केल्याने देशाटन

संजीव दहिवदकर

सदर लेख ‘इंडियाआशा’च्या ‘अभिनीत’पत्रिकेमध्ये पूर्वी प्रकाशित झाला होता.

हा लेख सध्या चाळीशी ओलांडलेल्या भारतीय मध्यमवर्गाबाबत आहे. ‘केल्याने देशाटन, पंडित-मैत्री, सभेत संचार; शास्त्र-ग्रंथ-विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार” असे आपणा सर्वांना ठाऊक आहेच. ह्याचा आधार घेऊन आजकाल मध्यमवर्गीयांमध्ये परदेशवारी करण्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे. आर्थिक कुवतीनुसार ते नेपाळ, थायलंड, दुबई, सिंगापूर, युरोप किंवा अमेरिका वा तत्सम इतर देश निवडतात.

ज्या कुणी हे देशाटनाचे वाक्य लिहिले होते त्यावेळचा काळ, समाज आणि प्रवास ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता, आजच्या प्रवाश्याला अपेक्षित असलेला अनुभव का येत नाही हे लक्षात येईल. देशादेशांमध्ये जाळे पसरवलेल्या जागतिक हॉटेल आणि फास्ट-फूड कंपन्यांनी तर परक्या ठिकाणाचे नाविन्यच हरवून टाकले आहे. कोणत्याही देशात जा, एकदा का तुम्ही ‘मॅकडोनाल्ड’ मध्ये शिरलात की बाहेरचा संदर्भ पूर्ण वगळला जातो. थोडाफार फरक सोडल्यास तुम्हाला तुमच्या मायदेशापासून परक्या ठिकाणी आल्याचा बिलकूल भासही रहात नाही. ‘मॅकडोनाल्ड’ हे फक्त एक उदाहरणार्थ घेतलेले नाव. त्या जागी तुम्ही स्टारबक्स, कोर्टयार्ड, हिल्टन, सबवे वा इतर कोठलेही नाव घाला; कथा तीच.

एक मध्यमवर्गीय भारतीय जेंव्हा परदेशी भटकायला जातो तेव्हा तो कुठे जातो, कुठे राहतो, काय करतो ह्याचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की ह्यांनी ह्यांचा भारत कधी सोडलेलाच नसतो. परदेशातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यापलीकडचा परदेश ह्यांनी कधी पाहिलेलाच नसतो. परदेशी रहाणार ते ओळखीच्याच हॉटेलात. गेल्या-गेल्या शोधणार कुठे चहा मिळतोय का, दूध-साखर घालून छाऽन उकळलेला! नाही तर काढणार आपल्या सामानातून आणलेल्या पुड्या अन ओतणार गरम पाण्यात! मग म्हणणार, “ही लोकं कशी ती कडू कॉफी पितात देव जाणे....” इत्यादी, इत्यादी. नाश्ता, जेवणाच्या वेळी तशीच कथा. आता खाण्यायोग्य गोष्टीत बर्गर, पिझ्झा, फ्राईज, पास्ता अशा ‘आपल्या’ वाटू लागलेल्या पदार्थांची वाढ झाली तीदेखील जागतिक कंपन्यांमुळे (कारण ते सर्व पदार्थ आता आपल्या गावात सर्रास मिळू लागले म्हणून). केसरी, स्ट्रॉबेरी आणि इतर प्रवासी कंपन्यांनी तर ‘संपूर्ण दहा दिवस भारतीय नाश्ता आणि जेवण देऊ.’ ह्या एका वाक्यावर किती धंदा केलाय आजपर्यंत!

आता काही जण ‘अभक्ष्य भक्षण’ करणारे नसतील, ते तर कुणी तुम्हाला बळजबरीने खाऊ घालत नाही ना? तर थोड्या फार प्रमाणात परक्या देशातील पदार्थ खाऊन बघायला काय हरकत आहे? म्हणजे कमीत कमी एक वेळा तरी ‘त्यांचे’ जेवण घ्यायला मन खुले असायला हवे ना? थोडा तरी परदेशाचा अनुभव परदेशात तरी घ्यायला हवा की नाही? पोळीइतकाच ब्रेडपण पोट भरत असतो अन नुडल्सदेखील आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा देत असतात; आडवी येते ती जीभ आणि मनाची झापडे!

मान्य, तुम्हाला दारु नसेल प्यायची, पण जरा जा की त्या इंग्लंडच्या पबमध्ये आणि बघा खरंच का तिथे धांगडधिंगा असतो जसा तुम्ही कल्पिलेला असतो? घ्या की तुमचा ग्रीन टी आणि काढा जरा वेळ तिथे. आणि हो, “एवढ्याश्या चहाला ----- रुपये!” म्हणून उगाच आपल्या तोंडाचा आँ करू नका! काही वेळा पैशाची अडचण समजण्यासारखी असते. अशावेळी भले दोन स्थळं कमी बघा; पण जे काही बघाल ते नीट बघा, अनुभवा.

परदेशाला भेट देण्याआधी आपण बऱ्याच गोष्टींची माहिती काढतो. तेथील प्रेक्षणीय स्थळे, प्रवासाची साधने, वगैरे. ह्यासोबत थोडी तेथील खाण्यापिण्याबद्दलदेखील माहिती काढली तर जरा जास्त आनंद घेता येईल. तेथील लोकांची विरंगुळ्याची साधने, करमणुकीची पद्धत, इत्यादी कळले तर कदाचित खऱ्या अर्थाने तो देश अनुभवू शकाल. मग जमैका देशात पॅटीस खातांना समोस्याची आठवण येईल किंवा जर्मनीत क्रेप्स खातांना धिरडे किंवा साधा डोसा आठवेल.

बघा पटते का काही! अखेरीस समर्थ रामदासांनी म्हटले आहेच, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.’असे केल्याने ‘खरे चातुर्य’ आपणास देशाटनाने नक्कीच लाभेल.

Comments

Popular posts from this blog

गाईड

कवितेचं पान - शिशिरागम