निरागस मैत्री : एक आठवण

राहुल रामजी काटवाणी

मूळ गाव अमळनेर. सध्या पोलीस इन्स्पेक्टर या पदावर अंधेरी, मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत.

वर्ष नक्की आठवत नाही, पण साधारण १९९२-९३ मधील बालपणातील एक आठवण आहे. त्याकाळी ‘बर्थडे सेलिब्रेशन’ वगैरे प्रकार नव्हता, पण जिवलग मित्राचा वाढदिवस म्हणून मी आणि माझा मित्र अविनाश शेळके खूप उत्सुक होतो.

सकाळी ११ वाजताच संदीपच्या रेल्वे क्वाटर्सच्या घरी पोहोचलो. तेव्हा संदेशकडून समजले की वाढदिवस हा संध्याकाळी साजरा करायचा असतो. मग काय, परतलो!

अवीच्या डोक्यात आले की संदीपला काहीतरी भेट दिली पाहिजे. अर्थात खिश्यात दमडीचा पत्ता नाही, तरीदेखील जवळील एका दुकानात (सारिका स्टोअर्स) गेलो. दुकानाची मालकीण खूप चतुर होती. १० रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंतच्या वस्तू, पुस्तके, वह्या दाखवू लागली.

"काकू काहीही करा, पण आम्हाला ३ ते ४ रुपयांपर्यंतचे चांगले गिफ्ट द्या," अविनाश त्यांना सांगत होता. शेवटी त्यांनी ‘व्यापारी’ नावाचा खेळ दाखविला. किंमत ५ रुपये.

“अरे, पण हा खेळायचा कसा?” मी विचारलं.

“सोपा आहे रे, मी शेजारच्या ढबु बहिणीसोबत खेळतो. संदीपला खेळता येत असेल. नाहीतर मी शिकवीन,” अवि बोलला.

बजेटमध्ये असल्यामुळे आमचं ठरलं. अडीच-अडीच रुपये काढू. अवीच्या घरी त्याची आई रागवायला लागली. शेवटी १ रुपया दिला. पण ऐकेल तो अवि कसला, पठ्ठ्याने देव्हाऱ्यातले दीड रुपये उचलले! मला घरून ३ रुपये मिळाले. पुन्हा दुकानात गेलो, खेळ विकत घेतला. उघडे गिफ्ट कसे द्यायचे म्हणून उरलेल्या ५० पैशांचा गुलाबी रंगाचा घोटीव कागद घेतला. माझ्या घरी आलो आणि मोठ्या मेहनतीने खोका पॅक केला.

साडेपाचला थेट संदीपच्या घरी गेलो. नाना आणि काकू दारातच भेटले.

“पोरांनो, थांबा. आम्ही बाजारात जाऊन येतो,”नाना म्हणाले.

अवि म्हटला, “अरे, आत्ताच कसं गिफ्ट दाखवायचं?”

आम्ही दोघे परत फिरलो आणि रेल्वे स्टेशनच्या पायऱ्यांवर बसलो. नंतर पुन्हा संदीपच्या घरी!

या वेळी गिफ्ट कुंपणाच्या शेजारी लपविलं. अंगणातल्या बंगळीवर संदेश, संदीपसोबत आम्ही दोघं गप्पा मारत बसलो. काही वेळाने काकू, नाना आले. संदीप पटकन पिशवी घेऊन आत गेला. तयारी चालू झाली.

संदीपने छानसा फिक्कट पोपटी रंगाचा नवीन शर्ट घातला. आजी, काकू, ताईने ओवाळले. केक कापला. गडबडीत कोणी ‘हॅप्पी बर्थ डे टू यू’ गाणे म्हटलेच नाही, फक्त टाळ्याच वाजवल्या. अविनाशने पटकन लपवून ठेवलेलं गिफ्ट संदीपला आणून दिलं. खूप मजा आली.

कदाचित संदीपपेक्षा आम्हीच जास्त खुश होतो, कारण आयुष्यात प्रथमच जिवलग मित्राचा वाढदिवस साजरा करत होतो. संदीपला हे आठवत असेल का?

निरागस बालपणातले दिवस सहज आठवले. मंतरलेले दिवस होते ते! सोशल-मीडिया, दिखाऊपणा, कृत्रिम प्रेम व जागतिकीकरणाचे वारे वाहण्यापूर्वीची निरागस मैत्री. आपल्या प्रत्येकाच्या बालपणातल्या अशा कित्येक निरागस आठवणी असतील.

Comments

  1. एक नंबर 👌👌👌👍👍👍

    ReplyDelete
  2. मित्राने मित्राला दिलेली ही अनमोल भेट आहे!

    ReplyDelete
  3. Very nice great Rahul

    ReplyDelete
  4. Padmakar Sudhakar KulkarniApril 30, 2023 at 3:21 AM

    Ek no mitra

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय