भाषाविचार - अवघड जागची भाषा

मेघना भुस्कुटे

मी व्यवसायानं भाषांतरकार आहे.

भाषा, व्याकरण, प्रमाणलेखन, चित्रपट, नाटक हे माझे रसविषय. सुमारे पंधरा वर्षांपासून मराठी ब्लॉगिंग करते. काही मासिकांतून साहित्यविषयक सदर लिहिते. काही ऑनलाईन नियतकालिकांकरता संपादन करते.

माझ्या शाळेतल्या मैत्रिणीनं सांगितलेला एक किस्सा आठवतो. आम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत होतो. साहजिक कॉलेजमध्ये गेल्यावर इंग्रजीशी जुळवून घ्यावं लागलं. घेतलं.

त्याचीही सवय झाली. त्या सुमारास कधीतरी ती आणि तिची एक मैत्रीण भर वर्गात व्याख्यान चालू असताना एकमेकींशी खुसफुसत बोलत होत्या. शिकवणार्‍या प्राध्यापिका मूळच्या मराठी, पण व्याख्यान इंग्रजीत चालू. यांचं बोलणं ऐकून प्राध्यापिका वैतागल्या. त्या दोघींना उद्देशून मोठ्यांदा नि मराठीत म्हणाल्या, “अमकी आणि तमकी, माझं बोलणं चालू असताना गप्पा मारायला लाज नाही वाटत? दोघी वर्गाबाहेर चालत्या व्हा.” मैत्रीण आणि तिची मैत्रीण चुपचाप चालत्या झाल्या. घटना संपली.

पण मैत्रिणीची त्या सगळ्यावरची मल्लीनाथी मात्र मला विचारात पाडून गेली. ती म्हणाली, “अगं, ‘गेटाउट’ म्हणाल्या असत्या तर इतकी लाज नसती वाटली. पण मराठीत ‘ओरडल्या’ त्या चक्क! मला अगदी भयंकर अपमानास्पद, ओशाळवाणं वाटलं‍ गं.”

म्हणजे स्वभाषेत सगळ्याच भावना अधिक तीव्रपणे जाणवतात हे खरंय तर. अर्थात अवघडलेपणाही. नि म्हणून माणसं अवघडलेल्या प्रसंगांमध्ये हटकून परभाषा वापरतात. कुणी गेल्यावर म्हणायचे सांत्वनपर शब्द (आयम रिअली सॉरी फॉर युअर लॉस, अमक्यांकडे कंडोलन्ससाठी जावं लागेल, इत्यादी); लघवी-शौच-बाळंतपण-संभोग यांसारख्या शारीर गोष्टींविषयी बोलण्याच्या गोष्टी (डिलिव्हरी झाली, टॉयलेटला जायचं आहे, तुमची सेक्शुअल रिलेशनशिप ठीक आहे?, डिसेंट्रीचा त्रास होतो आहे जरा, काही नाही हो – यूटीआय आणि इतर गायनॅक प्रॉब्लेम्स, इत्यादी); स्वतःकडे प्रचंड व्हल्नरॅब्लिटी घेऊन आपल्या प्रेमवस्तूपाशी आपल्या प्रेमाचा उच्चार करणं (अर्थात – आय लव्ह यू, आय लाइक यू, आयम इंट्रेस्टेड इन यू वगैरे); स्वतःकडे कमीपणा घेऊन माफी मागणं (आयम सॉरी) अश्या सगळ्या वेळी माणसं परभाषेच्या आसर्‍याला जाताना दिसतात. ‘अमुक आणि तमुक यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे’, ‘पाण्याची पिशवी फुटली’, ‘बाळ आडवं आलं’, ‘माझं तुझ्यावर निरतिशय प्रेम आहे’, ‘लघवीच्या ठिकाणी फार जळजळ होते हो..’, ‘मला क्षमा करा’ वगैरे वाक्यं आपल्या बोलण्यातून जवळपास हद्दपार झाल्यात जमा आहेत.

मायभाषेच्या जागी, नक्की कुठली परभाषा वापरतात लोक? (खरं तर परभाषा हा शब्द अंमळ फसवा आहे. भाषा ओळखीची असतेच. फक्त बोलणार्‍याची पहिली भाषा मात्र नसते. असो.) जी भाषा आपल्याला आपल्या मायभाषेहून अधिक प्रतिष्ठित, अधिक शिष्टसंमत, सामाजिकदृष्या अधिक उच्चस्तरीय वाटते, अशी परभाषा लोक अश्या प्रसंगी वापरतात. मराठीच्या बाबतीत हे स्थान संस्कृत आणि इंग्रजी आलटून-पालटून बळकावताना दिसतात. मराठीत शृंगारकथा लिहिताना अवयवांकरता (क्वचित चुकीचेही!) संस्कृत शब्द वापरणार्‍या लेखकांची आणि वाचकांची गोची आठवते की नाही?! ‘असले संस्कृत शब्द वापरून लिहिल्यावर कसं काही वाटणार ‘तसलं’?’ अशी तक्रार करणार्‍या लोकांना संस्कृतच्या ऐवजी दुसरी परभाषा अधिक मानवते, इतकंच! बाकी साधी-सरळ आंबा-काकडी-मुळा वगैरे फळं-भाज्यावर्गीय परिभाषा वापरूनही चावट साहित्य लिहिलं जातंच, पण ते या दोन्ही गटांतल्या लोकांना ‘कसंसंच’ वाटतं!

असो, आत्ताचा मुद्दा मात्र थोडा निराळा आहे. त्याचं झालं असं - अलीकडच्या काळात काही साध्यासरळ ललित लेखनात शारीर क्रियांचा उल्लेख करण्याची वेळ आली असता, मी माझ्याही नकळत निराळा प्रयोग करून गेले. ‘टॉइलेटला / लघवीला जाऊन आल्यावर’ असं लिहिण्याच्या ऐवजी ‘शू करून आल्यावर’ असा प्रयोग केला. माझी स्वतःची आणि वाचकांचीही प्रतिक्रिया बघताना असं ध्यानात आलं, की यानं त्या क्रियेविषयीचा अवघडलेपणा पार संपून त्या क्रियेला एक निरुपद्रवी शरीरसुलभ क्रिया इतकंच महत्त्व उरतं. हे त्या लिखाणाच्या जातकुळीला फारच मानवलं. मग हळूहळू माझ्या सामाजिक वापरातही मी हाच प्रयोग रुळवायला सुरुवात केली. ‘मला जायचंय’ असा मोघम उच्चार न करता वा ‘वॉशरूम कुठे आहे?’ असं न विचारता, ‘मी आलेच जरा शू करून.’ असं म्हणायला लागले. बघितलं, तर लोक ते सहज स्वीकारत होते. आणि त्याहून नवलाची बाब म्हणजे त्यात अगदी इंग्रजी वापरल्यानंतर येणारी किंचित अवघडलेपणाची छायाही उरत नव्हती.

कधीतरी एकदा अतिशय विकल क्षणी जवळच्या व्यक्तीपाशी रडले. त्याबद्दल कुणा मित्राला सांगताना ‘मी भोकाड पसरलं खरं. पण मला आता बरं वाटतंय पुष्कळच.’ असं सांगितलं. त्याच्या प्रतिक्रियेनं चमकायला झालं. त्याचं म्हणणं होतं, ‘वा! हा शब्द किती नॉन-जजमेंटल वाटवतो रडण्याबद्दल! नि त्या कृतीचा साधा-सरळ अपरिहार्य निरुपद्रवीपणाही ठसवतो.’ खरंच की. कशानं असेल?

तर लक्ष्यात आलं, की शू, शी, भोकाड हे शाळकरी – त्यातही प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शाळकरी – शब्द. तेव्हाच्या आपल्या मनाला या सगळ्या गोष्टींबद्दल एकमेकांना जोखण्याचा विचार शिवलेलादेखील नसतो. एखाद्या क्रियेबद्दल वा संदर्भाबद्दल मनात अवघडलेपणा असणं नि मग तो परभाषेच्या आवरणाआड दडवणं – यापेक्षाही हे परिणामकारक. कारण हे शब्द वापरले की आपोआप आपण तत्कालीन मनोवस्थेत शिरतो, आणि जोखण्याची इच्छा वा अवघडलेपणा हे दोन्ही अंतर्धान पावतं.

शाळेतल्या मित्रांना अक्षरशः अनेक वर्षांनी भेटल्यावरही कुठल्याही विषयावर निर्विष-निस्संकोचपणे केलेल्या, दुथडी भरून वाहिलेल्या, अतिशय मोकळंमोकळं वाटवणार्‍या, भरभरून मारलेल्या गप्पा आठवल्या. असं लक्ष्यात आलं, की जरी आपण शाळेत असताना एकमेकांशी ‘मुलांशी / मुलींशी आपण नाही बॉ बोलत’छाप वागत आलो असलो, तरीही, इतक्या वर्षांनंतरही, जगातल्या बर्‍याच अवघडलेल्या विषयांवर आपण याच मित्रांशी आणि मैत्रिणींशी कुठल्याही संकोचाशिवाय आणि जजमेंटशिवाय बोलू शकू. कारण आपण एकमेकांना छातीवर सेफ्टीपिनने रुमाल आणि नावाचा बॅच टाचलेला असताना, ‘बाई, शू करायला जाऊ?’ असं विचारताना, मैदानावर दाणकन आपटल्यावर वा आई शाळेत सोडून गेल्यावर अनावर रडताना बघितलं आहे; आणि त्यानं आपल्यात काहीतरी बंध बांधला गेला आहे. हाच बंध भाषा जागा करत असेल का?

मला एकदम भाषिक अवघडलेपणावरचं रामबाण उत्तर सापडल्यागत ‘हुर्रे!’ झालं! अर्थात – प्रेम आणि संभोग – या दोन प्रांतात हे उत्तर अजिबातच कामी येणार नाही. कारण लैंगिक कृतींबद्दलचा किंचित अवघडलेला, किंचित व्हल्नरेबल, किंचित शृंगारातुर भाव नसेल, तर या भावना व्यक्त करण्यात हाशील तरी काय?!

तर - शृंगारलेखकांची गोची तूर्तास बर्करार. पण इतर प्रांतात मात्र मला अत्यंत ‘लिबरेटेड’ – होय, होय, आयमायस्वारी, मोकळं-मोकळं! – वाटतंय!

Comments

Popular posts from this blog

व्हर्च्युअल शाळेचे इ-विद्यार्थी

हरवले ते गवसले तेव्हा