स्वातंत्र्य

योगेश सावंत

राहणार डोंबिवली.

अर्थशास्त्रात पदवीधर, सध्या खासगी कंपनीमध्ये काम करतात, कविता वाचण्याचा आणि लिहिण्याचा छंद.

मला जेव्हा जाग आली तेव्हा मी शासकीय रुग्णालयात एका खाटेवर होतो. माझ्या अंगात रुग्णाचा गणवेश होता. हाताला प्लॅस्टर होतं. अंगावर पुष्कळ ठिकाणी छोट्या छोट्या जखमा होत्या. बाजूच्या खाटेवर धोंड्या अजूनही बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याच्या डोक्याला जास्त मार लागला होता. तिथे टाकेही पडले होते. त्याच्याही अंगावर ठिकठिकाणी जखमा होत्या. आमच्या खोलीबाहेर दोन पोलीस पहारा देत उभे होते.

गेलं वर्षं माझ्यासाठी खूपच चांगलं गेलं होतं. मी तुरुंगामध्ये मस्त मजेत राहात होतो. रोज सकाळी उठायचं, मस्त गार पाण्याने सार्वजनिक अंघोळीची मजा घ्यायची. चहा म्हणून आनंदाने गढूळ पाणी प्यायचं. जोरजोरात रोजची ठरलेली प्रार्थना म्हणायची. मग थोडा वेळ कवायत करून व्हॉलीबॉल खेळायचा.

तुरुंगात खाण्याचे वांधे होते, पण माझी अन्नावरची वासना उडाल्यापासून मला काही फरक पडत नव्हता. माझा ढेरपोटेपणा नाहीसा होऊन माझं पोट सपाट झालं होतं. तुरुंगातली मित्रमंडळीही एकसे एक होती. संज्या कविता करायचा. त्याचं एक पुस्तकही प्रकाशित झालं होतं. कविता लिहिली रे लिहिली की पहिले तो आम्हाला वाचून दाखवायचा. पक्या चित्रं काढायचा. त्यांचं प्रदर्शनही लागायचं. बारक्याला इतिहासाची आवड होती. तो इतिहासातल्या गोष्टी रंगवून सांगून आमचं मनोरंजन करायचा. त्याने एक ऐतिहासिक कादंबरी लिहायला घेतली होती. लाल्या फक्त एकोणीस वर्षांचा होता. त्याला मी त्याचं शिक्षण पूर्ण करायला राजी केलं. तो अभ्यास करण्यात आपला वेळ घालवायचा. एकुणातच एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही बहुतेक जण थोडंफार आनंदात जगायला शिकलो होतो. सगळी कटुता मागे सारून या नव्या विश्वात रमत होतो. तुरुंगात वेळ जात नाही तर तुम्हाला त्याला अक्षरशः घालवावा लागतो. क्षण क्षण मोजत बसावा लागतो. तिथलं वातावरण नकारात्मक गोष्टींनी भरलेलं असतं. अशावेळी तुमचं मन कोणत्या तरी गोष्टीत रमवावं लागतं. नाहीतर भयाण एकट्या रात्रीचा लख्ख प्रकाश तुम्हाला आंधळं करून टाकतो. भिंती अंगावर येतात. तुम्ही दिवसागणिक खूप खोल खोल जात तेथेच गाडले जाता. त्यामुळे सतत चांगल्या गोष्टीचा शोध घेत राहावं लागतं. रोज रोज स्वतःला सांगावं लागतं की अजूनही आपण माणूसच आहोत. या चार भिंतीतही श्वास घेता येतो, सहज जगता येतं.

मी मात्र तसा कुठलाही छंद जोपासला नव्हता. सुरुवातीला कित्येक रात्री मी नुसताच बसून राहायचो. मी लवकरच आत्महत्या करणार असं पोलिसांना वाटायला लागलं. महाजन साहेबांनी तर माझ्यासाठी समुपदेशक बोलवायची तयारीही केली होती. मी मात्र त्यांना निक्षून सांगितलं की माझा असा कोणताही विचार नाहीये. वाटल्यास माझ्या मित्रांना विचारा. त्या सर्वांना मी तुरुंगामधलं जीवन कसं सुंदर आहे हेच सांगत होतो. सुरवातीपासूनच मी सर्व कैद्यांत व्यवस्थित मिसळत होतो. आनंदाने गप्पा मारत होतो. फक्त मी एका स्थित्यंतरातून जात होतो. त्यामुळे सुरवातीला मला रात्री झोप येत नव्हती. आता मात्र मी सुखाने झोपत होतो.

माझ्या तुरूंगाबाहेरचं जीवन मात्र नरक होतं. जन्मतः बापाचा पत्ता नव्हता. आई फक्त नावाला होती. शिक्षणात मन रमलं नाही. लहानपणापासून नाना धंदे करून पैसे मिळवले. त्याच्यापेक्षा जास्त पटीने उधळले. अनेक कंपन्यांमध्ये साहाय्यक (हेल्पर) म्हणून मर मर मरलो. शेवटी रिकामाच राहिलो. कधी कधी तर फक्त जीव जात नाही म्हणून जगत होतो.

चाळीत रोज काही न काही राडा होतच असायचा. तसा मी कोणाच्या मदतीला सहसा जात नसतो. पण त्या दिवशी बाजूचा दुरक्या दारू पिऊन त्याच्या बायकोला मारत होता. मारत कसला धू धू धुवत होता. सर्वजण मस्त तमाशा बघत होते. माझ्या डोक्यात सणक गेली. तसाच तणतणत गेलो आणि दुरक्याला एक सणसणीत चपराक लगावली. गडी धडपडत मागे पडला. पुन्हा उठला. माझ्यावर धावून आला. माझे हात पाय शिवशिवत होते. एक जोरदार लाथ त्याच्या छाताडावर घातली. तो जोराने मागे उडाला. त्याचं कपाळ थेट दगडावर दणकून आपटलं. तो पुन्हा काही उठलाच नाही. सरळ मनुष्यवधाचा गुन्हा माझ्यावर लावण्यात आला. ती पतिव्रता बाईही माझ्या विरोधात गेली. सरकारी वकील तरी जास्तीचे कष्ट कशाला घेईल? तीन वर्षांची शिक्षा झाली आणि माझं जीवनच पालटलं.

जीवनातली सगळी धावपळ नाहीशी झाली. शांत आणि संथ जीवन माझ्या वाट्याला आलं. मलाही ते आवडायला लागलं. कामाचा त्रास नाही. अन्नाचे वांधे नाहीत आणि उद्याची काळजी नाही. सुखदुःख, जीवन-मरण असल्या कायम तुच्छ वाटणाऱ्या गोष्टींवर विचार करायला भलताच वेळ मिळायला लागला. मी अध्यात्माकडे झुकलो. अनेक अध्यात्मिक पुस्तकं वाचली. राग, लोभ, ईर्ष्या, वासना यांच्या पलीकडल्या शाश्वत समाधान देणाऱ्या विश्वात मी जगत होतो. इथल्या भौतिक कष्टांपासून मी दूर दूर जात राहिलो. माझं विश्व अचानक समाधानाने भरून गेलं.

तुरुंगात आता कोणी नवीन कैदी आला की त्याला प्रवचनासाठी साहेब थेट माझ्याकडेच पाठवतात. तुरुंग हा आयुष्याचा शेवट नसून इथे एक नवीन आयुष्य उभारता येतं हे मी त्यांना सांगतो. बाहेरच्या धकाधकीच्या जीवनातून उसंत मिळून आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन तुरुंगात आल्यावर मिळतो. अर्थात तुम्ही तसा विचार करायला हवा.

महाजन सर वार्डन म्हणून आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात. कैद्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगल्या अवस्थेत ठेवण्यासाठी झटतात. बेरकी आणि लबाड जेलर सरवटेच्या हाताखाली काम करणं जिकरीचं आहे. तो जेलमध्ये औषधासाठी येणाऱ्या पैश्यांवर डल्ला मारतो आणि अर्धे पैसे स्वतःच्या खिश्यात घालतो. उरलेल्या अर्ध्या पैश्यांतही महाजन साहेब सर्व कैद्यांची व्यवस्थित काळजी घेतात. मी जेलमध्ये आल्यावर माझीही त्यांनी आस्थेने विचारपूस केली होती. माझ्या शिक्षेविरुद्ध वरच्या न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली होती. मी मात्र त्या फंदात पडलो नाही. पहिल्या दिवसापासूनच मला तुरुंगातलं जीवन आवडू लागलं होतं.

“डोळे मिटून शांत पडून राहा,” धोंड्याच्या आवाजाने माझी विचारशृंखला तुटली. “आपण शुद्धीवर आलोत याचा त्यांना पत्ता लागता काम नये,” धोंड्या हळू आवाजात कुजबुजत होता. त्याने ऑर्डर दिली की आम्हाला पाळावीच लागते. धोंड्या हा तुरुंगातल्या जहाल गटाचा मुख्य सदस्य होता, त्यामुळे त्याचं म्हणणं कोणीही टाळत नसे. नाहीतर तुरुंगात मुडदा पाडायलाही तो गट मागेपुढे बघत नसे.

“आपण त्यांना जास्त वेळ फसवू शकत नाही,” धोंड्याचा नक्की काय विचार होता मला समजत नव्हतं.

“फक्त थोडा वेळ चुपचाप पडून राहा.”

मी डोळे मिटून पडून राहिलो मग मला झोप लागली.

मध्यरात्री कसल्यातरी चुळबुळीने मला जाग आली. धोंड्या उठून कोणाबरोबर तरी दबक्या आवाजात बोलत होता. त्या अनोळखी माणसाने हॉस्पिटलचे कपडे घातले होते, म्हणजे तो हॉस्पिटलचाच कर्मचारी होता. मी उठून बसलो. काही बोलणार एवढ्यात धोंड्याने माझ्या मानेवर एक धारधार सुरा ठेवला. त्याने गप्प राहून त्याच्या मागोमाग यायला सांगितलं. तो अनोळखी इसम, धोंड्या आणि मी खोलीबाहेर आलो. पहाऱ्यावरचे दोन हवालदार मस्तपैकी घोरत होते. रात्री बारानंतर हॉस्पिटलचा मुख्य दरवाजा कुलूप लावून बंद करतात, त्यामुळेच हे हवालदार निर्धास्तपणे झोपले होते. मला एकदा काही करून त्यांची झोपमोड करायची होती, मात्र धोंड्या चलाख होता. त्याने माझ्यावर करडी नजर ठेवली होती. तो पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र मला हे तुरुंगातलं सुखी जीवन सोडायच नव्हतं.

आम्ही हॉस्पिटलातल्या मोकळ्या बोळात आलो. सगळीकडे सामसूम होती. आम्ही बाथरूममध्ये शिरलो. त्या अनोळखी माणसाने एका खिडकीचे अगोदरच सैल केलेले गज हळूच काढून टाकले आणि तिथून रस्सी खाली फेकली. आता मला त्यांचा प्लॅन हळूहळू उलगडायला लागला. मी त्या खिडकीतून डोकावून बघितलं. तिसऱ्या मजल्यावरून जमीन खाली खूप खोल वाटत होती.

“मला इथून उतरायला जमणार नाही” मी त्या दोघांच लक्ष माझ्या प्लॅस्टर केलेल्या हाताकडे वेधत म्हणालो.

“तुला इथून खाली फेकून देणार आहे मी,” धोंड्या माझ्यासमोर चाकू नाचवत म्हणाला.

“ए धोंड्या, गप् की लेका! आणि तो सुरा आत ठेव आधी, तुझा भरवसा नाय बाबा,” तो माणूस धोंड्याला म्हणाला नंतर त्याने मोर्चा माझ्याकडे वळवला.

“मी जिथे सांगीन तिथे निवांत पडून राहायचं. नायतर हा उलट्या डोक्याचा माणूस आहे. तुझापण मुडदा पाडायला मागंपुढं बघणार नाही तो.” खरंच धोंड्या उलट्या डोसक्याचा होता. दोन खुनांच्या आरोपाखाली त्याला जन्मठेप झाली होती. नंतर त्याने खासगीत आम्हाला सात खून केल्याचं कबूल केलं होतं. तुरुंगातही त्याचा भलताच दरारा होता. त्याच्या वाट्याला कोणी जात नसे. आम्हीही त्याला कायम टरकून असायचो.

नंतर त्या माणसाने आम्हाला परत मोकळ्या बोळात आणलं. दबक्या पावलांनी जिने उतरून आम्ही खालच्या मजल्यावर आलो. तो पुढे जाऊन कोणी जागं तर नाही ना याची खात्री करून घेत होता. त्याच्या इशाऱ्यावर मग धोंड्या आणि मी हळूहळू खाली उतरत होतो. मी त्यांच्या प्लॅनमध्ये खोडा घालीन असं धोंड्याला वाटत असल्यामुळे माझ्यावर त्याची करडी नजर होती. असे करत करत आम्ही तळमजल्यावर आलो. तिथे हॉस्पिटलचे भांडार होते. त्या माणसाने चावीने कुलूप उघडून हळूच भांडाराचा दरवाजा उघडला. आतमध्ये पूर्ण काळोख होता. त्याने बॅटरी पेटवली. तो आत गेला. आम्हीही त्याच्या मागोमाग आत शिरलो. भांडाराची खोली खूप मोठी होती. तिथे एका कोपऱ्यातल्या एका जुन्या कपाटात त्याने आम्हाला लपायला सांगितलं. “सगळे समजतील की तुम्ही दोघं बाथरूममधून उतरून पळून गेलात. कैदी हॉस्पिटलमध्येच लपून राहतील असे स्वप्नातही कोणाला वाटणार नाही. उद्या ते पाठीमागचं आख्खं जंगल शोधतील. त्यांचा जंगलतपास पूर्ण झाला की मग परवा तुम्ही सहज जंगलातून पसार होऊ शकाल. फक्त दिवसभर तुम्ही शांतपणे इथं पडून राहायचं. दिवसभर मी असेनच इथे त्यामुळे घाबरायची गरज नाही.”

“वा रे चित्र्या! भारी प्लॅनिंग केलंस. तो झाडावरून पडायचा प्लॅन पण मस्त होता. मी एकटा पडलो असतो तर सगळ्यांना वाटलं असतं मी मुद्दाम पडलो. मग हॉस्पिटलमध्येही माझ्यावर मोठा पहारा बसवला असता. म्हणून मग ह्यालाही पाडावं लागलं.” धोंड्या हसत म्हणाला.

बापरे म्हणजे ह्याचं प्लॅनिंग तुरुंगापासून सुरू झालं होतं तर. आम्ही तुरुंगशेती करायला जातो तिकडे आंब्याचं एक झाड आहे. त्याच्या कैऱ्या जेवणासोबत खाताना जेवण सुसह्य व्हायचं. संज्या नुकताच तापातून उठला होता. त्याच्या तोंडाला चव नव्हती. त्याच्यासाठी मला कैऱ्या तोडायच्या होत्या. त्या दिवशी गार्डच्या नकळत मी त्या झाडावर कैऱ्या काढायला चढलो तर अचानक धोंड्यापण वर आला. मी ज्या फांदीवर होतो त्या फांदीवर शंभर किलोच्या धोंड्याने जोरात उडी मारली. त्याच्या वजनाने फांदीने जीव सोडला आणि आम्ही थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. म्हणजे धोंड्याने हे सगळं मुद्दामून केलं होतं तर.

तो माणूस आम्हाला भांडारात कुलूपबंद करून निघून गेला. मी जमिनीवर बसलो. धोंड्या माझ्यावर लक्ष ठेवून होता. मी काहीतरी घोळ घालीन याची त्याला भीती वाटत होती. बसून बसून मी कंटाळलो. तासाभराने मला झोप लागली. कसल्याशा आवाजाने मला जाग आली. धोंड्या घाबरून कपाटाकडे पळायला लागला. एवढ्यात ते बंद दार उघडून महाजन साहेब दोन हवालदारांना घेऊन आत आले.

“हालू नकोस! नाहीतरी इथेच एनकाउंटर करेन,” ते धोंड्यावर बंदूक रोखत म्हणाले. हवालदारांनी येऊन त्याला बेड्या घातल्या.

“चित्र्याने भारी गेम केला” धोंड्या छाती बडवत म्हणाला. जाताजाता त्याने चित्र्याचं नावही पोलिसांसमोर उघड केलं. हवालदार धोंड्याला घेऊन निघून गेले.

मी भांडारातल्या घड्याळात पाहिलं. सकाळचे चार वाजले होते. माझ्यासमोर महाजन साहेब बसले होते.

“तू पेरलेले पुरावे मिळाले आणि त्यामुळेच मी लगेच इथपर्यंत पोचलो. धोंड्यावर माझा अजिबात विश्वास नव्हता. म्हणून मी मुद्दाम खात्री करायला रात्री हॉस्पिटलमध्ये आलो तर तुम्ही दोघेही गायब. तू पळून जाणार नाहीस याची खात्री होती. धोंड्याने तुला जबरदस्तीने त्याच्यासोबत यायला भाग पाडलं असणार याची कल्पना मला आली. त्यामुळे मग तू काही पुरावे मागे सोडलेत का ते मी शोधलं.” दोघांच्या नकळत मी माझ्या हातावरच्या जखमेची पट्टी काढली होती आणि संपूर्ण मार्गावर रक्ताचे छोटे छोटे डाग उमटले होते. महाजन साहेब ते नक्कीच शोधून काढतील याची मला खात्री होती.

“काहीही झालं तरी धोंड्या सुटायला नकोच होता. माणूस नाही, सैतान आहे तो. त्यामुळे मी त्याला सहजासहजी मुक्त होऊ दिलंच नसतं,” मी म्हणालो.

“तुला आठवतंय का मी एकदा सर्वाना विचारलं होतं की इथून बाहेर पडल्यावर तुम्ही काय करणार? आणि तेव्हा तू म्हणाला होतास हिमालयात जाऊन शांतपणे जीवन व्यतीत करणार.” महाजन साहेब थोडं थांबून म्हणाले.

“होय सर,”

“आता हिमालयात जायची वेळ जवळ आलीय.”

“मी समजलो नाही सर?” मी गोंधळून विचारलं.

“मी तुला सोडतो. तू इथून दूर हिमालयात निघून जा. त्याची सगळी व्यवस्था मी करतो.”

“कशाला तुम्ही स्वतःहून आगीत उडी घेता? ते जेलरसाहेब तुम्हाला सोडणार नाहीत. तसंही मला इथलं जीवन आवडतं. मला बाहेर नाही जायचंय.”

“त्या जेलरचा विषय सोड, त्याच्याशी सौदा करायला माझ्याकडेही पुरेसा माल आहे.”

“पण माझ्यासाठी कशाला वापरता? तुम्हाला पुढे कधीतरी त्याचा वापर करता येईल.”

“तो तुझा हक्क आहे!”

“मला माहित नाही मला बाहेर नीट जगता येईल की नाही.”

“कधीतरी बाहेर पडावंच लागणार. किती दिवस तुरुंगात राहणार? आता तुला जीवन जगण्याची नवी दृष्टी मिळालीय. तिचा वापर करून नवनवीन अनुभव घे. तुझं विश्व अधिक समृद्ध कर. ह्या तुरुंगापुरतं स्वतःला मर्यादित करू नको. मला माहितीये हे तू नक्कीच करशील म्हणून मी जोखीम घेतोय.”

“मला जमलंच नाही तर? आयुष्यातला हा मोठा बदल मला मानवला नाही तर?”

“बदल हा आयुष्याचा नियम आहे. तो टाळता येत नाही. काही घडलं तर मी आहेच. मी तुला पुन्हा तुरुंगात डांबेन. पण अगोदरच स्वतःला मर्यादित करू नकोस. जेल तुझं घर नाहीये, हे विश्व तुझं घर आहे. तुझं घर तुला साद घालतंय. तुझं स्वातंत्र्य तुला बोलावतंय. जेलमध्ये येणं ही एक संधी होती. तिचा तू पुरेपूर वापर केलास. तशीच इथून बाहेर पडणंही एक संधी आहे. तू उगाच हिमालयात जातो असं बोलला नसशील. तशी स्वप्नंही तू पाहिलीच असशील!” महाजन साहेब बोलत होते ते खरंच होतं. मला हिमालयाची स्वप्न पडत होती. तिकडे जाऊन एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली पुढचं जीवन व्यतीत करायचे विचार माझ्या मनात घोळतच होते.

आता थोड्याच वेळात नव्या दिवसाची नवी पहाट उगवणार होती आणि माझ्याही आयुष्यात एका नव्या पहाटेचं आगमन होणार होतं. येणाऱ्या नव्या दिवसाला भरभरून जगायला मी सज्ज होत होतो.

Comments

Popular posts from this blog

गाईड

कवितेचं पान - शिशिरागम