चित्रसाहित्य - चिरंतन

विदुला कोल्हटकर

"नवीन युगात चालणारी नवीन तंत्र शिकायला पाहिजेत ना," फोनमधून आर्यनचा जरा वाढलेला आवाज ऐकून माधुरीच्या कपाळावर आठी आली. .

"अरे हो, पण तू मागच्याच वर्षी वकील झालास, घरी बाबांचीच जोरात सुरु असलेली वकिली आहे. लोकं त्यांच्याबरोबर काम करायला धडपडत असतात. तुला पण या व्यवसायाची चांगली जाण आहे. गेलं वर्षभर तू उत्तम काम करत होतास आणि आता हे काय मधेच? सगळं सोडून AI मधली डिग्री घ्यायची कशाला?" माधुरीचा आवाज पण चढला.

"अगं आई, कालच आपण chatGPT बद्दल बोलत होतो. तू स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहेस. तुला हे कसं लक्षात येत नाही की इथून पुढे आपण सगळेच कळत नकळत AI वापरणार आहोत? बरं जाऊ दे, प्रत्यक्ष भेटल्यावर बोलू," असं म्हणत जरा रागावूनच आर्यनने फोन ठेवला.

तो बंद झालेला फोन हातात घेऊन ती तशीच उभी राहिली, आता याला कसं समजवावं याचा विचार करत. हातात असलेला, जमणारा, चांगला चालणारा व्यवसाय सोडून याचं काहीतरी भलतंच!

विचारांतून बाहेर पडत तिने समोर बघितलं तर समोर गोल गरगरीत पौर्णिमेचा चंद्र. ‘वा! काय सुरेख दिसतोय चंद्र’ तिच्या मनात आलं आणि लक्ष आजूबाजूला गेलं. खाली शंकराच्या देवळात गर्दी आणि बरेच दिवे लागलेले दिसत होते. लहानपणी रात्री आजीबरोबर शंकराच्या देवळात गेल्याचं आणि असेच दिवे लागलेले बघितल्याचं तिला आठवलं. 'आज त्रिपुरी पौर्णिमा असावी' माधुरीच्या मनात आलं. मग पुन्हा चंद्राकडे एकटक पाहता पाहता आर्यन, वकिली, AI या विचारचक्रात ती अडकली. ‘सगळं चांगलं चाललेलं सोडून याचं काहीतरी भलतंच. काय करायचं काही कळत नाही,’ मनातल्या मनात ती म्हणाली. अचानक गॅलरी हलल्यासारखी वाटली आणि तिने कठडा धरायला हात पुढे केला पण हातात आली ती झाडाची फांदी. काही कळायच्या आतच शेजारी कोणीतरी उभं असल्याची तिला जाणीव झाली.

'सगळं चांगलं चाललेलं सोडून याचं काहीतरी भलतंच, काय करायचं काही कळत नाही' कोणीतरी पुटपुटलं. तिने चमकून मान वळवून बघितलं तर शेजारी धोतर, शर्ट आणि त्यावर कोट घातलेला एक माणूस उभा होता. त्याला बघून ती चमकली. अचानक हा कोण माणूस आपल्या गॅलरीत आला म्हणून घाबरली. त्याच्याकडे पुन्हा बघितलं तर तो देखील चांगलाच गडबडलेला दिसला.

"कोण तुम्ही?" तिने जरा चढ्या आवाजात विचारलं.

"मी? मी भिकाजी देशपांडे," तो म्हणाला.

"कोण भिकाजी देशपांडे? आणि माझ्या गॅलरीत कसे आलात?" तिने जरा दरडावून विचारले.

"मी तुमच्या...?" भिकाजीपंत चाचरत म्हणाले. तिने इकडे तिकडे बघितलं तर तिच्या लक्षात आलं आपण गॅलरीत नाही तर रस्त्याच्या बाजूला एका झाडाच्या पाराजवळ आहोत. आपण इथे कसे आणि कधी आलो या गोंधळात ती पडली. समोर गॅलरीतून दिसणारं शंकराचं देऊळ दिसत होत आणि बरेच दिवे लावलेले दिसत होते. 'त्रिपुरी पौर्णिमा!' पुन्हा तिच्या मनात आलं.

"काय करायचं काही कळत नाही" भिकाजीपंत पुन्हा म्हणाले.

"काय?" माधुरीने विचारलं.

“मी कसाबसा मॅट्रिक झालो आणि आमच्या स्मिथ अँड बेन्सन कंपनीमध्ये चिकटलो ते आजतागायत. माझा थोरला मुलगा शरद गेल्या वर्षी मॅट्रिक झाला, चांगला फर्स्टक्लास मिळाला. आमच्या चीफ अकाउंटन्टकडे शब्द टाकून त्याला आमच्या कंपनीत लावून घेतला. पहिले सहा महिने झाल्यावरच कायम झाला. म्हटलं नशीब काढलं पोरानी. पण नाही! आता याच्या डोक्यात वेगळंच खूळ भरलंय, म्हणे इंजिनियर व्हायचंय!” भिकाजीपंत म्हणाले. “चांगली हातात असलेली पर्मनंट नोकरी सोडून याचं भलतंच काहीतरी! मी असा पहिल्या सहा महिन्यात पर्मनंट झालो असतो तर गावाला पेढे वाटले असते. पण याचं भलतंच, म्हणे ‘त्यात काय, त्यांना कारकून हवेत आणि मी झालो. पण मला त्यात रस नाही.’ काय तर म्हणे, ‘जग बदलतंय. आता स्वातंत्र्य मिळाल्यावर नवे कारखाने उघडतील किंवा उघडावे लागतील आणि त्याला इंजिनीयर लागतीलच.’ चांगली पर्मनंट नोकरी सोडून पुन्हा शिकायला जायचं. काहीतरीच याचं!” म्हणत भिकाजीपंतांनी सुस्कारा सोडला.

माधुरी चमकून त्यांच्याकडे बघायला लागली. ‘काय म्हणाले हे? आता स्वातंत्र्य मिळाल्यावर? म्हणजे? पण आपली आणि यांची कथा एकच म्हणायची,’ तिच्या मनात आलं. आणि इंजिनीयर व्हायचंय ऐकल्यावर हा तर जिव्हाळ्याचा विषय याची तिच्या मनाने नोंद घेतली.

“आमच्याकडे पण हीच कथा आहे,” ती म्हणाली.

आता चमकून बघायची पाळी भिकाजीपंतांची होती.

"काय झालं?" त्यांनी विचारलं.

"हेच. मुलगा काहीतरी भलतंच खूळ घेऊन बसला आहे. पण तुमच्या मुलाला इंजिनीयर व्हायचंय म्हणालात ना? होऊ दे की!" तिला तिच्या शिक्षणाच्या वेळेस झालेल्या चर्चा, वाद आठवले. चांगल्या श्रीमंत स्थळाकडून मागणी आली होती तिला. ते पुढे शिकवायलाही तयार होते, पण माधुरीच अडून बसली होती की मला इंजिनियर व्हायचंय म्हणून. लग्न करायचंच नाही असं नाही, पण आत्ता नाही. अखेर तिच्या वडिलांनी परवानगी दिली आणि तिचं शिक्षण सुरु झालं. त्या काळात ती धरून आणखी केवळ ३ मुली कॉलेजात होत्या. तेव्हा आता या भिकाजीपंतांच्या मुलाला मदत करायला हवी असा विचार करत तिने भिकाजीपंतांना विचारलं, "मला सांगा तुम्ही मूळचे कुठले?"

"कोकणातला," भिकाजीपंत म्हणाले.

"मग तुम्ही गाव सोडून इकडे कसे आलात?" माधुरीने विचारलं.

"काय थोडीफार जमीन होती, पण पाण्याचा आणि निसर्गाचा काय भरवसा? कधी पोटापुरतं मिळायचं, कधी नाही, कधी एखाद्या वर्षी पुष्कळ. या अनिश्चितततेचा कंटाळा आला आणि इकडे बऱ्याच नोकऱ्या होत्या. त्यामुळे नाही म्हटलं तरी खात्रीशीर पगार. मग विचार केला आणि आलो गाव सोडून," भिकाजीपंत म्हणाले.

"म्हणजे होतं त्यापेक्षा काहीतरी वेगळं, जास्त मिळवायला आलात ना?"

भिकाजीपंतांनी होकारार्थी मान डोलावली.

"मग आता तुमचा मुलगासुद्धा जे आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं, जास्त मिळवायला बघतोय. त्याला बघू द्या. काही लागलं तर तुम्ही आहातच." माधुरी म्हणाली.

‘मी तरी काय वेगळं करते आहे? मागे घरच्यांशी वाद घालून शिकायला गेले कारण त्यात असलेल्या संधी दिसत होत्या. आता आर्यनही त्याला दिसणाऱ्या संधींकडे बघतोय. जाऊ दे त्याला, शिकू दे.’ तिच्या मनात आलं. ‘प्रत्येक पिढी त्यांना दिसणाऱ्या संधींच्या शोधात असते आणि आधीच्या पिढीला त्या नीटशा दिसत नसतात. त्यामुळे दोन पिढ्यांमध्ये वाद होतात. माझा २०२३ सालात AI शिकू पाहणारा मुलगा आणि यांचा स्वातंत्र्य मिळाल्यावर म्हणजे १९५० च्या सुमारास इंजिनियर होण्याची स्वप्नं पाहणारा मुलगा. या आकाशात दिसणाऱ्या चंद्राप्रमाणे हे मतभेद आणि वाद असेच चिरंतन चालू राहतील. आता आर्यन आला की शांतपणे बोलून त्याला नक्की काय करायचं आहे ते विचारायला पाहिजे,' असा विचार करताना तिचं लक्ष पुन्हा चंद्राकडे गेलं.

अचानक परत सगळं हलल्यासारखं वाटलं आणि काहीतरी धरायला तिने हात पुढे केला आणि तिचा हात गॅलरीच्या कठड्यावर पोचला. म्हणजे ते भिकाजीपंत आणि त्यांचा तो मुलगा ... हे सगळं काय होतं? इतक्यात हातातला फोन वाजला आणि आर्यनचा फोन आलेला बघून ती समाधानाने हसली.

Comments

  1. फारच छान मराठी मध्ये लिहीत आहेस आणि सद्य स्थितीस जुळणारे असे...असेच चालू ठेव..ओमप्रकाश मोडक

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय