अति तेथे माती?...छे हो....अति तेथे प्रगती!

मधुर पुरोहित

गेल्या उन्हाळ्यातल्या शनिवारची दुपार होती. छान जेवण झालं होतं. शतपावली झाली आणि म्हटलं आता जरा पडी टाकावी.

माझ्या लेकाला, जयला म्हटलं, “येतोस का न्याप घायला?” तेव्हा त्याने मी त्याला "काय रे परग्रहावर येतोस का?" असं विचारल्यासारखा चेहरा करून फक्त “नोप“ म्हणत मला माझ्याच बालपणाची आठवण करून दिली. शनिवार-रविवारी बाबा वगैरे मंडळी दुपारी कशी काय झोपू शकतात हा प्रश्न मला कायम पडायचा. पण आता पुणेकरांच्या जन्मसिद्ध हक्कांमधली सुटीच्या दिवशीची झोप माझ्याच अंगवळणी पडली होती. बेडरूममध्ये आलो, बेडवर पडलो, गजर लावावा म्हणून फोन काढला. तेवढ्यात यूट्यूबचं काहीतरी नोटिफिकेशन आलं आणि व्हिडिओ बघता बघता ‘अशी ही बनवाबनवी’ मधली एक क्लिप कधी बघायला लागलो कळलंच नाही. त्याच असं आहे की ८०-९० च्या दशकात लहानाचे मोठे झालेल्या माझ्यासारख्या अनेक जणांना अशोक सराफ, सचिनच्या सिनेमाचे बाळकडू तेव्हाच पाजलं गेलं आहे. त्यामुळे कधीही, कुठेही आणि केव्हाही ते सिनेमे लागले तर बघावेच लागतात. क्लिप पिक्चरच्या सुरुवातीची होती, जेव्हा माधुरी मॅडम (अश्विनी भावे ) धनंजय मानेला (अशोक सराफ) विचारतात, "माने, आज पुन्हा तुम्ही ऑफिसला उशीरा आलात? ऑफिसला उशिरा यायची ही तुमची सहावी खेप."

"सहावी नाही, सातवी खेप."....

"परत तोंड वर करून हे सांगताय?"

"नाही खरं तेच सांगतोय .... मॅडम, आज वेळेवरच निघालो होतो, पण काय झालं सायकल अचानक पंक्चर झाली, म्हणून उशीर झाला. गेल्याच महिन्यात नवीन ट्युब टाकून घेतली होती. पण हल्लीच्या ट्युबचं काही खरं नाही हो. इंग्रजांच्या काळातल्या ट्युब कातरीने कापल्या तरी तुटायच्या नाहीत."

हा संवाद ऐकला आणि एकदम आठवलं, जयच्या सायकलची ट्युबसुद्धा पंक्चर झालीय आहे आणि नवीन टायर आणि ट्युब, दोन्हीं गोष्टी मागवायच्या आहेत. गमतीचा भाग असा की मी सुद्धा गेल्याच महिन्यात जयच्या सायकलची ट्यूब बदलली होती! आता ह्यासाठी सायकल वाटेल तशी दामटवणाऱ्या आमच्या चिरंजीवाला जबाबदार धरावं की हल्लीच्या कंपन्यांना? मला आठवतंय ह्या इंग्रजांच्या काळातल्या गोष्टींबद्दल माझे आजोबा कायम सांगायचे, "अरे, हा माझा दाढीचा ब्रश गेले ५० वर्षं मी वापरतोय. माझ्या बाबांकडेसुद्धा एक जुनं घड्याळ होतं, जे अनेक वर्षं टिकलं होतं.” एकंदरीत पूर्वीच्या गोष्टी आजकालच्या गोष्टींपेक्षा जास्त टिकायच्या. मला आठवतंय कोणी तरी मला सांगितलं होतं की इंग्रजांच्या काळात ज्या गोष्टी बनायच्या त्या आयुष्यभर टिकायच्या. पण जपानी कंपन्यांनी युक्ती लढवली. जर एखादी वापराची गोष्ट आयुष्यभर पुरली तर मग ग्राहकाला परत आपली वस्तू विकत घेण्याची गरज का लागेल? त्यामुळे गोष्टी ‘यूझ अँड थ्रो’ बनवा, म्हणजे प्रश्नच नाही. ग्राहक आपली वस्तू आयुष्यभर, पुनःपुन्हा घेत राहील. म्हणजे वस्तू आयुष्यभर टिकण्याऐवजी ग्राहक आयुष्यभर टिकला पाहिजे!

व्यापारी म्हणून आलेले आणि राज्यकर्ते बनलेले इंग्रज जेव्हा गेले तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरू भांडवलशाहीकडे संशयी नजरेने बघत होते. गांधीजी आणि गांधीवादी नेत्यांच्या प्रभावामुळे एकंदरीत भारतीय लोकांच्या राहणीमानात साधेपणा होता. अनेक गोष्टी आपल्याकडे असणं हे चांगलं मानलं जात नसे. गोष्टींचा संग्रह करणे, आपल्याकडे चैनीच्या गोष्टी असणे म्हणजे काहीतरी चुकतंय अशी विचारसरणी प्रचलित होती. अर्थात माझ्या लहानपणी डॉक्टर स्वामीनाथन यांच्या हरितक्रांतीमुळे आणि डॉक्टर वर्गीस कुरीयन यांच्या धवलक्रांतीमुळे अन्नधान्याचा, दुधाचा तुटवडा नव्हता. पण इंदिरा गांधींच्या ‘लायसन्स राज’ मध्ये कंपन्यांना ठराविक गोष्टीच बनवायची परवानगी होती. त्यामुळे मला आठवतंय, टीव्ही, फ्रीज वगैरे गोष्टी सोसायटीमध्ये एखाद दुसऱ्या घरीच असायच्या. क्रिकेटची मॅच बघायला अशा मित्राच्या घरी सगळी सोसायटी जमायची. माझ्या बाबांनी मी पाहिलीत असताना फोनसाठी नंबर लावला होता आणि मी दहावीत असताना शेवटी आमच्या घरी फोन आला होता! मधुर कॉलेजला जाईल तेव्हा मधुरला फोन लागेल ही दूरदृष्टी माझ्या बाबांनी मी पाहिलीत असताना दाखवली म्हणून मी त्यांचे कायम आभार मानायचो. एकंदरीत काय, नवनवीन गोष्टींबद्दल कुतूहल आणि आकर्षण नसलेला मध्यमवर्गीय माणूस सापडणं कठीणच.

अमेरिकेत आलो त्यावेळी भारताला मुक्त अर्थव्यवस्था अंगीकारून थोडीच वर्ष झाली होती आणि त्यामुळे अजूनही दोन्ही देशात वस्तूंच्या वापरातली तफावत जाणवण्याएवढी होती. भारतातल्या आयुष्यात अनुभवलेला ‘कमतरता’ हा शब्द इथे विरळाच! कारण अगदी पाण्यापासून ते विजेपर्यंत, सिरिअल्सपासून ते फ्रोझन फूडपर्यंत, आणि मोटारगाड्यांपासून ते सेमाय ट्रकपर्यंत सर्व गोष्टींची इथे रेलचेलच! भारतात फियाट, अँबॅसेडर आणि मारुती कार सोडल्या तर इतर कुठल्याही कार अजून नव्हत्या. टाटा इंडिका, ह्युंदाई सँट्रो वगैरे नुकत्याच येऊ लागलेल्या. भारतातून येताना फक्त दोन बॅगांतून सामान घेऊन आलो होतो. त्यात थोडे फार कपडे, अभ्यासाची पुस्तकं आणि एक छोटा कुकर होता. त्या कुकरमध्ये सगळे पदार्थ करायचो. अगदी चहा सुद्धा एकदा शिट्टी देऊन केला होता. सुरुवातीला सगळं नवीन होतं. म्हणजे लोकं चांगले टीव्ही, बसायचे सोफे, खुर्च्या आणि टेबलं सरळ रस्त्यावर इतरांनी घेऊन जाण्यासाठी ठेवायचे. शाळेत असताना कोणी तरी सांगितल्याचं आठवतंय, "अरे तिकडे अमेरिकेत घर साफ करणारे लोकसुद्धा कारमधून येतात." अमेरिकेत कार म्हणजे आपल्याकडची सायकलच हे ओघानं लक्षात आलंच.

यथावकाश ग्रॅड स्कूल संपून नोकरी लागली आणि एक बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये बसायला सोफा, झोपायला बेड, कामाला यायला जायला गाडी, एक ना दोन अशा अनेक गोष्टी घेण्याचं सत्र मागेच लागलं. ओहायोमधून जॉब बदलून मेरीलँडमध्ये आलो तेव्हा भारतातून आणलेल्या दोन बॅगांमध्ये आताचं सामान मावणार नव्हतं. एक छोटा युहॉल घेऊन त्यातून सामान आणलं. लग्नानंतर बॅचलर घरात नसलेल्या गोष्टी आल्या. ४ वेगवेगळे कप आणि ताटं जाऊन ४ प्रकारचे सेट आले. स्वयंपाकघरात माझ्या कुकरचा वापर आता फक्त क्वचित थोडा वरणभात लावण्यासाठी होऊ लागला. ओघानं एका बेडरूममधून दोन बेडरूममध्ये आलो तेव्हा बघता बघता दोन्ही बेडरूम, डेन आणि सगळी कपाटं वस्तूंनी भरली. लहान मुलांसाठी लागणाऱ्या गोष्टी तर विचारायलाच नकोत. अपार्टमेंट चाइल्डप्रूफ करावं लागतं हे एक दोनदा चिरंजीवांनी पराक्रम केल्यावरच कळलं. शेवटी अपार्टमेंटमधून स्वतःच्या घरात आलो तेव्हा सामान हलवायला ‘मूव्हिंग कंपनी’ची सेवा विकत घ्यावी लागली. ते करूनही आमच्या दोन्ही गाड्या भरून, अनेक फेऱ्या मारून आणि अनेक सामान टाकून देऊन शेवटी कसेबसे मूव्हिंग झाले. माझा मित्र शैलेश मला म्हणाला "मधुर, आता तुला कळेल आपली कंपनी ‘ब्लॅक अँड डेकर’ एवढी का चालते ते!” खरंच. अमेरिकेत घर वापरायचं म्हणजे एक दिव्यच आहे. अगदी लॉनला पाणी देण्याच्या नळीपासून ते प्रत्येक खोलीतल्या ‘स्मोक डिटेक्टर’च्या बॅटरीपर्यंत, एक ना दोन एवढ्या गोष्टी लागतात, की होम डेपो किंवा लोव्ज सारख्या दुकानांना ‘बिग बॉक्स’ का म्हणतात हे लगेच कळतं. १५०० स्क्वेअर फूट घरात लागणाऱ्या गोष्टी ठेवायला ५५००० स्क्वेअर फुटाचं दुकान लागतं! ह्या दोन बॅगा ते दोन ट्रक भरून सामानाची आवक बघून मला त्या संन्यासी माणसाच्या गोष्टीची आठवण झाली. एका संन्याशाला कोणी तरी जेवायला एक ताट देतो. मग तो ताटाबरोबर वाटी लागेल म्हणून ती आणतो. आणखी एक एक करत गोष्ट जमवतो आणि शेवटी लग्न करून संसार थाटतो!

घराप्रमाणेच इतर कुठल्याही गोष्टी करायच्या म्हणजे तीच अवस्था! म्हणजे स्नोट्युबिंगला जायचं की सगळं स्नोगिअर पाहिजे. कुठला खेळ खेळायचा तरी त्याचं गियर पाहिजे. फुटबॉलला बूट वेगळे आणि बास्केटबॉलला वेगळे! खेळ खेळायचा म्हणजे आधी दुकानात चक्कर पाहिजेच. लहान असताना कुठलाही खेळ गियरशिवाय खेळायची सवय होती. जुगाड करायची सवय ही देशी माणसाला लहानपणीच्या खेळांतूनच लागत असावी बहुधा. फुटबॉल खेळताना ज्याच्याकडे फुटबॉल असायचा तो आला नाही तर गोल दगड घेऊनसुद्धा फुटबॉल खेळलो आहोत. खेळायचं जाऊदे, अगदी पोहायला जायला सुद्धा इथे आधी स्विमिंग ट्रंक, गॉगल्स, कपडे ठेवायची पिशवी… एक ना दोन कित्येक गोष्टी! अगदी आपल्याकडे मित्रमंडळी येणार असतील तरी देखील दुकानाची चक्कर काही चुकत नाही. ग्रोसरीपेक्षाही डिस्पोझेबल ताटं, वाडगे आणि बरंच काही. अमेरिकन लोकांनी आपली ही मोठी ‘बिग बॉक्स’ दुकानंसुद्धा काय छान मांडली आहेत बघा. तुम्हाला जे करायचं आहे त्याला लागणारं सगळं साहित्य एकाच आइलमध्ये मिळतं. दोन वर्षांपूर्वीच्या नाताळात जयसाठी वेगवेगळी १५ खेळणी आणली. तर सगळी बघुन आम्हाला म्हणाला, "बट व्हॉट हॅपन्ड टु द हॅरी पॉटर बुक?" आता ह्याला काय सांगावं की आमच्या बालपणी आमच्याकडे सगळी मिळून १५ खेळणी असतील. अर्थात जयची प्रतिक्रिया अतिशय योग्य होती हे मला माझ्या अमेरिकन सहकारी मित्राशी बोलून कळलं. तो मला म्हणाला ह्या नाताळात माझ्या मुलांना त्यांच्या दोन्ही आजी-आजोबांकडून संपूर्ण व्हॅनभरून खेळणी मिळाली. माझी अवस्था त्या पोट फुगवणाऱ्या बेडकीसारखी झाली होती.

अमेरिकेची जीवनपद्धती एवढी अंगवळणी पडूनसुद्धा कधी कधी गोष्टींच्या अतिरेकी वापराबद्दल एखादा लेख वाचला किंवा रेडिओवर कोणीतरी त्याचे दुष्परिणाम सांगताना ऐकले की परत मी विचारात पडतो. ह्या गोष्टींच्या निर्मितीसाठी लागणारा सगळा कच्चा माल पुरवणाऱ्या आपल्या पृथ्वीवर काय परिणाम होईल? शास्त्रज्ञ ‘हवामान बदला’बद्दल जे पोटतिडकीने सांगताहेत, त्याबद्दल आपण काहीच करत नाही अस वाटतं. अचानक ‘ईस्टर आयलंड’ आठवतो. तिथे राहणाऱ्या लोकांनी नैसर्गिक गोष्टी अतोनात वापरल्या आणि शेवटी तिथले लोक ऱ्हास पावले. किनाऱ्यावर असलेले ते प्रचंड पुतळे आपल्याला भीषण भविष्याची तर आठवण करून देत नाहीत ना? मन सुन्न होतं. गांधीजींचे शब्द आठवतात, "ही पृथ्वी जगातल्या सगळ्या माणसांच्या गरजा पुरवू शकते. पण एका माणसाचा हव्यास पुरवू शकणार नाही." त्या दिवशी काहीतरी करायला पाहिजे असा निश्चय मनात जागा झाला. नेमकी रेडिओवर एकाची मुलाखत ऐकली. तो म्हणाला, “मी आता फक्त १०० गोष्टी घेऊन जगतो. एक शर्ट म्हणजे एक गोष्ट, एक सुई म्हणजे एक गोष्ट.” मला विचार आला, बापरे! आपल्याला हे शक्य आहे का? १०० गोष्टी तर आपल्या एका कपाटातच सापडतील.

मला आठवलं, गो. नी. दांडेकर जेव्हा भ्रमंती करत होते तेव्हा त्यांच्याकडे एक वाडगा होता. ते माधुकरी मागून मिळेल ते अन्न त्यात घ्यायचे आणि खायचे. त्यानंतर त्यातच पाणी घेऊन प्यायचे. एकदा त्यांना एक साधू दिसला. जो माधुकरी मागून मिळालेले अन्न हातात घेऊन खायचा आणि पाणीही ओंजळीने प्यायचा. गोनीदा म्हणाले, हे चांगलं आहे. हे वाडगं तरी कशाला ठेवायचं?

माझ्यातला ‘मिनिमलिस्ट’ एकदम जागा झाला. म्हटलं, केवळ १००च गोष्टी वापरून जगणं तूर्तास शक्य नाही, पण आपल्याला ज्या गोष्टी नको आहेत त्या तरी देऊन टाकता येतील. ‘ऑपेरेशन क्लीनअप’ हाती घेतलं. म्हणता म्हणता खोकी भरून सामान गुडविलला देऊन आलो. मनाला हायसं वाटलं. दुसऱ्या दिवशी अचानक लक्षात आला अरे आपल्या वापरातली टोपीसुद्धा आपण त्यात देऊन टाकली. टोपीची तर गरज आहे. मग काय परत एकदा दुकानात चक्कर झाली. टोपी सोडून इतर अनेक गोष्टींची खरेदी झाली. घरी आलो आणि लक्षात आलं की टोपी आणायची राहिलीच! मग मनात विचार आला, गरज ही शोधाची जननी आहे. भारताची लोकसंख्या ही एकेकाळी दायित्व (लायबिलिटी) मानली जायची ती आता मालमत्ता (ऍसेट) मानली जाते. एकंदरीत ह्या ‘प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी’ वा सुकाळाच्या समस्येचं उत्तर गोष्टींच्या अधिक वापरातूनच मिळेल. गेल्या ३ ते ४ दशकात चीनने आणि भारताने कोट्यवधी लोकांना दारिद्रयरेषेच्या वर आणलं आहे ते अधिकाधिक लोकांच्या वस्तूंच्या वापरामुळेच. जसा हॉलंड हा देश समुद्रसपाटीच्या खाली असूनसुद्धा त्या देशातील अभियंत्यांनी भिंती बांधून, पाण्याचं नियोजन करून ट्युलिपचे मळे फुलवले आहेत. तसंच कोणाला तरी उत्तर नक्की सापडेल. अशा सकारात्मक विचारांनी मग मला धीर येतो.

काळ बदलला. हिंदी सिनेमात दिसणाऱ्या बदलांतून ते लगेच जाणवेल. ८० च्या दशकातला नायक हा गरीब वस्तीतला, खलनायक श्रीमंत, उद्योग-धंदेवाईक. आताच्या दशकातला नायक हा नवकोटनारायणच असतो! ह्या बदलत्या प्रवाहाबरोबर पूर्वीच्या म्हणीसुद्धा आता बदलायला हव्यात. ‘अति तेथे माती’?...छे हो....’अति तेथे प्रगती!’



Comments

Popular posts from this blog

संपादकीय

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे