आम्ही जातो आपुल्या गावा

निलेश मालवणकर

सदर कथा 'माझी वहिनी' मासिकाच्या सप्टेंबर २०१५च्या अंकात प्रकाशित झाली होती.

“आबा प्लीज.. थांबा.. नका ना सोडून जाऊ आम्हाला. आम्हाला हवे आहात तुम्ही.” अतुलने काकुळतीने आबांना विनवलं.

“हो आबा खरंच,” निशा - अतुलची पत्नी आणि आबांची सून - आबांना मनापासून विनंती करत होती, “आबा तुमचाच तर आम्हाला आधार आहे. माझे आईवडील तर लहानपणीच अपघातात गेले. लग्न करून या घरी आले, तर तुमच्यात मला माझे बाबाच दिसले आणि तुम्ही आतापर्यंत मला मुलीप्रमाणेच वागवलंत. प्लीज आता तुम्ही आम्हाला सोडून जायचा विचारसुद्धा मनात आणू नका.”

पण आबांच्या निर्धारात तसूभरही फरक पडल्यासारखा दिसलं नाही. त्यांनी निरोपादाखल हात वर केला आणि म्हणाले, “आम्ही जातो आपुल्या गावा, अमुचा राम राम घ्यावा!” आणि आबा अज्ञाताच्या प्रवासाला निघाले.

अतुल आणि निशाने हताश होऊन एकमेकांकडे पाहिलं. इतक्यात निशाच्या डोक्यात एक विचार आला आणि शेवटचा उपाय म्हणून ती आबांना म्हणाली, “आबा आमच्यासाठी नाही पण निदान तुमच्या लाडक्या नातीसाठी - सावीसाठी तरी थांबा. तुम्ही जर असे निघून गेलात तर कसं वाटेल तिला? तुम्ही कुठे गेलात म्हणून तिने विचारलं तर तिला काय उत्तर देणार आम्ही?”

“सावी...”
“तुमची नात आबा..सावी.”
आबांचे पाय अडखळले. सावीवरून त्यांना सावित्री आठवली. त्यांची पत्नी. जवळ जवळ चार वर्षांपूर्वी ती हे जग सोडून निघून गेली होती. पुराणातल्या सावित्रीने तिच्या नवऱ्याचे प्राण यमाच्या हातून सोडवून आणले होते, पण आबांच्या सावित्रीचं मात्र दुर्दैवाने कॅन्सरपुढे काही चाललं नाही.
क्षणभर आबा तसेच थांबले. सावित्रीच्या पश्चात आयुष्याचा त्यांना काहीसा कंटाळा आला होता. समोरचा अज्ञाताचा प्रदेश त्यांना खुणावत होता. तिथे गेल्यावर जणू त्यांना सोडून गेलेली त्यांची सावित्री त्यांना पुन्हा भेटणार होती.
पण त्याचवेळी मागे त्यांची लाडकी सावी.. आबा काही क्षण तसेच द्विधा मनस्थितीत जागीच उभे राहिले.
“बोला ना आबा, काय सांगणार आम्ही सावीला?” निशाचा प्रश्न पुन्हा त्यांच्या कानांवर आदळला. निरुत्तर करणारा तो प्रश्न होता. पायात जणू मणामणाच्या बेड्या पडल्यासारखं आबांना वाटलं. क्षणभर त्यांनी मनाशी विचार केला आणि ते मागे वळले..

********

“डॉक्टर!“ इमर्जन्सी रूममधली नर्स - रेश्मा आनंदाने उद्गारली. तिने शिंदे डॉक्टरांकडे पाहिलं. त्यांच्या अर्थातच लक्षात आलं होतं. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आलं होतं. “डॉक्टर, यू आर जीनियस..” रेश्माला त्याही परिस्थितीत दाद दिल्याशिवाय राहवलं नाही.
डॉक्टर नेहमीप्रमाणे फक्त नम्रपणे हसले. आजचा पेशंट वाचेल याची आशा साऱ्यांनीच सोडली होती. अगदी शिंदेंसारखे अनुभवी डॉक्टरसुद्धा काही क्षण साशंक झाले होते. पण लगेच मनातल्या साऱ्या शंका बाजूला ठेवत त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. शेवटपर्यंत त्यांनी हार मानली नव्हती. आणि एवढा वेळ हुलकावणी देत असलेल्या पेशंटने - आबांनी अचानक डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. डॉक्टरांनी पटापट आपलं काम संपवलं आणि रेश्माला पुढच्या सूचना दिल्या. मनावर आलेला ताण दूर करण्यासाठी एक सिगारेट ओढावी लागणार असा विचार डॉक्टरांच्या मनात आला आणि ते इमर्जन्सी रूममधून बाहेर पडले.
********

काही वेळाने अतुलला आत जाऊन आबांना पाहायची परवानगी मिळाली. अतुलने आतमध्ये प्रवेश केला. समोर बेडवर आबा पहुडले होते. अतुलची चाहूल लागताच त्यांनी डोळे उघडले. अतुलला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आलं. त्यांच्या बेडच्या शेजारी एक टेबल होतं. अतुल तेथे त्यांच्या शेजारी जाऊन बसला.
“आता कसं वाटतंय आबा?” त्याने काळजीने विचारलं.
आबांनी हातानेच ठीक आहे अशा अर्थाची खुण केली. ते काहीसे अशक्त भासत होते. अर्थात मृत्युच्या दाढेतून ते परत आले होते.
“अतुल तुला एक सांगायचं होतं.” अशक्तपणामुळे त्यांचा आवाज काहीसा खोल येत होता.
“आबा महत्वाचं नसेल तर राहू द्या. सध्या विश्रांती घ्या तुम्ही. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय तुम्हाला.”
“थोडक्यात सांगतो.” असं म्हणून आबांनी मघाचा - त्यांच्या शब्दांत सांगायचं तर - अद्भुत , सुपरनॅचरल अनुभव अतुलला सांगितला. अतुलदेखील तो अनुभव ऐकून काहीसा थक्क झाला. पण त्याने त्यांची समजूत घातली.
“आबा तुम्ही आता अशा गोष्टींचा जास्त विचार करू नका.आता फक्त आराम करायचा तुम्ही.”
“बरं बाबा. तू म्हणतोस तसं. बरं.. वेळ घालवायला म्हणून मला लायब्ररीमधून मतकरींची दोन चार पुस्तकं आणून दे म्हणजे झालं.”
“आबा... गूढकथा तुम्हाला वर्ज्य काही काळासाठी. अद्भुत, सुपरनॅचरल अनुभव आला म्हणताय आणि वर गूढकथा कसल्या वाचायला मागता? कुठलं तरी हलकंफुलकं पुस्तक आणून देईन हवं तर.”
“बरं बाबा. जशी तुझी मर्जी. आणि काय रे, निशा नाही आली अजून? तरी बरं सिंगापूर फारसं लांब नाही.”
“येईल थोड्याच वेळात. तुमच्याबद्दल कळवलं तशी लगेचच उपलब्ध झालेली फ्लाईट तिने पकडली. एव्हाना तिचं विमान पोहोचलं असेल मुंबई विमानतळावर.”
“बरं आबा, आता तुम्ही आराम करा थोडा वेळ. मी परत येतो थोड्या वेळाने.” नर्सची खुण पाहून अतुलने आपलं बोलणं आवरतं घेतलं. आबांचा निरोप घेऊन तो खोलीच्या बाहेर आला.
“त्यांचं नातीवर बरंच प्रेम दिसतंय. बरं वाटेल त्यांना तिला बघितल्यावर. घेऊन या ना सावीला त्यांना भेटायला,” मघाची नर्स अतुलशी बोलत होती.
“रेश्मा.. ”अतुल काहीसा अडखळला आणि बोलला,”रेश्मा, मला मूल नाही. मूल नाही म्हणजे.. दोन वर्षं तरी मूल होऊ द्यायचं नाही असं मी आणि माझ्या बायकोने ठरवलंय.” “ओह. आय एम सॉरी. तुमचे वडील सावीबद्दल सांगत होते ते ऐकून माझा गैरसमज झाला.”
“नो प्रॉब्लेम.”
अतुलने निशाला फोन लावला. तिने फोन उचलला, पण नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. ती काय बोलतेय ते व्यवस्थित ऐकू येत नव्हतं. कंटाळून त्याने फोन कट केला. पण ज्या अर्थी तिने फोन उचलला, या अर्थी ती हॉस्पिटलकडे यायला निघाली होती. काही वेळ तिची वाट पाहून तो कंटाळला आणि पुन्हा आबांना ठेवलं होतं, त्या रुमच्या बाहेर आला. वेळ घालवायचा म्हणून रुमच्या बाहेर येरझारा घालू लागला. तेवढ्यात व्हरांड्यातून निशा येताना दिसली. अतुलला हायसं वाटलं. जवळ आल्याबरोबर निशाने आधी आबांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांची तब्येत व्यवस्थित आहे हे ऐकून तिचा जीव भांड्यात पडला.

तिने आबांच्या खोलीचं दार उघडून आत डोकावलं. पाहिलं तर आबा बेडवर शांत झोपले होते. ती तशीच बाहेर आली. त्यांच्याशी लगेच बोलता येणार नाही म्हणून ती काहीशी खट्टू झाली होती.
अतुलने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.
“झोपले आहेत ते.”
“अच्छा. चल काही तरी खाऊन येऊ हॉटेलमधून. या धावपळीत काही खायला वेळच मिळाला नाही.”
“चल.”
दोघे लिफ्टच्या दिशेने चालू लागले.
“बाय दि वे, एक न्यूज आहे.” चालता चालता निशाने अतुलच्या डोळ्यांत पहात म्हटलं.
“कसली?”
“तू बाबा बनणार आहेस.”
चालता चालता अचानक अतुलची पावलं थबकली. निशासुद्धा थांबली होती.
“काय सांगतेस काय? पण हे कसं शक्य आहे? तू तर फॅमिली प्लानिंगसाठी गोळ्या..आणि आपलं ठरलं होतं..”
“हो.. पण मध्ये घ्यायला विसरले होते..” निशाने ओशाळून म्हटलं
अतुल काही बोलला नाही.
“तू रागावलास माझ्यावर?”
“अं… नाही, नाही,” अतुल भानावर येत म्हणाला. “अगं वेडे, प्लान थोडा पुढे मागे झाला तर त्यात रागावणार कशाला? उलट...”
“उलट काय?”
“अगं वेडाबाई, उलट ही तर आनंदाची गोष्ट आहे...”
आपण कुठे आहोत हे विसरून अतुलने निशाला मिठी मारली.
“अरे, असं काय करतोस. सगळेजण बघताहेत.” निशाने अवघडल्यासारखं करत मिठीतून सोडवणूक करून घेतली.
अतुल भानावर येऊन ओशाळला.
“नेव्हर माइंड. एवढी चांगली न्यूज दिलीस. तुला कुठे ठेवू आणि नको असं होतंय मला.”
“आणखी एक गोष्ट.पण तू रागावणार तर नाहीस ना?”
अतुलने प्रश्नार्थक नजरेने निशाकडे पाहिलं.
“मी...मला उत्सुकता आवरली नाही म्हणून मी बाळाची जेन्डर टेस्ट करून घेतली ”
“काय? काय सांगतेस?”अतुल चमकून बोलला, ”अगं पण ते बेकायदेशीर..”
“भारतात बेकायदेशीर आहे. सिंगापूरमध्ये नाही.”
“अरे हो. माझ्या लक्षातच आलं नाही.”
“रिझल्ट काय असेल ओळख पाहू ..” निशा एकदम आनंदाने फुलून म्हणाली.
एव्हाना अतुलच्या डोक्यात चक्रं फिरायला सुरुवात झाली होती.
“मुलगी...?” त्याने साशंकतेने विचारलं.
“माय गॉड. कसला मनकवडा आहेस तू. किती धमाल येईल ना मुलीला वाढवायला. एखादी राजकन्या जणू..” निशा आनंदाने म्हणाली.
पण एव्हाना अतुलचा चेहरा काहीसा गंभीर बनत चालला होता. मघाशी आबांनी सांगितलेला त्यांचा अनुभव त्याच्या डोक्यात घोळत होता.
पण निशा मात्र आपल्याच तंद्रीत होती.
“बरं आणखी एक गम्मत म्हणजे मी विमानातून येताना मुलीचं नावसुद्धा ठरवलंय.”
“निशा….” अतुल निशाकडे पाहात बोलला,”सावी तर नाही ना तू ठरवलंस..?”
“अतुल.. अतुल,” निशा थक्क होऊन अतुलकडे पाहात राहिली. “...हे तुला कसं कळलं...?”

Comments

Popular posts from this blog

मी पाहिलेला हिमालय

गृहलक्ष्मी