जरा विसावू या वळणावर - भाग २

डॉ. जयश्री कुलकर्णी- खेरा

भारतात नेत्ररोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ म्हणून शासनात उच्च पदावर काम केले. वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित. सध्या साइक्सविल, मेरीलँड येथे वास्तव्य. भटकंती, लिखाण, वाचन, संगीत, नृत्य, हेल्दी कुकिंगची आवड.

Life is what is happening while you are busy making other plans! वय वाढणे हे नैसर्गिक आहे. परंतु ते अनैसर्गिक पद्धतीने जगल्यास अकाली प्रौढत्व येते.

आपले नैसर्गिक आयुष्य साधारण १२० वर्षे असते. परंतु वेगवेगळे आजार, तक्रारी, व्याधी यामुळे शरीराचा ऱ्हास होतो आणि आयुष्यमान कमी होत जाते. जर सरासरी आयुष्यमान १२० वर्षे धरले तर ६०वे वर्ष ही मध्यमवयाची सुरवात समजता येईल. परंतु वय वाढण्याबरोबर केस पांढरे होणे, सुरकुत्या पडणे, इतर शारीरिक बदल होणे, हे टाळणे अशक्यच! रक्तदाब (ब्लड प्रेशर), हाडे, सांधे, आपले हृदय, पचनशक्ती, मज्जासंस्था (नर्वस सिस्टिम) इ. म्हणजेच सर्व शरीरातच वय वाढण्याची प्रक्रिया (एजिंग) सुरु होते.

या काळात आपले सामाजिक आणि कौटुंबिक स्थान पक्के झालेले असते. आता आयुष्याच्या धावपळीत किती तरी गोष्टी करायच्या राहून गेलेल्या लक्षात येऊ लागतात. त्याला बकेट लिस्ट असे गोंडस नाव दिले जाते. याचबरोबर आयुष्यातील धावपळीत व्यायामाचा अभाव (एक्सरसाइज डेफिशिएन्सी सिंड्रोम), अपुरी झोप, चुकीचा आहार आणि काळजी करणे, यामुळे मधुमेह, कर्करोग (कॅन्सर), उच्च रक्तदाब, वगैरेंसारखे आजार डोके वर काढू लागतात,आणि अचानक आयुष्याला ब्रेक लागतो! जब जागे तब सवेरा! आता तरी आपली जीवनशैली सुधारणे अत्यंत गरजेचे असते.

या टप्प्यात स्त्रियांच्या आयुष्यात येणारा सर्वात मोठा बदल म्हणजे रजोनिवृत्ती (मेनॉपॉज)! साधारण ४० ते ५० या वयांदरम्यान रजोनिवृत्ती येऊ शकते. यावेळी शरीरात संप्रेरकांमध्ये (हार्मोन्स) मोठ्या प्रमाणात बदलास सुरवात होते. इस्ट्रॉजन नावाच्या स्त्री-संप्रेरकाची शरीरातील पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे हॉट फ्लशेस, मूड स्विंग्ज, छातीत धडधडणे, डोकेदुखी, योनीमार्गाची शुष्कता आणि त्यामुळे शरीरसंबंध वेदनामय होणे, छोट्या छोट्या गोष्टींमुळे डोळ्यात टचकन पाणी येणे वगैरे अनुभव येऊ लागतात. अशा वेळेस नवऱ्याची भूमिका फार महत्त्वाची ठरते. नवरा आणि घरातल्या इतरांनी स्त्रीला समजून घेऊन तिला मानसिक आधार देणे फार गरजेचे ठरते. आपले स्त्रीत्व संपले अशी भावना तिच्यात रुजू न देणे महत्त्वाचे असते. नियमित व्यायाम, उत्तम आहार, डॉक्टरांचा योग्य सल्ला, काही पूरके (सप्लिमेंट्स) घेऊन यावरही मात करता येते. आजकाल खास ‘मेनॉपॉज क्लिनिक्स’ सुद्धा चालवली जातात. सल्ला घेण्यास लाजू नका. स्त्रियांमधील इस्ट्रॉजन संप्रेरक हे हृदयाघातापासून (हार्ट अटॅक) बचाव करत असते, पण रजोनिवृत्तीनंतर हे संप्रेरक कमी झाल्याने स्त्रियांना हृदयाघाताचा धोका पुरुषांइतकाच वाढतो. थायरॉईडचे कार्यही बिघडू शकते. त्यामुळे योग्य आहार, योग्य व्यायाम, पुरेशी झोप, हे अगदी महत्त्वाचे!

आता निवृत्तीची (रिटायरमेंट) वेळही जवळ येऊ लागते. त्याचे आधीच योग्य व्यवस्थापन करायला हवे. निवृत्ती ३ प्रकारची समजली जाते - शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. शारीरिक म्हणजे तुम्ही वर्षानुवर्षे करत असलेले काम अचानक एका दिवसापासून बंद करता. हे काही अंशी आपल्या हातात नसते. पण मानसिक निवृत्ती कधीच येऊ न देणे हे आपल्या हातात नक्कीच असते. आपण आपले छंद जोपासून आनंद मिळवू शकतो, स्वयंसेवक म्हणून काम करून सामाजिक ऋण फेडू शकतो, आपल्या आवडीनुसार ग्रुप्स जॉईन करून छान वेळ घालवू शकतो. सामाजिक निवृत्तीही थोडीफार आपल्या हातात नसते. तुमच्या तब्येतीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे नकळत तुम्ही समाजापासून, कुटुंबापासून वगळले जाऊ लागता. त्याचे शल्य मनात खुपू लागते आणि खिन्न वाटू लागते.

आपल्या संस्कृतीत याचे व्यवस्थापन फार छान सांगितले आहे. गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम! निवृत्तीनंतरचे आयुष्य म्हणजे वानप्रस्थाश्रम! सगळ्या गोष्टींपासून तटस्थ व्हायचे! यासाठी स्वतःची अध्यात्मिक उन्नती खूप उपयोगी पडते. वाढणारे वय रोखण्याचे आणि तरुण राहण्याचे दोन मार्ग आहेत. एक योग्य जीवनपद्धत आणि शरीर व बुद्धीला परत नवे तारुण्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणे! यासाठी ध्यानधारणा (मेडिटेशन) फार उपयोगी पडते. १०-१२ वर्षे शरीर आणि मन तरुण करण्याची ताकद ध्यानधारणेमध्ये असते.

तर स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा आणि आपले ‘ध्येयवाक्य’ (मिशन स्टेटमेंट) लिहून काढा. मी कोण आहे, कशासाठी जगतो/जगते आहे, मला काय हवे आहे आणि मी ते कसे मिळवणार, हे एकदा स्पष्ट झाले की पुढे त्याचे फक्त सिंहावलोकन करायचे आणि योग्य त्या सुधारणा करीत जायच्या. "The tragedy of life is not that it ends so soon, but that we wait so long to begin it!"

समाप्त.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय