चित्रसाहित्य - तोच चंद्रमा नभात

सायली अवचट

सायली अवचट व्यवसायाने खगोलशास्त्रज्ञ असून सध्या STEM क्षेत्रामधे कार्यरत आहे. मुलांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी या हेतूने तिने EdCosmic LLC हि संस्था स्थापन केली आहे आणि त्या माध्यमातून ती मुलांसाठी STEM कार्यशाळा आयोजित करते. व्यावसायिक करिअर व्यतिरिक्त तिला छायाचित्रण आणि गायन या छंदांसाठी वेळ द्यायला आवडतो.

चंद्र, चांदोबा, चंदामामा, अशा कितीतरी नावांनी आपल्याला चंद्राची अगदी बालपणापासूनच ओळख होते. भागलेल्या चांदोबाला बाळाबरोबर दूधभात खायला येण्याची विनवणी केली जाते.

चांदोबाच्या खट्याळ गमतीजमतींची गाणी म्हटली जातात. मग पुढे जसं वय वाढतं तशी चंद्राची ओळख किंवा जवळीक म्हणा वेगवेगळ्या संदर्भातून होतच रहाते. आपल्याकडे तर काय, दर पौर्णिमेला काहीना काही सण किंवा काहीतरी विशेष असतंच. होळीपौर्णिमा असो, वटपौर्णिमा असो, किंवा कोजागरी असो, प्रत्येक पौर्णिमेचं असं खास महत्त्व! कधीकधी तर अमावास्येचं सुद्धा. अश्विन अमावास्येला दिवाळीसारखा आनंदी सण, तर सर्वपित्री अमावास्येला आपल्या पूर्वजांचे स्मरण. आपलं सर्व पंचांगच चंद्राच्या स्थितीवर आधारित आहे.

असा हा चंद्र, इतरांप्रमाणेच, एक खगोलशास्त्रज्ञ म्हणून देखील मला नेहमीच भावला आहे. खरं म्हणजे माझा खगोलअभ्यासाचा विषय पूर्णपणे वेगळा असला तरी चंद्राचं आकर्षण काही वेगळंच. लहानपणीचा चांदोबा म्हणजे आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे, हे शाळेत गेल्यावर कळलं. चंद्र कसा तयार झाला, तो कशाचा बनला आहे, त्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म कोणते, वगैरे गोष्टी अभ्यासण्यातून त्याची आणखी सखोल ओळख होत गेली. त्यातूनच असंही शिकायला मिळालं की चंद्र काही फक्त आपल्या पृथ्वीलाच नाही, तर आपल्या सौरमालेतील इतर अनेक ग्रहांभोवती असे अनेक उपग्रह फिरत असतात. कसे असतात हे चंद्र अथवा उपग्रह? आणि मुळात का असतात? चला तर मग थोडक्यात जाणून घेऊया, आपल्या सूर्यमालेतील काही अनोख्या, विस्मयकारक उपग्रहांविषयी.

काही वैशिष्ट्यपूर्ण उपग्रह
आपल्या सौरमालेमध्ये विविध प्रकारचे उपग्रह आहेत. गुरु आणि शनी या दोन ग्रहांना सर्वाधिक उपग्रह आहेत. कारण, अर्थातच, सूर्यमालेतील ते सर्वात मोठे ग्रह आहेत आणि त्यांचे गुरुत्वाकर्षण सर्वात अधिक आहे, ज्यामुळे त्यांच्या जवळ आलेले अंतराळातील अनेक लहान-मोठे खडक त्यांच्या कक्षेत अडकून त्यांच्याभोवती पिंगा धरू लागले आहेत. पण गुरु आणि शनीपेक्षा कितीतरी पटीने लहान असलेल्या इतर ग्रहांभोवतीदेखील काही अनोखे उपग्रह आढळून येतात. उदाहरणार्थ, एकीकडे, पालक ग्रहाच्या उलट्या दिशेने परिवलन करणारा आणि प्रचंड थंड असूनही पृष्टभागावर गिझर्स असलेला नेपच्यूनचा सर्वात मोठा उपग्रह ट्रायटन (Triton) असो, अथवा मंगळाचे जुळे वाटावेत असे, आकाराने अतिशय लहान असणारे दोन उपग्रह फोबोस (व्यास १४ मैल) आणि डायमोस (व्यास ७.५ मैल) असोत, अथवा ग्रहाच्या आकारमानाच्या तुलनेत सर्वात मोठा असलेला, प्लूटोच्या जवळपास अर्ध्या आकारमानाचा प्लुटोचा उपग्रह शेरॉन (Charon) असो. तर दुसरीकडे, बुध आणि शुक्र या ग्रहांना उपग्रहच नाहीत. सर्वच कुतूहलजनक! इतके तऱ्हेतऱ्हेचे उपग्रह कसे निर्माण झाले हा ग्रहशास्त्रज्ञांच्या (planetary scientists) खूप मोठ्या अभ्यासाचा विषय आहे. एवढ्या सगळ्या खगोलीय आश्चर्यांचं वर्णन एका लेखात करता येणं खूपच अवघड आहे. म्हणूनच, मला ज्या काही उपग्रहांबद्दल वाचायला आणि ऐकायला खूप आवडतं त्यांची थोडक्यात ओळख करून देते.

बर्फाळ टायटन -
टायटन हा शनीचा सर्वात मोठा उपग्रह. आपल्या चंद्रापेक्षा आणि बुध ग्रहापेक्षाही मोठ्या असलेल्या या उपग्रहावर विलक्षण हवामान आढळतं. सूर्यमालेतील हा एकमेव उपग्रह आहे जिथे पृथ्वीप्रमाणेच वातावरणाचा जाड थर आणि विशिष्ट जलचक्र आढळून आलं आहे. फरक इतकाच की इथलं जलचक्र अत्यंत थंड हवामानामुळे द्रव पाण्याऐवजी बर्फाचं आणि हायड्रोकार्बन्सचं आहे. इथे पृष्ठभागावरच्या जाड वातावरणाच्या थरांमधून इथेन आणि मिथेनचा पाऊस पडतो. हे हायड्रोकार्बन्स तिथल्या बर्फाळ पर्वतांवर पडून पुढे गोठलेल्या नद्या, तलाव आणि समुद्रामध्ये एकत्र होतात.

कॅसिनी अंतराळयानाने केलेल्या निरीक्षणांवरून टायटनच्या भूगर्भात द्रव स्वरूपातील पाण्याचे समुद्र आढळून आले आहेत. तसेच युरोपियन स्पेस एजन्सीच्या ह्युजेन या अंतराळयानानेदेखील टायटनच्या पृष्ठभागाच्या ३५ ते ५० मैल खाली समुद्र असल्याचं सूचित केलं आहे. द्रव स्वरूपातील पाणी अस्तित्वात असल्याच्या शक्यतेमुळे टायटन हा सूर्यमालेतील काही मोजक्या अशा ग्रह/उपग्रहांच्या रांगेत बसला आहे, जिथे सजीव जीवसृष्टी (कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, तसंच वर्तमान किंवा भूतकाळात) असण्याची शक्यता आहे. या विषयीचे कोणतेही ठोस पुरावे अजून शास्त्रज्ञांना मिळाले नसले तरी त्याबद्दल संशोधन या पुढेही चालूच राहील.

महाकाय गॅनिमीड -
गुरुच्या ८०हून अधिक उपग्रहांपैकी एक, आणि सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह म्हणजे गॅनिमीड. याचं नाव ग्रीक पुराणातल्या एका अत्यंत देखण्या राजकुमारावरून ठेवलं आहे. गॅनिमीडचा शोध सर्वप्रथम गॅलिलिओने १६१० साली लावला. त्याने गॅनिमीड सोबतच गुरुचे आणखी २ उपग्रह शोधले. यातूनच पुढे सूर्यकेंद्रित सौरमालेच्या सिद्धांताला पुष्टी मिळाली. टायटनप्रमाणेच याही उपग्रहाच्या गर्भात समुद्र आढळून आला आहे, परंतु हा समुद्र खाऱ्या पाण्याचा आहे. गॅनिमीडचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या उपग्रहावर पृथीप्रमाणेच चुंबकीय क्षेत्र आढळून आलं आहे आणि त्यामुळे तिथल्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरदेखील ध्रुवीय प्रकाश (अरोरा) निर्माण होतो. अलीकडेच नासाच्या जुनो अंतराळयानाने गॅनिमीडच्या पृष्ठाचा अभ्यास केला. यानाने काढलेल्या गॅनिमीडच्या पृष्ठरचनेच्या छायाचित्रांवरून त्यावर सतत भूगर्भीय हालचाली होत असाव्यात असा कयास करण्यात आला. शास्त्रज्ञांच्या मते, गुरु आणि त्याच्या उपग्रहांच्या अभ्यासावरून आपल्या सूर्यमालेच्या आणि सूर्यमालेपलीकडच्या ग्रहांच्या निर्मितीबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती मिळू शकेल.

गूढग्रह शेरॉन -
खरं तर सन २००६ मध्ये प्लूटोची ग्रहांच्या श्रेणीमधून लघुग्रहांमध्ये गच्छन्ति झाली, पण तरी या छोट्याशा ग्रहाच्या ५ उपग्रहांपैकी सर्वात मोठ्या असलेल्या शेरॉनबद्दलचं कुतूहल काही औरच! शेरॉनचा शोध तसा अलीकडेच म्हणजे १९७८ साली जेम्स ख्रिस्ती आणि रॉबर्ट हॅरिंग्टन यांनी लावला. शेरॉन हा प्लुटोच्या जवळजवळ अर्ध्या आकारमानाचा आहे, त्यामुळे या जोडीला "दुहेरी लघुग्रह" म्हणूनही ओळखतात, म्हणजे ते दोघेही अक्षरशः एकमेकांभोवती फिरतात. शेरॉन प्लूटोभोवती (परिभ्रमण) फक्त ६.४ दिवसात एक फेरी पूर्ण करतो (आपल्या चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला साधारण २७-२९ दिवस लागतात). गंमत म्हणजे प्लुटोला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला (परिवलन) देखील साधारण ६.४ दिवस लागतात. यामुळे होतं काय की शेरॉन हा प्लुटोच्या आकाशात कायम एकाच स्थानी दिसतो, ना तो अस्ताला जातो, ना उगवतीला! याला शास्त्रीय भाषेत tidal locking म्हणतात, म्हणजे गुरुत्वीय आकर्षणाने एकमेकांना बांधलं जाणं. नासाच्या न्यू होरायझन्स या अंतराळयानाने अलीकडे केलेल्या निराक्षणांमध्ये शेरॉनवर मिथेन आणि इतर काही रसायनांचं "सूप" आढळून आलं. भविष्यात या आणि अशा अभ्यासांवरून आपल्या सूर्यमालेमधील रेणूंचे आणि इतर रसायनांचं मूळ समजणं शक्य होईल असं शास्त्रज्ञांना वाटतं.

जुळी भावंडं फोबोस आणि डायमोस -
मंगळाचं नाव रोमन पौराणिक कथेतील युद्ध देवतेवरून ठेवलं गेलं, तर त्याच्या दोन उपग्रहांची नावंही त्याला साजेशीच. फोबोस म्हणजे भय, तर डायमोस म्हणजे घबराट अथवा धास्ती. हे दोन्ही उपग्रह आकाराने खूप लहान (फोबोस ~१५ मैल व्यासाचा तर डायमोस ~७ मैल व्यासाचा), असमान, आणि कोळशासारखे काळे आहेत. दोन्ही उपग्रह ओबडधोबड ढेकळांसारखे असून, त्यांच्यावर अनेक मोठमोठे खड्डे (क्रेटर्स) आहेत. या दोन्ही उपग्रहांचा शोध १८७७ मध्ये लागला आणि गेल्या काही वर्षांमध्ये नासा आणि युरोपिअन स्पेस एजन्सीच्या काही यानांनी त्यांच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला. परंतु अजूनही या उपग्रहांबद्दल बरीच माहिती मिळणं बाकी आहे.

या आणि अशा अनेक आश्चर्यकारक उपग्रह, लघुग्रह आणि अंतराळ खडकांनी आपली सूर्यमाला समृद्ध आहे. ग्रहशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ त्यांवर अविरत संशोधन करत असतात. त्यांच्या शोधांबद्दल वाचणं आणि जाणून घेणं ही एक प्रकारची पर्वणीच! नवनवीन आधुनिक दुर्बिणी आणि ग्रह/लघुग्रह मोहिमांमुळे भविष्यात आपल्याला अनेक नवनवीन शोधांची माहिती मिळू शकेल. या अभ्यासांतून आपली सूर्यमाला कशी निर्माण झाली? विविध ग्रह आणि उपग्रहांवर सापडणारी संयुगे कशी विकसित झाली? भविष्यात यामध्ये कसकसे बदल होऊ शकतील? वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरं शोधता येऊ शकतील, आणि कदाचित जुन्याच शोधांचे नवीन आणि वेगळे अर्थही सापडू शकतील.

भविष्यात जे बदल होतील ते होतील, पण तोवर आपण नक्कीच म्हणू शकू "तोच चंद्रमा नभात"...!!

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय