राष्ट्रगीत : माझे विचार

शारदा ग. सबनीस

२०२२ च्या ऑगस्ट महिन्यात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला गेलो होतो. दर दोन वर्षांनी ह्या अधिवेशनाला जाण्यासाठी आम्ही आतूर असतो. मराठी माणसे एकत्र येण्याचा आणि भेटण्याचा आनंद, उत्तम खाणे आणि उत्तम गुणांचे प्रदर्शन असलेला हा एक सोहळाच असतो. हे सर्व अनुभवत असताना एक गोष्ट मात्र मनाला खटकते.

कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी भारत, कॅनडा आणि अमेरिकेची राष्ट्रगीते गाऊन मानवंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत सर्व उत्स्फूर्ततेने गातात, मात्र अमेरिकेचे राष्ट्रगीत फक्त मंचावरील गायक/गायिकाच गातात. असे का? आम्ही ५० पेक्षा अधिक वर्षे अमेरिकेत स्थायिक आहोत आणि अमेरिकेचे राष्ट्रगीत गाताना आमचे मन तेवढेच भरून येते आणि नकळत हात छातीवर जातो. अधिवेशनाला आलेले बरेचसे लोक ह्या ना त्या कारणाने अमेरिकेत स्थायिक झालेले असावेत, पण अमेरिकेचे राष्ट्रगीत त्यांना म्हणता येत नाही हे खटकते. अमेरिकेने दिलेले पैसे, हक्क, आणि इतर सोयी ते अगदी मनापासून वापरतात आणि अनुभवतात, मात्र मनापासून ते अमेरिकन का होत नाहीत? स्वतःच्या भारतीय असण्याच्या अट्टाहासात ते अमेरिकेला विसरतात. अमेरिका त्यांच्यासाठी फक्त एक वापरायची आणि उपभोगण्याची जागा, एवढीच असते का?

अमेरिकेत जन्मलेल्या आमच्या पुढच्या पिढीला अमेरिकन असण्याचा सार्थ अभिमान आहे आणि ते योग्यच आहे. ही पिढी शाळेपासून राष्ट्रगीत आणि इतर सर्व अमेरिकन शपथ, गाणी शिकते. मात्र त्यांचे भारतातून आलेले आईवडील अमेरिकेत अनेक वर्षे राहूनही मनाने ‘अमेरिकन’ का होत नाहीत? भारताशी जोडलेली नाळ जरी तोडायची नसली तरी अमेरिकेत राहून अमेरिकन होण्याबद्दल अनास्था का? खरे अमेरिकन होणे म्हणजे अमेरिकेची विचारसरणी अभ्यासणे, त्यांच्या चालीरीती आत्मसात करणे, त्यांचा इतिहास समजावून घेणे, त्यांच्यात मिसळणे, ह्याबद्दल अनास्था का?

तुम्ही म्हणाल आम्ही अमेरिकन का व्हायचे? आम्ही अमेरिकेला येऊन बरेच काही अमेरिकेसाठी केले. वेळ दिला, आमचे कौशल्य दिले, कर दिला इत्यादी. पण तुमचे मन दिलेत का? ते तर अलिप्तच राहिले. तुम्ही इथे आलात, जे केलेत, ते सर्व स्वतःसाठी. अशावेळी राष्ट्राध्यक्ष केनेडी यांचे शब्द आठवतात, "My fellow Americans, ask not what your country can do for you, ask what you can do for your country!"

तुम्ही म्हणाल "ते (म्हणजे अमेरिकन लोक) आम्हाला कोठे आपले मानतात?” लग्न होऊन सासरी गेलेल्या प्रत्येक मुलीने जर असा विचार केला तर ती सासरी समरस होईल का? असो. समरस व्हायला वेळ लागतो हे जरी खरे असले तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे? मला जेवढे क्रिकेट आवडते तितकाच अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल आवडतो. त्यात मी मनापासून रमते. ऑफिसमध्ये सोमवारी सकाळी सोबत काम करणाऱ्या अमेरिकन कर्मचाऱ्यांशी फुटबॉलच्या गप्पा करताना मी त्यांच्यातलीच एक होऊन जाते. साडी नेसणारी ही इंडियन आहे हे ते विसरतात आणि मला त्यांच्यातलीच एक मानतात. मला भारताबद्दलही तेवढेच प्रेम आहे. भारतात काही चांगले झाले, भारताने चषक जिंकला की मन आनंदाने भरून येते. मात्र अमेरिकेतही काही चांगले झाले की सुद्धा तेवढाच आनंद होतो आणि वणवे लागले किंवा पूर आले तर त्रासही होतो. असो. मी माझे विचार मांडले आहेत. काहींना आवडतील, अनेकांना आवडणार नाहीत. मात्र मुद्दा विचार करण्यासारखा आहे.

Comments

  1. खरं आहे. बरीच वर्षे इथे राहून आपण भारतीय लोक इथल्या परंपरा, इथली प्रतिकं, सहजपणे का स्वीकारत नाही...?
    विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरवले ते गवसले तेव्हा

आप्पाची गोष्ट