चित्रसाहित्य - फक्त विक्रेते की उद्याचे उद्योजक?
बन्सरी मोडक |
"ओ ताई, वांगी घ्या की!" भाज्यांनी भरलेली पिशवी घेऊन जाताना शेजारून आवाज आला. वळून बघितलं तर एक विशीतला तरुण मुलगा मला सांगत होता. मी काही दिवस भारतात जाऊन राहिले तेंव्हाची ही गोष्ट. आता पिशवी भरून भाज्या घेतल्यावर, अजून कशाला वांगी पाहिजेत? मी मानेनंच त्या मुलाला नाही म्हटलं आणि चालू लागले. "अहो घ्या ना!" तो मुलगा. हे मला नवीन होतं!
नुकतीच अमेरिकेतून भारतात राहायला गेले होते. त्यामुळे मला आपली खाली मान घालून, तोंडाला कुलूप लावून खरेदी करायची, आणि घरी परत यायचं अशी अमेरिकन सवय होती! कारण, इथे बोलणार कुणाशी हा प्रश्न असतो. अमेरिकेत तुम्ही काय घ्यायचं, काय नाही हा तुमचा बिझनेस आहे! सरळ भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला कुणी काही विचारत नाही. तर अशी मी नवखी, भारतातली जीवनशैली आपलीशी करू लागले होते. तिथे मात्र भाजी घ्यायला जाणे, आणि तिथून उत्तम भाज्या घेऊन येणे यात एक जिवंतपणा असतो. त्या वेळेला तुम्ही समाजात जात असता, ओळखीची माणसं भेटत असतात, अनोळखी लोकांशीही चार शब्द (ते ही मायबोली मराठीत) बोलत असता, भाज्या, फळ, वस्तूपण ऋतूप्रमाणे बदलत असतात.
पण तरीही भाजी घ्या असा आग्रह मला आत्तापर्यंत कुणी केला नव्हता. हा मुलगा मात्र माझ्याशी संवाद साधत होता. मला चक्क आग्रह करत होता मी वांगी घ्यावीत म्हणून! मी थांबले. त्याच्या या आग्रहाचं, प्रयत्नांचं मला कौतुक वाटलं. अखेरीस मी त्याच्याकडून बऱ्याच भाज्या घेतल्या आणि ती पिशवी आमच्या चौकीदाराच्या बायकोला नेऊन दिली. मला आठवतंय, चौकीदार मामी खूश झाली होती. तो मुलगा मात्र माझं आटोपून लगेच दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या मागे लागला होता! खूश व्हायला त्याला वेळच कुठे होता? त्याचं ध्येय एकच होतं, जास्तीत जास्त ग्राहक पकडायचे.
त्याच्या या प्रयत्नशील स्वभावामुळे मी त्याच्याकडूनच बहुतेक वेळा भाजी घेऊ लागले. ग्राहक जोडायची कला पण त्याला अवगत होती. कधीतरी ठेल्यावर त्याची आई असायची. त्याच्याकडच्या भाज्या उन्हामुळे थोड्या सुकलेल्या असायच्या. त्याला सांगितलं, जरा आडोसा कर! त्यानं कधी केला नाही. त्याच्या मागे असणारे दुकानदार त्याला आडोसा घालू देत नव्हते. दुसऱ्या एखाद्या भागात दुकान लाव, तिथे खूप गिऱ्हाईक मिळेल असं सुचवलं. त्याने प्रयत्नही केला, पण त्या भागात ठेला लावायला तिथल्या स्थानिक नेत्याची माणसं पैसे मागत होती.
काही दिवसांनी त्याने त्याचं दुकान रात्री उशिरापर्यंत उघडं ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे ऑफिसमधून उशिरा घरी जाणाऱ्या माणसांसाठी ते दुकान म्हणजे खात्रीचा भाजी स्टॉल झाला. मला हळू हळू त्यांच्याकडची गर्दी वाढत असलेली दिसू लागली. असेच काही महिने गेले आणि काही दिवसांनी ठेल्यावर कायम त्याची आईच दिसू लागली. मी विचारलं, तर कळलं की हा मुलगा आता भाज्या चिरून त्याची पाकिटं घरपोच देतो. तो आता एक व्यग्र व्यक्ती झाला होता. काही तरुण गिऱ्हाईक मुलांनी एकत्र येऊन त्याला स्कूटी घ्यायला, कर्ज मिळवायला मदत केली आणि काही जणांनी त्याला इतर नवीन कल्पना दिल्या. त्यातून त्याने आपली उलाढाल वाढवली. त्याच्या मार्केटिंगच्या प्रयत्नांना आलेलं हे यश होतं. परिस्थितीवर मिळवलेला हा एक छोटासा पण महत्त्वाचा विजय होता. महत्त्वाचा अशासाठी की असे छोटे छोटे विजय मिळवत राहिलं तरच एखाद्याला त्यातून चांगली दिशा मिळते आणि ती एक नवीन उद्योजकाच्या प्रवासाची सुरुवात होऊ शकते. तसा तो नक्कीच चांगल्या दिशेने चालला होता.
एक गोष्ट मात्र खरी, की कुठल्याही स्थानिक नेत्याने त्या मुलाला काहीच मदत नाही केली. उलट त्याच्यासमोर अडचणीच निर्माण केल्या. जातीचं राजकारण करणाऱ्यांनी, शक्य असूनसुद्धा, आपल्याच जातीधर्माच्या एका होतकरू तरुणाला मदत नाकारली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं! त्याला आधार तसा कुठल्याच मोठ्या माणसाचा नव्हता. त्याला मदत केली, दिशा दाखवली ती सामान्य, मध्यमवर्गीय माणसांनी, ते ही जातपात, आणि भाषा न बघता!
काहीही असो, हा मुलगा कायम माझ्या आठवणीत राहिला. त्यामुळेच भारतात कुठेही विक्रेत्यांकडून काही विकत घेताना, मी त्यांच्यामध्ये नेहमी तो मुलगा लपला आहे का हे शोधत असते!
खूपदा असे विक्रेते परिस्थितीपुढे हरल्यासारखे वाटतात. सगळेच काही तरुणही नसतात. काही त्याच परिस्थितीत आनंदात, मस्त आयुष्य जगत असतात. त्यांची परिस्थिती कधी सुधारणार हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे. पण तशी ती सुधारेपर्यंत, त्यांना थोडी मदत व्हावी यासाठी, आपणही काही प्रयत्न करू शकतो का? त्यांना दिशा दाखवू शकतो का? असा विचार प्रत्येकाने करावा. भारतात असताना शक्य त्या वस्तू मी अशाच छोट्या विक्रेत्यांकडून विकत घेते. आणि, No Bargaining with Street-vendors या क्लबची पण मी जुनी सदस्य आहे. तुम्ही सुद्धा या क्लबचे सदस्य अजून झाला नसलात तर अगदी जरूर व्हा! क्लबचं सदस्यत्व फुकटच आहे. छोटंसं समाधान मिळण्याची खात्री मात्र अगदी नक्की आहे.
Comments
Post a Comment