रिकामे घरटे

अरुंधती सरपटवारी

नेहमी प्रमाणे मी कॅाम्प्युटरवर काम करत होते. काम करता करता मधून मधून खिडकीबाहेर डोकावण्याची सवय झाली होती.

आजही तेच चालू होते, पण आज कॅाम्प्युटरवर नजर थांबत नव्हती. लक्ष सारखे खिडकीबाहेर असलेल्या बर्ड फीडरकडे (bird feeder) जात होते. बर्ड फीडर लावून बरीच वर्ष झाली होती. आज जरा तिथे जास्त किलबिल चालू होती. नकळत माझी खुर्ची पूर्णपणे खिडकीकडे वळली. एका चिमणा व चिमणीचा खेळ चालला होता. मी अगदी न हालता त्यांचा खेळ पाहत होते. थोड्याच वेळात त्यांच्या खेळांत अजून एक चिमणा येऊन मिळाला. दोनाचे तीन झाले. एकमेकांवर चोची मारत, उडत दोन चिमण्यांत भांडाभांडी सुरू झाली. चिमणी त्यांच्या भांडण्यात नव्हती. बऱ्याच वेळानंतर विजयी चिमणा चिमणीच्या मागे उडू लागला. दोघांच्या चिवचिवण्यात एक सुंदर सूर होता. त्यांना पाहण्यात मला वेळेचे भानच राहिले नव्हते. जेव्हा भानावर आले तेव्हा सूर्य डोक्यावरून खाली उतरत होता व माझ्या कामाचे ओझे डोक्यावर चढलेले होते.

एक दोन दिवसांतच मी त्या दोघांना चोचीत गवतासारखे काहीतरी घेऊन आमच्या अंगणातील बर्ड फीडरकडे जातांना पाहिले. माझे कुतूहल आणखीच वाढले. संध्याकाळी मी हळूच त्या बर्डफीडर जवळ गेले आणि आश्चर्याने पहातच राहिले. चिमणा-चिमणीने बांधलेले घरटे फारच सुंदर होते. बारीक बारीक काड्या वाकवून, गोल आकार देवून, त्यामधे गवत, रंगीत धागे, रेशमी दोरे आणि आत कोमल पिसे होती. एवढे सगळे त्यांना कुठे सापडले? उबदार, प्रेमाने बांधलेले, सुंदर सजवलेले त्यांचे घरटे! घरट्याच्या बांधणीला बक्षिस मिळण्याइतके ते अप्रतिम होते. लहानपणी मी ऐकलेले एकदम आठवले की आपण घरट्याला किंवा पिल्लांना हात लावला तर चिमणी घरट्यात जात नाही व पिल्लांना सोडून जाते. मनांत एकदम चर्र झाले. पक्षांचे आवाज ऐकताच मी घरट्याला हात न लावता चटकन त्यापासून दूर गेले. नंतर एक दोन दिवस ते बर्ड फीडर शांत पाहून मन चुकचुकले. वाटले, मी घरट्याजवळ गेले होते हे त्या चिमणीला समजले तर नसेल ना? पण या वेळी बाहेर जाण्याऐवजी मी आतूनच खुर्चीवरून हळूच डोकावले, तर घरट्यात चिमणी शांतपणे बसलेली दिसली. अशी शांतपणे बसलेली चिमणी मी कधीच पाहिली नव्हती. चिमणा यायचा, बर्डफीडरच्या काठावर बसून लगेच उडून जायचा.

चार/पाच दिवस आम्ही सुट्टीवर बाहेरगावी गेलो आणि चिमणा-चिमणीचा विसर पडला. परत आल्यावर सवयीप्रमाणे खिडकीतून पाहताच घरट्यात चार इवली इवली डोकी इकडे तिकडे हलताना दिसली.मी आनंदाने खिडकीच्या अगदी जवळ गेले. त्याच क्षणी चिमणी तोंडात खाऊ घेवून आली, पण मला खिडकी जवळ पाहून लगेच उडून गेली. घरट्यात एकदम चलबिचल व गोंगाट सुरू झाला. मी खिडकीच्या इतक्या जवळ का गेले असे मला वाटले. मी पटकन घराच्या खिडकीचा पडदा बंद केला. श्वास रोखून पडद्यांच्या फटीतून मी पाहू लागले. घरट्यातील गोंगाट बंद झाला होता. थोड्या वेळाने चिमणी परतली आणि पिल्ले पुन्हा गडबड करू लागली. मी निःश्वास टाकला. रोज दोघे चिमणा-चिमणी पिल्लांना खाऊ घालत होते आणि मी उत्साहाने आडून, आधाश्यासारखे डोळे भरून पहात होते.

खिडकीचे पडदे किती दिवस बंद होते ते आठवत नाही. बाहेर न पाहताच, पिल्लांचा आवाज ऐकून माहीत व्हायचे की आता न्याहारी चालली आहे, आता जेवण…. पिल्ले हळूहळू घरट्याच्या काठावर येऊ लागली.

आजही नेहमी प्रमाणे चहाचा कप घेऊन खिडकीच्या पडद्यांच्या फटीतून बाहेर नजर टाकली, नेहमीचा चिवचिवाट नव्हता, घरटे शांत होते. हातातला कप कसाबसा टेबलावर ठेवून धावत बाहेर गेले. घरट्यात एकही पिल्लू नव्हते. श्वास अडकल्याने डोळ्यावर काजळी आली. घरटे रिकामे झाले होते, शांत झाले होते.

थोड्या वेळाने मनाने स्वतः:ला समजावले - तुझे हे घर व घरटे सारखे ना? लग्न झाले, घर घेतले, मुले झाली. चिमुकल्या किलबिलीत घर गोंगाटले. मग शाळा, बेसबॉल , बास्केटबॉल, आईस स्केटींग, पोहण्याचे वर्ग झाले. पाहता पाहता कार चालवण्याचे, सॅट परीक्षेचे, कॉलेज प्रवेशाचे दिवस स्पर्धेसारखे धावत गेले. मग तुझे घरही या घरट्यासारखे रिकामे झाले.

मुलांना कॉलेजमध्ये सोडून घरी आल्यावर जसे वाटले होते तसेच मी त्या दिवशी अनुभवले. रिकामे रिकामे. त्या चिमणा-चिमणीलादेखील नक्कीच रिकामे वाटले असणार. त्यांनीही प्रेमाने घरटे सजवले. उंच भरारी मारण्याची शक्ती येईपर्यंत, मायेने पिल्लांचे पोषण केले. मग अभिमानाने, आशीर्वाद देवून त्यांना त्यांच्या दिशेला धाडले असणार.

आत्ता ‘Empty nester’ चा खरा अर्थ समजला. आम्हीपण Empty nester’s club चे मेंबर झालो.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय