संपादकीय


ऑक्टोबर २०२२
अंक ४


मैत्र संपादक मंडळ २०२ 

वरदा वैद्य 

विदुला कोल्हटकर 

रोहित कोल्हटकर 

कपिल धाकड 

मधुर पुरोहित 

 

बाममं कार्यकारिणी २०२ 

अध्यक्ष 

मोनिका देशपांडे 

उपाध्यक्ष 

रुचिरा महाजन  

 उपाध्यक्ष- विपणन 

शिल्पा बेंगेरी  

चिटणीस 

स्मितेश लोकरे 

खजिनदार 

दीपान्विता काळेले 

सह-खजिनदार 

रमा गंधे



नमस्कार मंडळी,


दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास
दिवाळी म्हणजे पणत्यांचा आणि आकाशकंदिलांचा प्रकाश
दिवाळी म्हणजे रोषणाईची झगमग
दिवाळी म्हणजे खरेदीची लगबग
दिवाळी म्हणजे उटण्याच्या सुगंधाचा दरवळ
दिवाळी म्हणजे नातेवाईक आणि इष्टमित्रांची वर्दळ
दिवाळी म्हणजे हसऱ्या क्षणांची साठवण
दिवाळी म्हणजे सहामाही परीक्षेनंतरच्या निवांत सुट्टीची आठवण
दिवाळी म्हणजे थंडीचा सुगावा
दिवाळी म्हणजे मनाला विसावा
दिवाळी म्हणजे धनधान्याची भरभराट
दिवाळी म्हणजे आनंदाची वहिवाट
दिवाळी म्हणजे हर्षोत्फुल्ल वातावरण
दिवाळी म्हणजे तनामनाला उजळून टाकणारा सण

मैत्रचा अंक तुमच्या हातात पडेपर्यंत दिवाळी उरकलेली असेल, पण दिवाळीच्या भारतातल्या आठवणी अजूनही मनात घर करून असतील. दिवाळीच्या दिवशी ऑफिसच्या कामाला सुट्टी नसण्याची सवय एव्हाना आपल्याला झाली आहे, पण भारतात लहानपण गेलेल्यांना दिवाळीच्या सुट्टीची आठवण येत असणार! ५ नोव्हेंबरला बाममंने आयोजित केलेल्या दिवाळीच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहणार असाल. ह्या कार्यक्रमाची तिकिटे तुम्ही अजून काढली नसतील तर लवकरात लवकर काढा. स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिवाळीच्या कार्यक्रमात असणार आहे.

एव्हाना काही छापील आणि ऑनलाईन दिवाळी अंक तुम्ही चाळले असतील. आपल्या स्थानिक मित्र-मैत्रिणींनी लिहिलेले लेखन खच्चून भरलेला ह्या वर्षातला चौथा आणि शेवटचा अंक तुमच्या हातात ठेवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. २०२२ सालातील पहिल्या अंकापासून आपण ‘चित्रसाहित्य’ हे सदर चालवत आहोत. ह्या अंकामध्ये त्या चित्रांवरून सुचलेला एक अनुभवपर विचार आणि राघव महाजन ह्या आपल्या बाललेखकाने लिहिलेली एक छोटी गोष्ट तुम्हाला वाचता येईल. अंकामध्ये चार नवी चित्रे समाविष्ट केली आहेत. पुढील अंकासाठी ह्या चित्रांवरून सुचलेले लेखन जरूर पाठवा. ह्याबरोबरच, ‘मधुमेह-पूर्व स्थिती’बद्दल माहिती देणारा आरोग्यविषयक लेख व भाषाविचार सदरांतर्गत ‘अवघड जागच्या भाषे’बद्दलचा लेखही ह्या अंकात वाचा. ‘केल्याने देशाटन’ ‘राष्ट्रगीत’ आणि ‘हळदीकुंकू’ हे वैचारिक लेख ह्या अंकात आहेत. ‘हवा’ आणि वस्तूंचे बंड’ ह्या दोन कविता, ‘सर्व्हिसिंग’, ‘स्वातंत्र्य’ आणि ‘आम्ही जातो आपुल्या गावा’ ह्या तीन कथा आणि ‘आठवणीत राहिलेल्या वाढदिवसा’च्या अनुभवाने हा अंक सजला आहे. दिवाळीच्या उरलेल्या फराळाच्या तोंडीलावण्यासोबत ह्या अंकवाचनाची लज्जत चाखताना तुम्हाला मजा येईल अशी आशा करतो.

दिवाळी झाली, आता हॅलोविन, थॅंक्सगिविंग, ख्रिसमस, आणि हिवाळी सुट्टीचे वेध आपल्याला लागतील. येत्या सुट्ट्यांमध्ये लेखण्या आणि किबोर्ड परजून पुढच्या अंकासाठी लेखन करण्यासाठीही थोडा वेळ काढा असे आवाहन करतो. ‘मैत्र’चा पुढील अंक नवीन वर्षात जानेवारी अखेरीस प्रकाशित होईल. त्या अंकासाठीचे साहित्य १५ जानेवारी, २०२३पर्यंत editor@BaltimoreMarathiMandal.org ह्या पत्त्यावर पाठवा. आम्ही तुमच्या लेखनाची वाट पाहात आहोत.

जानेवारीचा अंक हा २०२३ सालातला पहिला अंक असेल. ह्या अंकापासून तुम्हाला संपादक मंडळामध्ये येण्याची इच्छा असेल तर जरूर संपर्क करा. एका वर्षात मैत्राचे चार अंक निघतात. त्यातल्या एखाद्या अंकासाठी पाहुणा-संपादक म्हणून काम करण्याची तुमची इच्छा असल्यास तुमचे स्वागतच आहे. आम्हाला जरूर कळवा.

सर्वांना दिवाळी पाडव्यापासून सुरू झालेल्या नवीन व्यापारी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

कळावे,
संपादक मंडळ

मुखपृष्ठ - दिवाळी
छायाचित्रकार - प्रदीप कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

गाईड

पौराणिक कथा - भाग २ - अष्टवसूंची कथा