अमेरिकेतील बर्फ

मुग्धा मुळे

सॉफ़्टवेअर डेव्हलपर आणि फ़ॅशन डिझायनर.

छान बर्फ पडतोय, हातात पुस्तक आहे, समोर वाफाळता चहा आणि सोबत ताटलीत दोन सामोसे आहेत. घरात कुणीच नाही. बर्फीपण तिचे ‘काम’ करायला बाहेर गेलेली आहे. मी चहाचा घोट घेणार तेवढ्यात मोठा कर्कश आवाज होतो, आणि तो वाढतच जातो, थांबायचे नाव नाही. मग कळते की हा आवाज पलंगाशेजारच्या गजराच्या घड्याळातून येतोय. म्हणजे हे स्वप्नच होते तर!

स्वप्नांचे एक बरे असते, आपल्याला हवे ते, हवे तसे दिसते आणि त्यात हवी ती माणसे दिसतात. खरे सांगते, माझ्या स्वप्नात मी नेहमीच किशोरवयीन असते. म्हणजे मला मी कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असतानाचीच स्वप्ने पडतात. अजून एकाही स्वप्नात माझे लग्न लागलेले नाही :-)

असे म्हणतात की भगवान शंकर बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात अवतरले व त्यांनी काही श्लोक सांगितले. सकाळी उठून ऋषींनी ते श्लोक लिहिले व रामरक्षा जन्मली. स्वप्न बघणारी माणसे थोडीशी ध्येयवेडी असतात. जिथे तर्क संपतो तिकडे स्वप्न चालू होते. मग ते सुखद दिवास्वप्न असो वा रात्रीचे भयानक स्वप्न असो.

तर उत्तर अमेरिकेत बर्फ पडायला लागला की फेसबुक, इन्स्टावर तमाम काजोल, माधुरी, शिल्पा, नवनवीन साड्या आणि डिझायनर ब्लाउजेस घालून अवतरतात. मी पण मग स्फूर्ती घेऊन प्रयत्न केले पण बाहेर पाय ठेवायचे धाडस झाले नाही. २ पेग वाईन प्यायल्यावर कुठे हुशारी आली. मला मात्र तमाम काजोल, माधुरी ह्यांच्या नवऱ्यांचे कौतुक वाटते. बर्फात शूटिंग करणे सोपे नाही (तेही आपल्याच बायकोचे ;-))

पावसाळ्यात बऱ्याच कवींना पालवी फुटते, तशी पण मी थोडे फार लिहायला लागल्यामुळे नाही म्हटले तरी र ला ट जोडून बर्फावर एक कविता लिहिली.

धीमे धीमे गिरे सफेद बर्फ
ठंडी ठंडी हो जाये पवन
सुंदर सफेद चादरोंपे
सामोसे की आए तलफ़

अश्या तऱ्हेने चहा नि सामोसे हादडून मी बर्फ पाहिला.



Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय