कवितेचं पान - तूं कुणाला मी म्हणू

अनिल मायभाटे

परवा कधीतरी सहजच घराची थोडी आवराआवर, स्वच्छता करायची हुक्की आली. हा माझा तसा नेहमीचा आवडीचा खेळ. मी अगदी हिरीरीने सुरुवात केली तीच माझ्या कामाच्या खोलीपासून. टेबल, खुर्ची, वह्या, शेकड्याने पसरलेली कागदपत्रं, सगळं पुन्हा एकदा बाहेर काढून आवरलं. छोटी कपाटं, काही सटरफटर वस्तू, वगैरे सगळंच. मग हात घातला तो पुस्तकांच्या कपाटांना. उत्साहाने पुस्तकांचा एक एक गठ्ठा बाहेरच्या खोलीत आणून ठेवत होतो. मधूनच एखाद्या साठवणीतल्या, आवडीच्या पुस्तकाची पानं चाळत होतो.

या सर्वात पूर्वी कधीतरी झपाटल्याप्रमाणे संपूर्ण वाचून काढलेल्या एका लेखकाची अनेक पुस्तकं बाहेर आली. मनात आलं, किती वर्षं झाली हात लावला नाही आपण या पुस्तकांना? तरुण वयात एखादी भूतबाधा झाल्याप्रमाणे या पुस्तकांचं गारूड होतं मनावर. थोड्या हळवेपणाने त्यातल्याच एका पुस्तकाची पानं उघडली.

तीच झपाटून टाकणारी भाषा! वाचण्यात मन गुंग झालं आणि हातातलं काम विसरून गेलो. वाचता वाचता काही पानं संपली आणि मध्येच कुठल्यातरी पानात खूण म्हणून फार पूर्वी ठेवलेला एक जुना, पिवळसर पडलेला कवितेचा एक कागद बाहेर पडला. कविता जुनीच, ओळखीची आणि प्रसिद्ध - आरती प्रभूंची ’तूं कुणाला मी म्हणूं’. पण ती एका उत्साही वेड्या मित्राने कधीतरी अशाच भारावलेल्या अवस्थेत, चित्रकाराने एखादी सुंदर कल्पना कागदावर साकारावी तशी, स्वत:च्या कोरीव अक्षरांत कागदावर लिहिलेली, नव्हे, अक्षरश: कुंचल्याने चित्रित केलेली. कुठलंही कारण नसताना, आठवण म्हणून सहज मला देऊन टाकलेली.

कुठे असेल तो मित्र आता? एखाद्या पट्टीच्या गायकाने मैफलीच्या सुरुवातीला गळा साफ करून सूर लावावा तसा अगदी ठेवणीतला आवाज लावून मनस्वीपणे कविता वाचून दाखवायचा तो. विद्यापीठाच्या आवारात, दिवस संपत आल्यावर, रिकामा वेळ घालवण्यासाठी नुसतीच मनमोकळी भटकंती करताना, अचानक कुठेतरी आवडत्या ठिकाणी, उतरत्या उन्हात, शांतपणे बसून, नुकत्याच वाचलेल्या, चटका लावून गेलेल्या एखाद्या कवितेबद्दल भरभरून बोलायचा.

आताही त्याच्या त्या ठेवणीतल्या आवाजातच ही ‘तूं कुणाला मी म्हणूं’ कविता मी वाचत होतो, ऐकत होतो..

दोन हे आहेत पेले आपले नाही जणूं :
कोणता आहे तुझा अन् कोणता माझा म्हणूं ?
दोनही झालेत उष्टे : गरळ कंठी दे जळूं,
दोनही तारांतूनी रे वीज लागो झणझणूं.

त्या पेल्यांचे मला आधीच माहीत असलेले अर्थ वेड्यासारखे भारावून पुनःपुन्हा सांगताना त्याचे डोळे चमकायचे! मधेच कसल्याशा आठवणीने कासावीस व्हायचे. मग मी तिथे आहे हे विसरून तो पुढे वाचत राहायचा.

दोन हे आहेत पेले : एक माझा संपला.
झाकुनी अर्धाच पेला टेकिली कां वर हनूं ?

आमच्यासाठी या कवितेतले हे दोन पेले म्हणजे फक्त हातातले चहाचे कप नव्हते, किंवा वरवर सहज दिसणारे मदिरेचे चषकही नव्हते. स्वत:च निर्माण केलेल्या कवितेच्या प्रदेशात एखाद्या पक्ष्याने लांबवर आर्त शीळ घालावी तसा कविता "गाऊन" गेलेला हा मनस्वी कवी. त्याला इतके साधे अर्थ अभिप्रेत नक्कीच नसणार. कदाचित दोन शरीरं, प्रेमात पडलेली दोन मनं असतील. म्हणून मग तो अर्थ मनात धरून पुन्हा एकदा ही कविता वाचली जायची. म्हणजे, तो अगदी हक्काने वाचायचा, आणि मी ऐकायचो.

अचानक पुन्हा कुठेतरी पटकन थांबायचा, अर्थाचा कुठला तरी आणखी नवीन शोध लागल्यासारखा. कदाचित दोन पेले म्हणजे एक शरीर आणि एक आत्मा असेल. या दोन्हीच्या द्वैत-अद्वैताबद्दल असेल ही कविता. स्वत:च्याच आत्म्याला उद्देशून म्हटलेली.

मग माझा प्रश्न असे की हे दोन्ही अर्थ खरंतर एकच नाहीत का? आपण जिच्या प्रेमात पडलोय ती दुसरी व्यक्ती म्हणजे एका अर्थाने आपला आत्माच असतो की! पण तो दुर्लक्ष करून बोलत राहायचा. मोक्ष मिळवून परम ईश्वराशी एकरूप होण्याची जी अनिवार ओढ आत्म्याला लागते त्याविषयी ही कविता आहे असं काहीसं बरळायचा.

मग परत भानावर यायचा. म्हणायचा, "नाही! दोन शरीरं किंवा दोन मनं एकत्र जुळण्याबद्दलचीच असावी ही कविता. आपल्याही आयुष्यात असले क्षण यायला हवेत, यार! एखाद्या पेटलेल्या फितूर क्षणी आपणही उष्ण रक्ताच्या ओढीने एक शेवटची उसळी मारावी. आणि नंतर तो महापूर ओसरून एक श्रांत, कायमची ग्लानी यावी!" असली काहीतरी बडबड करायचा. मी आपला स्वतःशीच हसत हसत कवितेचं पुस्तक हातात धरून फक्त बघत, ऐकत बसायचो, बावळट चेहरा करून!

दे तुझा : झोकून घेतों, आणि माझा घे तुला,
होत जागी रानगीतें : हृदय लागे गुणगुणूं.
तोही केला तूं रिकामा : तोल जातो कां ढळूं ?
नेत्र हे रेंगाळती का सज्ज करिसी की धनू ?

"काहीतरी तत्त्वज्ञान झाडू नकोस. सरळ सरळ दारू पिऊन झिंग चढते त्याचं वर्णन आहे इथे," मी म्हणायचो. मग तो तिरसटून जायचा. एक फटका मारून जमिनीवर आणल्याबद्दल माझ्यावर उखडायचा आणि एखाद्या तुच्छ किड्याकडे बघितल्याप्रमाणे संपूर्ण भूतदयेने माझ्याकडे पाहात रहायचा. त्याच्या डोळ्यांत एखादी पाण्याची रेषाही तरळून जायची तेंव्हा. मग अचानक तावातावाने उठून पाय झाडून परत जायला निघायचा. मीही काहीतरी कळल्या प्रमाणे हसत उठून त्याच्या पाठीमागे चालू लागायचो.

आता काय करत असेल तो? इतकी वर्ष झाली, त्याचा थांगपत्ता नाही. भेट तर सोडाच, साधा संपर्कही नाही. आज ही कविता परत वाचताना या ओळींचा एक वेगळाच अर्थ जाणवतोय. ते पेले म्हणजे कवी स्वतः आणि त्याच्या कवितेचा वाचक, असाही अर्थ असेल का? हे जे काही गरळ कंठी जळतंय ते म्हणजे हे शब्द. कवी कदाचित या ओळींबद्दलच म्हणत असावा.

दोन धारा एक झाल्या या प्रवाही : तूं नि मी,
पूर येतो वाढणारा, आपली नाही तनू.
दोन कोठे ? एक झालों - शून्य झालों की अशी :
तूं कुठे अन् मी कुठे अन् तूं कुणाला मी म्हणूं ?

कवी लिहितो तेंव्हा एखादी कविता जन्म घेते हे खरेंच, पण आपण कविता वाचतो तेंव्हा एका अर्थाने आपल्या मनातही ती पुन्हा निर्माणच होत असते. निर्मितीच्या या दोन्ही धारा एकच, की वेगवेगळ्या म्हणायच्या?

त्या वेड्याला हा ही एक अर्थ विचारून बघायला हवा! पुन्हा भेटायला हवं. मन भलतीकडेच भरकटत जातं. हा नवीनच अर्थ मनात धरून पुन्हा एकदा कवितेचं पारायण सुरु होतं.

दोन हे आहेत पेले आपले नाही जणूं :
कोणता आहे तुझा अन् कोणता माझा म्हणूं ?

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय