बालमित्र

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.








 बालमित्र

खाकी चड्डी, पांढरा शर्ट, रोज शाळेत

वेळेवर येणारे, पेन्सिलीला घरीच टोक करून

मोरोपंत पाठ म्हणणारे, म्हाताऱ्या टोपीवाल्या

मुख्याध्यापकांचा उपदेश तंतोतंत पाळलेले:

निष्ठेने नोकरी, लग्न करून

मायेने पोरं वाढविलेले माझे मित्र

जेंव्हा कायम एअरपोर्टवरून डोळे पुसतच

घरी येतात आणि सल्फर डायॉक्साईड मध्ये पिकत

असलेल्या केळ्यांप्रमाणे पुण्यामुंबईच्या प्रदूषणात

काळपट मऊ पडत जातात तेंव्हा वाटतं

काहीतरी हुकतं आहे खास!खोकत खोकत ते म्हणतात

तू अजून किती झपाझप चालतोस रे!

बीफ वगैरे खातोस वाटतं तिकडे?

पहिल्यापासून तू तसलाच!

आमच्या अमितला फोन करत जा मधूनमधून, काय?

काका ना तू त्याचा ?

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय