मधुमेह-पूर्व स्थिती

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर.

मधुमेह-पूर्व स्थिती (Prediabetes) म्हणजे रक्तातील साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण वाढलेले असणे, पण इतकेही नाही की ज्याला मधुमेह म्हणता येईल. सुमारे ८.८ कोटी अमेरिकनांमध्ये ही स्थिती आढळते.

मधुमेह-पूर्व स्थिती (Prediabetes) म्हणजे रक्तातील साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण वाढलेले असणे, पण इतकेही नाही की ज्याला मधुमेह म्हणता येईल. सुमारे ८.८ कोटी अमेरिकनांमध्ये ही स्थिती आढळते. सकाळी अन्नग्रहणापूर्वी मोजलेली रक्तातली साखर १०० ते १२५ mg/dL यादरम्यान असेल तर त्याला आपण मधुमेह-पूर्व स्थिती म्हणतो. तसेच A1C हा रक्तातील साखरेचे ३ महिन्यांचे एकत्रित चित्र दाखविणारा निर्देशांक (पॅरामीटर), ५.६ ते ६.४ या घरात असणे हेही मधुमेह-पूर्व स्थितीचे लक्षण आहे.

एकेकाळी फारशी गंभीरपणे घेतली न जाणारी ही स्थिती, प्रत्यक्षात हृदयविकाराला आमंत्रण देणारी ठरू शकते असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. या स्थितीतल्या लोकांमध्ये हृदयविकाराची शक्यता ८० टक्के अधिक (म्हणजे सुमारे दुप्पट) असल्याचे दिसून आले आहे. रक्तवाहिन्यांत निर्माण होणारा दाह (इन्फ्लमेशन) हे याचे प्रमुख कारण असल्याचे सध्या मानले जाते.

मधुमेह-पूर्व स्थितीच्याही काही वर्षे आधी रक्तात अधिक प्रमाणात इन्शुलिन आढळू शकते. रात्रीच्या उपवासानंतर, सकाळी अन्नग्रहण करण्याच्या आत रक्ताचा नमुना (सॅम्पल) यासाठी घेतला जातो. रक्तातले इन्शुलिनचे प्रमाण २५ mIU/Lच्या खाली आढळल्यास ते "नॉर्मल" म्हणजे सामान्य मानले जाते. साखर किंवा पिष्टमय पदार्थ खाल्यास ते दोनशे युनिट्सच्याही वर जाऊ शकते. पिष्टमय पदार्थ (कार्ब्ज) खाण्याचा अतिरेक झाल्यास ते सतत अशा चढलेल्या स्थितीतच राहते, ज्याला हायपर-इंशुलिनेमिया असे नाव आहे. हायपर-इंशुलिनेमियामुळे मेंदू, हृदय, मूत्रपिंड (किडनी), यकृत (लिव्हर) यांची मोठी हानी होते. तसेच शरीरात कॅन्सर वाढण्यासही मदत होते.

मधुमेह-पूर्व स्थिती ही वाढते वय आणि वजन, व्यायामाचा अभाव, पिष्टमय पदार्थ (कार्ब्ज) खाण्याचा अतिरेक यातून निर्माण होऊ शकते.
मधुमेह-पूर्व स्थितीवर ताबा मिळवण्यासाठी उपाय -

१. वजन कमी करणे - BMI (Body mass index) हा आकडा तुमच्या वजनाचे उंचीशी गुणोत्तर दर्शवितो. इंटरनेटवर याचे कित्येक मोफत कॅल्क्युलेटर्स उपब्लध आहेत, ज्यात आपले वजन आणि उंचीचे आकडे घालून तुम्ही आपला BMI काढू शकता. मधुमेहाचा धोका भारतीय वंशाच्या लोकांत अधिक आढळतो. सध्या तर भारतात याची साथ आल्यासारखी परिस्थिती आहे.
भारतीय वंशाच्या लोकांत मधुमेह टाळण्यासाठी BMIची आदर्श व्याप्ती (रेंज) २२. ५ ते २४. १ मानली जाते. पण BMI निदान २५ च्या खाली आणण्याचा प्रयत्न करणे जरुरीचे आहे.

२. रोजचा व्यायाम - सुमारे ३० ते ४० मिनिटे. यात एरोबिक (चालणे, धावणे, पोहणे, उड्या मारणे) आणि स्नायूवर्धक (जोर-बैठका , डंबेल्स, वजने उचलणे ) असे दोन प्रकार पडतात. हे दिवसात २०/२० मिनिटे , किंवा दिवसाआड आलटून पालटून करणे.

३. आहारात पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी करणे - आहारात कार्ब्स दिवसाला पन्नास ग्रॅमच्या खाली नेणे आदर्श मानता येईल. एका चपातीत किंवा पावाच्या स्लाईसमध्ये सुमारे २० ग्राम कार्ब्स असतात. शाकाहारी भारतीयांना हे खूपच अवघड जाते. पण सॅलड्स/कोशिंबिरी खाणे उपयोगी ठरू शकते.

मधुमेह-पूर्व स्थितीतून बाहेर पडणे महत्वाचे आहे. हे न केल्यास सुमारे ३-४ वर्षात मधुमेह-पूर्व स्थितीचे रूपांतर मधुमेहात होऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

हरवले ते गवसले तेव्हा

आप्पाची गोष्ट