सिद्दी समुदायाची सद्य परिस्थिती काय आहे हे विशद करायला सांगितले. सीताराम पुढे सांगू लागला, “सिद्दींना गुलाम करून गोव्यात आणले असतांना बरेच सिद्दी निरनिराळ्या संस्थानांमध्ये सैनिक म्हणून काम करू लागले. काहींनी तर सैन्यात फार मोठी पदे हस्तगत केली. सिद्दी जोहार आणि सिद्दी मसूदचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे. त्यांनी इ.स. सोळाशे साठमध्ये आदिलशाह सुलतानाच्या सैन्यदलाचे नेतृत्व केले. विजापूरच्या सुलतानियतमध्ये बरेच सिद्दी सैनिक मोठ्या पदावर होते. पन्हाळा येथे त्यांनी मराठयांशी निकराची झुंज दिली. त्यावेळी कर्नाटकात सिद्दी समुदायाची संख्या प्रचंड वाढली होती. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सिद्धिंनी हौतात्म्य पत्करले, हा इतिहास आहे.

आज मात्र सिद्दी समाज पार विखरून गेला आहे. गरिबी, कमी शिक्षण, अनारोग्य आणि सरकार दरबारी नोंद नसल्यामुळे सिद्दी समुदायाचे कोणीही वाली उरले नाही. तरीही सिद्दी समुदायाने आपले रीतिरिवाज सणवार, नाचगाणे सोडले नाही. आजही ते आपले परंपरागत आफ्रिकन डफ वाजवणायचे विसरले नाहीत. स्त्रिया कापडावर सुंदर, पारंपरिक कशिदे विणण्याचे काम करतात. ही कावंडी नावाची कलाकुसर आजही जिवंत आहे.

सिद्दी कर्तापुरुष घरात पूजा अर्चा करतो. त्यांची अशी समजूत आहे की मृत व्यक्ती आपल्या अवतीभोवतीच असतात. त्यामुळे घरातले वातावरण शुद्ध आणि पवित्र ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. बहुतेक घरे जरी मातीची असली तरी शेणाने नीटनेटकी सारवलेली असतात. सिद्दी समाजाला कोंकणी भाषा जवळची वाटते, परंतु कोंकणी भाषेशिवाय ते मराठी आणि कानडी भाषा उत्तम बोलतात. सिद्दी इस्लामी अथवा ख्रिश्चन झाले असले तरी त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होतोच. ते सहसा गैरसिद्दींशी विवाह करीत नाही. म्हणूनच त्यांचा चेहरा-मोहरा अद्याप बदललेला नाही. भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी काही मुसलमान सिद्दी पाकिस्तानात गेले. बहुतेक सिद्दी कराची आणि आसपासच्या ठिकाणी स्थायिक झाले.“

सीताराम सिद्दीने आपले निवेदन संपवले. रात्रीचे अकरा वाजले होते. सकाळी उठून ‘याना’ व्हिलेज, दांडेली जंगल परिसर आणि विभूती धबधब्याला भेट देण्याचे नियोजन होते. या तिन्ही ठिकाणी एका दिवसात जाणे अशक्य होते. त्यातच रात्रीतून भोवतालचे वातावरण बदलले. आभाळ ढगांनी वेढले. मधूनच विजांचा लखलखाट होऊन समोरच्या आक्राळविक्राळ डोंगराच्या उंच कडा नजरेस पडू लागल्या. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे पर्यटनावर पाणी पडते की काय अशी शंका ज्याला त्याला येत होती. सकाळपर्यंत वातावरण निवळेल या आशेने सगळे झोपेच्या आधीन झाले.

सकाळी उठून सीताराम आपल्या मित्रांसमवेत नियोजित स्थळांना भेटी द्यायला सज्ज झाला. रात्री त्याने आपल्या पूर्वजांची सांगितलेली कहाणी ऐकून सीतारामविषयी प्रत्येकाच्या मनात सहानुभूतीची भावना निर्माण झाली होती. ‘काळाकुट्ट आफ्रिकन’ म्हणून निर्भत्सना करणारा त्याचा उदयकृष्ण नावाचा मित्र ओशाळल्यासारखा दिसत होता. दोन दिवसांची मनसोक्त सहल झाल्यानंतर सगळे कारवारला परतले.

थोड्याच दिवसानंतर सीतारामने पदवी संपादन केली. सिद्दी समुदायामधें पदवी प्राप्त करणारा सीताराम कदाचित पहिला युवक असावा. लहानपणापासून अभ्यासात चमक दाखविणाऱ्या सीतारामने पदवी परीक्षेत केवळ यश न मिळवता गोल्ड मेडलही पटकावले.

सीताराम सरकारी नोकरी शोधीत होता. त्याला मनासारखी नोकरी मिळत नव्हती. याच दरम्यान त्याची आणि अनिकेत नावाच्या एका उमद्या तरुणाची ओळख झाली. अनिकेत पदवीधर होता. त्याने सीतारामची नोकरीसाठी धडपड पाहिली. सिद्दी समुदायामधून पुढे आलेला हा तरुण नोकरी मिळविण्यासाठी एवढी धडपड करतो आहे हे पाहून अनिकेतचे मन हळहळले. त्याला सिद्दी समुदाय कसल्या अवस्थेत जीवन कंठीत आहे याची चांगली कल्पना होती. सीतारामने नोकरीच्या मागे न धावता सिद्दी समुदायाचे पुनरुत्थान करण्याकरता काही तरी करावे असे त्याला वाटू लागले. अनिकेतने आपला विचार सीतारामला बोलून दाखवला परंतु सीतारामला त्याचे म्हणणे पटले नाही. अनिकेत सारखे त्याचे विचार सीतारामच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी सीतारामने आपल्या समुदायाकरता काम करण्याचे मान्य केले. सीतारामच्या डोळ्यांसमोर त्याच्या पूर्वजांचा इतिहास होता. गुलामगिरीत त्याच्या पूर्वजांनी सोसलेले हाल, पोर्तुगीजांच्या, अरबांच्या तावडीतून निसटल्यानंतरही त्यांचे कष्टमय जीवन संपुष्टात आले नव्हते. जंगलात, झाडाझुडूपांत लपून बसण्याची त्यांची धडपड, जंगलात एकाकी जीवन कंठताना विंचूकाट्याची, श्वापदांची सतत दहशत आणि ढोर मेहनत करूनही गरिबीचा ससेमिरा याची सीतारामला चांगली माहिती होती. बायाबापड्या जंगलात जाऊन सरपण -पाणी गोळा करीत असलेल्या त्याने पाहिल्या होत्या. हे कमी म्हणून की काय समाजाने त्यांना अव्हेरल्याचे दुःख सीतारामला स्वस्थ बसू देत नव्हते. आर्थिक, सामाजिक दृष्टया दुर्लक्षलेल्या या सिद्दी समाजाच्या नशिबी एकाकी जीवन जगणे आले नसल्यास नवलच.

जंगलात वस्ती करून राहणारे सिद्दी आता आता पन्नास साठ वर्षांपासून शहरी-निमशहरी भागाच्या आसपास वस्ती करून राहण्याचे धाडस करीत होते. परंतु आजही बहुतेक सिद्दी समाज विखुरलेलाच होता. काही इस्लाम धर्माच्या सिद्दींनी आपली स्वतंत्र वसाहत करून राहणे पसंत केले. हाळियाळ हे पाचशे घरे असणारे खेडे असेच आहे. या खेड्यात तयार होणाऱ्या कावंडी बेडशीटला बाजारपेठ मिळत नाही ही या गावातल्या महिलांची खंत होती. या कलात्मक बेडशीटला बाजारपेठ मिळवून द्यावी असे सीतारामच्या मनात कित्येक वेळा येई परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचा मनोदय पूर्ण होत नसे.

जंगलात वास्तव्य करणाऱ्या सिद्दी अथवा तत्सम समुदायांचे कष्टमय जीवन सुकर करण्याच्या दृष्टीकोनातून येल्लापूरात ‘वनवासी कल्याण आश्रम’ स्थापन झाला होता. सीतारामने या आश्रमाचे सदस्यत्व मिळविलीले आणि दऱ्याखोऱ्यांत, जंगलात विभक्त पद्धतीने राहणाऱ्या अनेकांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना त्याचा लाभ घेण्यास प्रवृत्त केले. या कामात सीताराम एवढा व्यस्त झाला की तो सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न विसरून गेला. नंतर प्रदूषित झालेली बेडळी नदी स्वच्छ करण्याच्या अभियानात सीतारामने स्वतःला गुंतवून घेतले. सीताराम करीत असलेल्या समाजकार्याची विशेषतः सिद्दी समाजासाठीच्या कामाची सरकार दरबारी नोंद होऊ लागली. सीताराम दिवसेंदिवस सामाजिक अव्यवस्थेबाबत चिंतीत होऊ लागला. त्याला भटक्या जमातींविषयी कणव वाटू लागली. रात्रंदिवस त्यांच्या समस्यांचे परिमार्जन करण्याचा मार्ग तो शोधू लागला. पंचक्रोशीत सीतारामचे नाव सिद्दी समुदायात ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. रोज ते त्यांच्या समस्या घेऊन त्याच्याकडे येऊ लागले.

यादरम्यान येल्लापूर तालुक्यातले काही सिद्दी पुरुष सीतारामकडे आले. त्यांना जंगल साफ करून शेतीकरिता जमीन पाहिजे होती. परंतु वनविभाग त्यांना परवानगी देत नव्हते. जमीन हस्तगत करण्यासाठी वन विभागाच्या अटी फार जाचक होत्या. जमीन कसायला मागणाऱ्या समुदायाचे वास्तव्य त्या भागात किमान पंच्याहत्तर वर्षे असायला हवे, समुदायापैकी निदान एका तरी सदस्याने तसे शपथपत्र वन खात्याला देणे अनिवार्य होते. शपथपत्र देणारी व्यक्ती पंच्याहत्तर वर्षांपेक्षा अधिक वयाची असायला हवी. या अटी समुदायाला जाचक वाटत होत्या. सीतारामला यावर तोडगा सापडेना. या संदर्भात त्याने विभागीय वन अधिकाऱ्याची भेट घेण्याचे ठरविले, परंतु कामाच्या रामरगाड्यामुळे त्याला ते शक्य झाले नाही.

काही कामानिमित्त सीतारामला बंगलोरला यावे लागले. काम आटोपल्यानंतर त्याने कर्नाटक स्टेट हँडीक्राफ्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सिद्दी महिला बनवीत असलेल्या कावंडी बेडशीटविषयी माहिती दिली. मऊ, रंगीबेरंगी आणि नक्षीदार डिझाईन असलेले बेडशीट पाहून कार्पोरेशनचे अधिकारी प्रभावित झाले. त्यांनी सीतारामच्या कावंडी बेडशीट ‘कावेरी‘ एम्पोरियममध्ये ठेवण्याच्या विनंतीला त्वरित मान्यता दिली आणि महिन्याकाठी किमान पन्नास बेडशीट खरेदी करण्याचा आपला मानस त्याला सांगितला. कावंडी बेडशीट बनविणाऱ्या महिला या हाळीयाळी खेड्यातल्या मुस्लिम महिला होत्या. त्यांना सीतारामच्या प्रयत्नामुळे कायमस्वरूपी रोजगार मिळाला होता. भारतातल्या सगळ्या ‘कावेरी’ एम्पोरियममधुन बेडशीटची विक्री सुरु झाली.

तवरगट्टा खेड्यातल्या ख्रिश्चन समुदायाची समस्या वेगळीच होती. त्यांना त्यांच्या खेड्यात चर्च बांधण्यासाठी जागा हवी होती. परंतु ग्रामपंचायतीच्या नियमांमुळे त्यांना ते शक्य नव्हते. संपूर्ण ख्रिश्चन वस्ती असलेल्या या खेड्याला स्वतः सीतारामने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह भेट दिली. गाव पंचायत बोलावण्यात आली. प्रदीर्घ चर्चेनंतर गावाच्या पूर्वेला चर्च बांधण्यासाठीची जागा मुक्रर करण्यात आली. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या काही संस्थानी थोडा फार निधीही उपलब्ध करून दिला. तवरगट्टाच्या रहिवाश्यांचा अनेक वर्षापासूनचा चर्चचा प्रश्न सुटला. जंगल साफ करून शेती करणाऱ्या सिद्दी समुदायाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत होत्या. त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक होते.

एका निवांत दुपारी सीताराम स्वस्थ बसला होता. त्याने नुकतेच डाळ, भात आणि आंब्याचे लोणचे असे साधे जेवण उरकले होते. थोडे आडवे होण्याअगोदर त्याने पत्नी गीताकडे ब्लॅक टीची मागणी केली. गीता ब्लॅक टी बनवीत असतांनाच फोन खणखणला. फोन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आला होता. सीतारामला फोनवर सांगण्यात आले की त्याची कर्नाटक विधान सभेवर आमदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सीतारामचा फोनवर विश्वास बसेना परंतु दुसऱ्याच दिवशी प्रत्यक्ष राज्यपालांच्या कार्यालयातून नेमणूक झाल्याचे पत्र सीतारामच्या हातात पडले. सीतारामचा आनंद गगनात मावेना. पांचशे वर्षांपूर्वी आफ्रिकेमधून गुलाम म्हणून आलेल्या सिद्दी समुदायातल्या सीतारामला आता त्यांचे आणि त्या अनुषंगाने भटक्या विमुक्त समुदायाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्याला त्याच्या मित्राने नोकरी न करता समाजसेवा करण्याचा दिलेला सल्ला सार्थकी लागला होता.

सीताराम नुकताच त्याचा शपथविधी उरकून परतला होता. त्याने राहत्या घरात एक छोटेखानी कार्यालय सुरु केले. एक दिवस कार्यालयात काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतांना उत्तर कॅनरा जिल्ह्यातील जंगलात वास्तव्य करणारे सिद्दी समुदायाचे काही लोक सीतारामला भेटायला आले आणि पुन्हा जंगल साफ करून त्यांना शेती करण्याचे त्यांचे जुने गाऱ्हाणे सांगू लागले. त्यांना वेगळे घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या वन विभागाच्या कार्यालयात दुसरे दिवशी जाण्याचे ठरले. त्यातल्या काही निवडक व्यक्तींना त्याने जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याविषयी सूचना दिल्या.

दुसरे दिवशी सकाळी अकरा वाजता सीताराम वन विभागाच्या कार्यालयात पोहोचला. सोबत जंगलात वस्ती करून राहिलेल्या कुटुंबांतील दोन तीन प्रमुख व्यक्ती होत्या. सीतारामने वन विभागाधिकाऱ्याच्या सचिवाची भेट घेऊन डी एफ ओ ना भेटण्याची इच्छा प्रकट केली. डी एफ ओ कार्यालयाबाहेर असलेल्या पाटीकडे सीताराम कितीतरी वेळ पहात होता. त्याला ‘उदयकृष्ण, IFS‘ हे नाव ओळखीचे वाटत होते. सचिवांनी सीताराम आल्याची सूचना देताच डी एफ ओ नि सचिवाला सीतारामला आत पाठवायला सांगितले. कक्षामध्ये शिरताच डी एफ ओ ने मोठ्याने “नमस्कार काळुराम“ म्हणत सीतारामशी हस्तांदोलन केले. सीताराम सहलीला गेला असतांना याच मित्राने त्याला ‘काळाकुट्ट आफ्रिकन‘ म्हणून हिणवले होते. उदयकृष्णला सीतारामला भेटून फार आनंद झाला. उदयकृष्णने त्याच्या कक्षेमधील इतरांना बाहेर थांबायला सांगितले आणि सीतारामला गळ्याशी लावले. उदयकृष्ण स्वतःच्या आसनावर स्थानापन्न होत असतांनाच त्याने बाहेर सचिवाला फोन करू तातडीने पुष्पगुच्छ आणायला सांगितले. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दोघांनी एकमेकांना कॉलेजच्या शिक्षणानंतरचा घटनाक्रम सांगितला. तेव्हड्यात सचिव पुष्पगुच्छ घेऊन आत आला. उदयकृष्णाने सीतारामला पुष्पगुच्छ देत त्याचे आमदार झाल्याबद्दल अभिनंदन केले. उदयकृष्ण खरोखरीच सितारामच्या यशाने भारावून गेला होता.

सीतारामने त्याचे येण्याचे प्रयोजन सांगितले, परंतु उदयकृष्ण त्या विषयावर बोलायला तयार नव्हता. त्याने “आपण थोड्याच वेळात घरी जेवायला जाणार आहोत“ असे सांगितले. थोडी फार कामे आटोपून उदयकृष्ण सीतारामबरोबर घरी आला. दोघेही गप्पाष्टकात मग्न होते. उदयकृष्णने आपल्या पत्नीचा सीतारामला परिचय करून दिला. सीतारामने सिद्दी समुदाय जंगलातली जमीन शेती योग्य करून तिथे शेती करू इच्छितो, परंतु वन विभागाच्या जाचक नियमांमुळे त्याला ते शक्य होत नाही असे उदयकृष्णला सांगितले. वन विभागाचे नियम जाचक आहेत हे उदयकृष्णनेही मान्य केले परंतु नियम बदलण्यासाठी तो काही करू शकेल असे त्याला वाटत नव्हते. विधान सभेतच हा प्रश्न मांडून यावर योग्य तो तोडगा निघू शकेल असे उदयकृष्णचे मत पडले. थोड्याच वेळात सीतारामने त्याच्या मित्राचा निरोप घेतला आणि विधान सभेत हा गहन प्रश्न मांडण्याची तयारी करण्याचे ठरविले.

सीतारामवर आता दोन तीन जबाबदाऱ्या येऊन पडल्या होत्या. त्याला आग्रहाने ‘वृक्ष-लक्ष‘ संस्थेचा सभासद करून घेण्यात आले होते, ज्यायोगे वृक्षतोडीवर अधिक अंकुश येऊ शकेल आणि पर्यावरणाचा दर्जा वाढेल असे काही विचारवंतांना वाटत होते. कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमीची जबाबदारी सीतारामने आपण होऊन घेतली. परंतु सिद्दी समुदायाला कसण्यासाठी जमीन, विभूती धबधब्यावर किंवा तत्सम धबधब्यावर हायड्रोपावर प्लांट उभारणे या बाबींना सीताराम प्राधान्य देणार होता. वस्तीपासून लांब जंगलात राहणाऱ्या सिद्दी वसाहतींवर जाण्यासाठी धड रस्ते नव्हते की वास्तव्यासाठी पक्की घरे त्यांच्या नशिबी नव्हती. त्याचे स्वतःचे घर कच्च्या-पक्या अवस्थेत तग धरून होते. येल्लापूरमध्ये खास सिद्दी बाजार सुरु करून तिथे सिद्दी समाजाला दैंनदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू किफायतशीर भावात मिळू शकतील अशीही त्याला व्यवस्था करायची होती. परंतु म्हणतात ना ‘रात्र थोडी, सोंगे फार‘ तशी सीतारामची अवस्था झाली होती.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय