आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे

चंद्रशेखर मोघे

भारत, हाँग काँग/चीन व इंडोनेशिया अशा विविध देशात वित्त व्यवस्थापन क्षेत्रात सुमारे ४० वर्षे काम करून सेवानिवृत्त झाल्यावर काही वर्षे पुण्यात आणि सध्या रॉकव्हिल, मेरीलँड येथे वास्तव्य.

एखादी कविता वाचताना किंवा गाणे ऐकताना, एखादी ओळ किंवा उपमा इतकी अनोखी, रोमांचक किंवा अद्भुत वाटते की त्यामागची कवीकल्पना अनुभवता, जगता किंवा किमान पाहता यावी अशी एकदम प्रबळ इच्छा होते.

कधी हा त्यातील काव्याचा प्रभाव असतो, तर कधी आपल्या समोरच्या चहा-कॉफीच्या वाफाळत्या कपाचा किंवा इतर काही गोष्टींचाही!! त्याहीपुढे जाऊन जर अशी एखादी इच्छा खरेच सफल झाली तर अगदी आनंदीआनंदच !!

असेच काहीसे काही वर्षांपूर्वी "आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे" याचा अनुभव घेताना वाटले होते आणि हा अनुभव अगदीच अनपेक्षितपणे पदरात पडला होता.
मी आणि सौच्या "to do" यादीत राजस्थानात फिरणे हे काही वर्षे समाविष्ट होते. त्याकरता धोपट मार्गाने जे काही एखाद्या पॅकेज टूर मध्ये दाखवले जाईल ते आणि तेव्हढेच पाहून "आमचे राजस्थान झाले हो" असे जाहीर करून न टाकता, नेहेमीच काही वेगळे शोधण्याच्या आणि पहाण्याच्या आमच्या आवडीनुसार आम्ही अंमळ चोखंदळपणे राजस्थानांत कुठे कुठे जावे आणि काय करावे व पाहावे याचा काही काळ विचार करत होतो.

किल्ले, राजवाडे आणि हवेल्या पाहण्याइतकाच उंटावरचा फेरफटका (Camel Safari) करणे हा आम्हाला राजस्थानांत फिरण्याचा अविभाज्य भाग वाटत होता, कारण राजस्थानचा ७०% भूभाग हे वाळवंट तर आहेच पण भारतातल्या एकूण वाळवंटाचा बहुतांश भाग राजस्थानात आहे. राजस्थानात हौशी प्रवाशांसाठी उंटावरचा फेरफटका कसा आणि कुठे करता येईल हे कसेही शोधले तरी जैसलमेरखेरीज इतर कुठले नाव फारसे समोर येत नव्हते. हा जैसलमेरी उंटावरचा फेरफटका म्हणजे - थोडावेळ उंटावर बसून जैसलमेरच्या परिसरातल्या वाळवंटात फिरणे, वातानुकूलित तंबूत एक संध्याकाळ आणि एका रात्रीपुरते राहणे, लोककलांचा नमुना म्हणून काही नाचगाणी आणि एक चमचमीत ५/६/७ तारांकित जेवण - या सगळ्यांचा आस्वाद असा ठोकळेबाज (आणि वाळवंटाशी फारच थोडा संबंधित) असा कार्यक्रम दिसत होता. आणखी हेही लक्षात आले की या ठोकळेबाज कार्यक्रमाचा प्रवाशांना काहीही आनंद मिळो वा न मिळो, जैसलमेरच्या परिसरातील इतक्या लोकांची (आणि म्हणून उंटांची) वर्दळ आणि त्यातही रस्त्यावरील आणि वाळवंटातील उंटांची लीद चुकवत चालणे हा नक्कीच या सगळ्याच कार्यक्रमातला अनिवार्य अनुभव बनत चालला होता. असे सगळे असतांना राजस्थानात बाहेरून येणारे बहुतेक हौशी प्रवासी याच तऱ्हेने उंटावरचा फेरफटका करत होते.

राजस्थानातील सुमारे १० लाख चौरस किलोमीटर (सुमारे ३८६,००० चौरस मेल) विस्ताराच्या वाळवंटी प्रदेशातील जैसलमेरच्या आजूबाजूच्या काही चौरस किलोमीटरच्या छोट्याश्या भागात हा व्यवसाय - ज्यांत प्रवाशांचा वाळवंटाशी फारच थोडा संबंध येत होता - मुख्यतः होतो असे दिसत असल्यामुळे "का बरे असे" हा प्रश्न डोक्यातून जातही नव्हता आणि दुसरे काय करता येईल हे ही समजत, सापडत नव्हते.

मी राजस्थानात वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याकरिता हॉटेलांच्याही शोधात होतो. बिकानेरला निवडलेल्या हॉटेलचा मालक तिथल्या पिढीजात सरदार घराण्याचा निघाला. जेव्हा त्याला मी जैसलमेरच्या परिसरातील उंटावरच्या फेरफटक्याला काही पर्याय मिळेल का हे विचारले तेव्हा त्याने आनंदाने बिकानेरला काय जमवता येईल याची माहिती दिली आणि त्यातून आम्हाला आवडेल अशी व्यवस्थादेखील त्याच्यामार्फत ठरवून घेता आली.

आम्ही प्रत्यक्ष बिकानेरला पोचल्यावर आणि बिकानेर पाहून झाल्यानंतर उंटावरचा फेरफटका करण्यासाठी दुपारी जेवून हॉटेलमधून जीपने वाळवंटाच्या दिशेने निघालो. काही अंतरावर जीपवाल्याने आम्हाला उंटवाल्यांच्या हाती सुपूर्त केले. एक उंट ओढत असलेली गाडी, तिचे सारथ्य करणारा एक मदतनीस, त्या उंटगाडीत आणखी एका मदतनिसासह बसलेले आम्ही दोघे आणि गाडीमागे रेंगाळत चालणारे आमच्याकरता तयार केलेले दोन उंट, असा आमचा काफिला हळूहळू वस्ती असलेला भाग मागे टाकत वाळवंटात शिरला आणि थोड्याच वेळात आजूबाजूला मानवी अस्तित्वाच्या खुणा पूर्णतः दिसेनाशा झाल्या. थोडे अंतर असे गेल्यावर आम्ही दोघे उंटगाडीतून उतरलो आणि कसरत करत आमच्याकरता असलेल्या दोन उंटांवर चढवले गेलो. आम्हाला उंटावर बसण्याबद्दलचे थोडे मार्गदर्शन देऊन दोन्ही मदतनीस - एक गाडीवान म्हणून पुढे आणि दुसरा आमच्या उंटाचे कासरे धरून मागे - उंटगाडीत विराजमान झाले आणि त्या गाडीमागून डुलत डुलत आमचे उंट आणि त्यावर हेंदकाळत आम्ही असा आमचा काफिला पुढे निघाला. आता आमच्या आजूबाजूला वेगवेगळ्या चढउतारांची वाळू, अधूनमधून काही काटेरी झाडे आणि आकाशात थोडासा कलू लागलेला सूर्य याखेरीज काहीही नव्हते. हळूहळू त्या डचमळत्या संथ चालीची सवय होत होती आणि आपण शून्यातून शून्यात जात आहोत अशी एक तंद्री लागत होती.

प्रत्यक्ष सूर्यास्त होण्याच्या थोडे आधी आम्ही एका थोड्या खोलगट भागात थांबलो. एक मदतनीस तीन दगडांची चूल मांडून पोटापाण्याच्या खटाटोपाला लागला आणि दुसऱ्याने उंटगाडीतल्या दणकट गाद्या आणि पांघरुणे वाळवंटात उघड्यावरच पसरून आमच्याकरता छान बैठक-बिछाना तयार केला. नमनालाच गरम गरम चहा आणि नमकीन होईपर्यंत संधिप्रकाश सगळीकडे पसरला होता. आता पेटलेल्या चुलीखेरीज कुठलाच मानवनिर्मित उजेड आजूबाजूला नव्हता. सभोवतालची स्वच्छ आणि मऊशार वाळू, हळूहळू विरत चाललेला संध्याप्रकाश आणि अधूनमधून आसमंतातल्या नीरवतेला हलकेच भेदणारी थोड्या दूर बांधलेल्या उंटांच्या गळ्यातल्या घंटांची किणकिण, या सगळ्यामुळे वातावरणनिर्मिती छान झाली होती. थोड्याच वेळात तव्यावरचे खरपूस रोटले आणि काहीतरी परतलेली चवदार भाजी असे झटपट जेवण झाल्यावर उंटांच्या डचमळत्या संथ चालीने घुसळलेली आमची शरीरे हळूहळू डोळ्यांना "आता मिटा" सांगू लागली आणि थोड्याच वेळात आजूबाजूला चाललेल्या मदतनीसांच्या आवराआवरीच्या मावळत्या आवाजात आम्ही अलगद निद्रादेवीच्या ताब्यात गेलो.

मध्ये कधी तरी डोळे उघडले आणि काही क्षण कळलेचं नाही की कुठे पोचलो आहोत!
तिथी कुठली होती कुणास ठाऊक, पण आसमंतात सगळीकडे पिठूर चांदणे असे उधळले होते की आजूबाजूला सगळे मोकळेच असल्यामुळे आम्ही त्यात जणू काही बुडत होतो. वर दिसणाऱ्या निरभ्र आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांना हात लावता येईल इतके ते जवळ वाटत होते. या सगळ्या आकाशातल्या संपत्तीचा वाटा मागायला कोणीही जवळपास नव्हते. काही वेळ असेच सगळीकडून या चांदण्याच्या दुलईत गुरफटले गेल्याचा अनुभव घेता घेता असे वाटू लागले की मी त्या दूधसागरात विरघळणारा एक नगण्य कण आहे आणि कुठल्याही क्षणी मी मला या चांदण्याच्या पुरात हरवून बसणार आहे. या दाट चांदण्याच्या आणि गाढ शांततेच्या अद्भुत जादूत पुन्हा नकळत डोळा लागला.

त्यानंतरच्या उर्वरित रात्रीत अशा पूर्ण नीरवतेतल्या चांदण्याच्या पुरात आणखी दोनदा तरी अर्धवट जाग येत पूर्ण भारावून जात राहीलो आणि तरीही पुन्हा मंत्रमुग्धासारखा अगदी नकळत डोळा देखील लागत राहिला. प्रत्येक वेळी जाग आल्यावर चंद्र आणखी वर आल्याची, चांदणे आणखीच दाट झाल्याची, नीरवतेच्या दरीत आणखीच बुडल्याची आणि सगळीकडूनच या गारुडाने घेरले जात असल्याची जाणीव जास्त जास्त बळकट होत होती आणि तरीही प्रत्येक वेळी स्वतःला हरवून जात कधी पुन्हा डोळा लागत होता हे देखील कळत नव्हते.

तांबडे फुटता फुटता मदतनीसांची आवराआवरीची लगबग सुरू झाली आणि हे मायाजाल झटपट विरूनही गेले. आम्हाला चहा आणि काही बाही खाणे देऊन, सगळे चंबूगबाळे आवरून, आल्या मार्गाने आम्हाला आमच्या जीपवाल्याच्या ताब्यात देऊन आमचे उंटवाले निघूनही गेले.

आमच्या स्थानिक यजमानांचे या मंतरलेल्या रात्रीचा अनुभव मिळवून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानताना त्यांनी आणखी एक संधी पुढे केली ती - पुढल्या वेळा याल त्यावेळी उंटांच्या काफिल्याबरोबर तुमची वाळवंटातून बिकानेर ते जोधपूर किंवा जैसलमेरच्या काही दिवसांच्या प्रवासाची व्यवस्था करीन - असे आश्वासन देऊन.

आम्ही त्या भारलेल्या रात्री "आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे" याचा तर अनुभव घेतलाच पण बिकानेर ते जोधपूर किंवा जैसलमेर हा सुमारे ३००- ३५० किलोमीटरचा वाळवंटातला प्रवास जर करू शकलो तर अशा अद्भुत आणि अवर्णनीय अनुभूतीची पुढची पायरी गाठत "हरपले मन झाले उन्मन, मी तू पणाची झाली बोळवण" हे देखील अनुभवता येईल का हा विचार करतच आम्ही त्यावेळी बिकानेर सोडले.

Comments

  1. Chandrashekhar, very enticing description for future desert trip.

    ReplyDelete
  2. अशी चांदण्यांच्या सान्निध्यात असलेले वाळ वांटा ची सफर कधी करू असे प्रत्येक वाचकाला वाटावे असे जिवंत आणि मनस्वी वर्णन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय