हळदीकुंकू
भाग्यश्री साने |
|
मैत्रिणींनो, गौरी गणपती, नवरात्रीची गडबड आता संपली असेल.सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या मैत्रिणी, कोणाची आई, कोणाच्या सासूबाई हळदीकुंकवासाठी घरी आल्या की किती आनंद होतो ना आपल्याला! सगळ्याजणी नटून थटून, सुंदर भरजरी साड्या नेसून, छान साजेसे दागिने घालून एकमेकींकडे जातो, एकमेकींना हळदीकुंकू लावतो, प्रेमाने दिलेलं छोटं-मोठं वाण घेतो, एकमेकींनी केलेल्या चविष्ट पदार्थांचं कौतुक करतो, मैत्रिणीनं केलेल्या सगळ्या सजावटीची आणि तिच्या सौंदर्यदृष्टीची स्तुती करतो. एवढंच नाही तर, नवरात्रीमध्ये आपल्या दक्षिण भारतीय मैत्रिणींच्या घरच्या गोलूलादेखील हौसेनं जातो. त्यांच्या परंपरेचं कौतुक करत या वर्षी कोणत्या बाहुल्या नवीन घेतल्या असं कुतूहलानं विचारतो. संक्रांत, चैत्रगौरी, सत्यनारायण पूजा, महालक्ष्मी, गोलू अशा वेगवेगळ्या समारंभांच्या निमित्ताने होणारं हे हळदीकुंकू आपल्या सामाजिक आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे हे नक्की!
तुम्ही कधी विचार केला आहे का की या सगळ्यांमुळे आपल्याला काय मिळतं? आपली परंपरा तर राखली जातेच, पण त्याबरोबर आपल्या मैत्रिणी भेटतात, नवीन मैत्रिणी जोडल्या जातात, चार गोष्टी हितगुजाच्या बोलता येतात, आपलं ऑफिस आणि घर सोडून इतर माणसं भेटतात, एकमेकींच्या गुणांची ओळख होते, मैत्रिणींच्या सहवासातले ३-४ तास अतिशय मंत्रमुग्ध होऊन जातात आणि एक प्रकारची नवीन ऊर्जा आपल्याला देतात. एक प्रकारची भावनिक गरज भागवतो हा समारंभ असं म्हणा हवं तर!
पण दुर्दैवाने तुमच्या एखाद्या मैत्रिणीला नुकतंच वैधव्य आलं असेल तर तुम्ही तिला हळदीकुंकवाला बोलावता का? किंवा मैत्रिणीची विधवा आई, विधवा सासूबाई तिच्या घरी आल्या असतील तर त्यांना हळदीकुंकवाचं आमंत्रण'देता का ? बोलावलंत तर गोंधळून जाता का की हळदीकुंकू लावावं की नको? ओटी भरावी की नको? पण आपली एखादी मैत्रीण अविवाहित असेल किंवा मुसलमान असेल तर तुम्हाला प्रश्न पडतो का की तिला बोलवावं का नाही? हळदीकुंकू लावलं तर त्यांना आवडेल का? हे प्रश्न आपल्यापैकी सगळ्यांना कधी ना कधी पडले असतील, त्यासाठी हा एक लेखप्रपंच.
माझं बालपण अतिशय कर्मठ अशा कुटुंबात गेल्यामुळे आमच्याकडे आजीची हळदीकुंकवावर खास श्रद्धा. इतकी की ती आंघोळ करताना देखील कुंकू पूर्णपणे पुसत नसे, अपशकुन नको म्हणून! सवाष्ण मरण यावं यासाठी आजीने किती उपास - तापास केले त्यांची गणतीचं नाही. तिच्या नशिबानं तिला सवाष्ण मरण आलं देखील, पण सगळ्यांच्याच बाबतीत असं होईल असं नाही. अनेक स्त्रियांना अकाली वैधव्याला सामोरं जावं लागतं. माझ्या ओळखीत अनेक बायका अशा आहेत की ज्यांनी वैवाहिक आयुष्यापेक्षा जास्त वर्षं वैधव्यात काढली आहेत. अशा बायकांनी काय करायचं ? त्यांच्या भावनिक गरजांचं काय? आपल्याकडे अगदी लहानपणापासून म्हणजे अगदी वयाच्या पहिल्या वर्षांपासून आपल्या कपाळावर कुंकू लावलं जातं. आई, आजी यांच्याबरोबर घरोघरी हळदीकुंकवाला गेल्यावर लहान मुलींनासुद्धा आवर्जून हळदीकुंकू लावलं जातं. लग्नानंतर अचानक या हळदीकुंकवाचं नातं नवऱ्याशी जोडलं जातं आणि मग सवाष्ण, विधवा असा भेदभाव व्हायला लागतो.
दुर्दैवानं माझे बाबा आणि सासरे दोघेही आज हयात नाहीत. २०१२ साली वडील अपघातात वारल्यानंतर माझी आई २०१४ साली अमेरिकेत माझ्याकडे आली होती. त्या नवरात्रीमध्ये माझ्या एका मैत्रिणीने आईला आग्रहाने हळदीकुंकू आणि भोंडल्याला बोलावलं होतं. बाबांच्या निधनानंतर पहिल्यांदाच आईला कोणीतरी हळदीकुंकवाला बोलावलं होतं. त्यामुळे तिच्या मनात चलबिचल चालू होती, जावं का नाही. पण अखेर माझ्या आग्रहाखातर ती आली. मैत्रिणीच्या घरी आम्ही सगळ्या जणी सोफ्यावर बसलो होतो. मैत्रीण एकेकीला कुंकू लावून वाण देत होती. माझ्या आईपाशी आल्यावर तिने इतक्या सहजपणे आईला विचारलं 'काकू, कुंकू लावू ना?' आईदेखील पटकन हो म्हणाली आणि आईच्या चेहऱ्यावरचा आनंद मला फार काही सांगून गेला. तिनं बाकीच्या मैत्रिणींना जसं हळदी कुंकू आणि वाण दिलं तसंच आईला देखील दिलं. कोणतंही अवघडलेपण न आणता मैत्रिणीने सहजतेने तो प्रसंग हाताळला. तसं बघायला गेलं तर कुंकू लावणं ही अतिशय साधी गोष्ट आहे, पण हीच साधी गोष्ट एखादीला मुद्दाम होऊन कुंकू न लावता तिच्या नवऱ्याच्या नसण्याची जाणीव करून देण्याइतकी जालीम सुद्धा होऊ शकते हे त्या दिवशी मला जाणवलं. माझ्या त्या मैत्रिणीच्या इतक्या साध्या कृतीने तिने आईच्या मनात तर घर केलंच पण मला सुद्धा कायमस्वरूपी आपलंसं केलं हे वेगळं सांगायला नको.
तीच गोष्ट घरातल्या गौरी गणपतीची आणि इतर सणवारांची. ज्या बायकांनी आयुष्यभर गौरी गणपतींचं सोवळं ओवळं निगुतीने पाळलं, त्यांच्यासाठी पंचपक्वान्नांचे प्रसाद रांधले, जेवणावळी उठवल्या, हळदीकुंकवाचे समारंभ पार पाडले, अशा बायकांना एका क्षणात नियतीच्या विधिलिखितामुळे या सगळ्या गोष्टींपासून तोडून टाकणं बरोबर आहे का? शास्त्र पाळायचं म्हणून जर कोणाला या गोष्टींचं पालन करायचं असेल तर थोडं संवेदनशील राहून या गोष्टी करता येणार नाहीत का?
जेव्हा जवळची माणसं, जसं की नणंद,जाऊ, भावजय, जवळची मैत्रीण, अगदी मुलगीसुद्धा असा भेदभाव करतात तेव्हा तो जास्त वेदनादायी असतो. पूर्वीच्या काळी विधवा स्त्रीला वेगळ्या खोलीत बसवून आत माजघरात सवाष्ण बायकांची ओटी भरायची पद्धत होती. आजच्या काळात या पद्धती पाळायलाच हव्यात का? एखाद्या व्यक्तीला असं कळत-नकळत दुखावून कोणता देव प्रसन्न होणार आहे? बाजीराव मस्तानी या हिंदी सिनेमातल्या संवादाप्रमाणे 'घाव तो अपनोंके ज्यादा चुभते है!' अगदी खरं आहे हे! बऱ्याच वेळा कोणाच्या मनात नसेलही पण उघडपणे, विश्वासात घेऊन न बोलल्यामुळे नकळत एखादीचं मन दुखावलं जातं. अशा वेळी जास्त संवेदनशील राहून आपल्या माणसांना जास्त जपायला हवं, नाही का?
आपला आयुष्याचा साथीदार सोडून गेल्यावर निर्माण झालेली पोकळी ही कधीही न भरून येणारी असते. एकांतामध्ये ही पोकळी त्यांना खायला उठत असेल, अनेकदा नकळत डोळे भरून येत असतील. पण चार -चौघांमध्ये कुंकू न लावून त्या दुःखाचीं जाणीव करून द्यायची खरंच गरज आहे? आपल्या मुलांना आपण कायम 'be kind, be sympathetic, be sensitive' असं शिकवत असतो. आपणसुद्धा हळदी कुंकवाच्या बाबतीत त्याचं पालन करायला काय हरकत आहे? पुढच्या वेळेस अशा प्रसंगी त्या मैत्रिणीला किंवा काकू अथवा मावशीला विचारूया का की "हळदीकुंकू लावू ना?" तुम्हाला काय वाटतं?
Comments
Post a Comment