आठवणीतला वाढदिवस
डॉ. जयश्री कुलकर्णी- खेरा |
भारतात नेत्ररोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ म्हणून शासनात उच्च पदावर काम केले. वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित. सध्या साइक्सविल, मेरीलँड येथे वास्तव्य. भटकंती, लिखाण, वाचन, संगीत, नृत्य, हेल्दी कुकिंगची आवड. |
मी औरंगाबाद महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून काम करीत होते. एके वर्षी पैठणला महापूर आला होता. मी दर वाढदिवसाची सुरवात औरंगाबादच्या वरद गणेश मंदिरातील गणपतीच्या अभिषेकाने करत असे.
त्या वर्षी १२ ऑगस्टला रात्री १० वाजता आमचे आयुक्त असीम गुप्तांचा मला फोन आला की १३ ऑगस्टच्या सकाळी तुमच्या आरोग्य विभागाची डास प्रतिबंधक जंतू फवारणी आणि स्वच्छतेसाठीची एक एक टीम पैठणला मदतीला पाठवायची आहे. तुम्ही कसेही करून त्याची सोय करा.
माझ्याकडे जंतूनाशक फवारणीचे कंत्राट घेणारे काही खाजगी कंत्राटदार होते आणि डॉक्टर्स आणि पॅरामेडिकलची टीम तर तयार होतीच. त्यांना सगळ्यांना पटापट फोन केले. कंत्राटदार एका फोनवर तयार झाला. त्यांना १३ ऑगस्टला सकाळी ६ वाजताच निघायचे होते. त्यांनी एकच अट घातली की तुम्ही आम्हाला हिरवा झेंडा दाखवा, म्हणजे आम्हाला काम करायला हुरूप येईल. आली का पंचाईत! मी म्हणाले, ‘अरे मी मंदिरात असेन त्यावेळेस, पूजेसाठी.’ तो म्हणाला, ‘आम्ही तिथे येऊ.’ आणि खरोखरंच १३ तारखेला मंदिरासमोर एक मोठ्ठा ट्रक ८० कामगार, डॉक्टर्स, नर्सेससहित उभा राहिला!
सगळे माझ्यासोबत पूजेसाठी उभे राहिले. पेढयांचा प्रसाद खाल्ला. मग मी रस्त्यावर जाऊन हिरवा झेंडा दाखविला आणि ते पैठणला रवाना झाले. डॉक्टरांचा रात्री ११ वाजता फोन आला, ‘मॅडम, आम्ही येऊ का तुमच्या घरी शुभेच्छा द्यायला?’ मी अर्थातच हो म्हणले. अक्षरशः रात्री १२ वाजता मोठ्ठा केक घेऊन ते आले, तेही दिवसभर काम करून थकले होते तरी! मला फार फार कौतुक वाटले.
नंतर पैठणला आमचा अगदी चौकाचौकात जाहीर सत्कार झाला, कारण आमची टीम तिथे साथीच्या कोणत्याही रोगांचा उद्रेक होऊ न देण्यात यशस्वी झाली होती आणि पैठण शासनाच्याआधी आमची मदत त्यांना मिळाली होती! शासनानेही माझा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार केला. हा वाढदिवस मला खूप वेगळेच समाधान देऊन गेला! हा वाढदिवस माझ्या कायमच स्मरणात राहील.
Comments
Post a Comment