भगवान विष्णूंची २४ नांवे - भाग १

सुधीर लिमये

पेण, निवृत्त अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

प्रिया जोशी

केशवाय नमः कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना आचमन करतात. विष्णूंची केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः ही पहिली तीन नावे घेताना, डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन, प्राशन केले जाते व गोविंदाय नमः च्या वेळी ताम्हनात सोडले जाते. नंतर बाकीची २० नांवे म्हणताना हात जोडून नमस्कार स्थितीत ठेवले जातात. याला ‘आचमन करणे’ म्हणतात. आचमनाने शरीर शुद्ध होते.

यातील पहिले नांव ‘ॐ केशवाय नमः’ असे आहे. विष्णूसहस्रनामातील २३ वे व ६४८ वे नाव ‘केशव’ आहे. भगवद्गीतेत दुसऱ्या, तिसऱ्या व दहाव्या अध्यायात अर्जुनाने श्रीकृष्णांचा, केशव म्हणून उल्लेख केल्याचा पहायला मिळतो.

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ।
सर्व देव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति ॥

या श्लोकात असे सांगितले आहे की, आकाशातून पडणारे पावसाचे पाणी जसे, ओहोळ, नाला, ओढा, नदीद्वारा अंती समुद्राला पोहोचते तसे सर्व देवांना केलेला नमस्कार अंती केशवरूपी नारायणाला पोहोचतो. म्हणजे सर्व देव हे केशवाचीच रूपे आहेत.

ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या शक्तींना केश म्हणतात. या तिघांचे कार्य आपल्या सतर्कतेने चालविणारा तो केशव. कंसाने, बाल श्रीकृष्णाची हत्या करण्यासाठी अश्वमुखी राक्षस गोकुळात पाठवला होता. त्याचे नांव केशी होते. केशी राक्षसाचा श्रीकृष्णाने वध केला म्हणून श्रीकृष्णाला केशव नावाने ओळखले जाते. श्रीकृष्णाचे केस कुरळे, घनदाट, लांब सुंदर होते म्हणूनही केशव म्हटले जाते.

केशवाची शक्ती कीर्ती लक्ष्मी रूप श्रीदेवी आहे. सौम्य केशव म्हणजे शांत, प्रसन्न रूपातील केशव. सौम्य केशवाची कर्नाटकात मंदिरे आहेत. नागमंगला, मंड्या, कर्नाटक येथे सौम्य केशवाचे मंदिर आहे. चन्नकेशव मंदिर (चन्ना- सुंदर, देखणा -कानडी) बेलूर कर्नाटक येथे आहे. आपल्याकडे काही मंदिरात लक्ष्मीसहित केशवाची मंदिर असतात, तेथे लक्ष्मीकेशव म्हटले जाते. अनेक कुटुंबांचे कुलदैवत लक्ष्मीकेशव आहे. कोकणात लक्ष्मीकेशव मंदिरे बरीच आहेत. लक्ष्मीकेशव मंदिर, कोळिसरे हे रत्नागिरी-जयगड रस्त्यावर रत्नागिरीपासून ३५ किमी अंतरावर आहे. लक्ष्मीकेशव मंदिर, बिवली चिपळूण, हे चिपळूणपासून २५ किमी अंतरावर आहे. काही ठिकाणी लक्ष्मीकेशव मंदिर असले तरी विष्णूमूर्तिची गदा, पद्म, शंख, चक्र आयुधे लक्षात घेता, विष्णूलक्ष्मी मूर्ती असते.

केशव रूपात हातातील आयुधे अश्या पध्दतीने असतात : उजव्या समोरच्या हातात - पद्म, उजव्या पाठीमागच्या हातात - पांचजन्य शंख, डाव्या पाठीमागच्या हातात - सुदर्शन चक्र, डाव्या समोरच्या हातात - कौमोदकी गदा.

आपल्याकडे देवदेवतांची नांवे मुलामुलींना ठेवण्याची प्रथा आहे. तसेच देवदेवतांची अनेक भक्तीगीतेही आहेत, पण लेखाचा विस्तार वाढेल म्हणून लिहीत नाही. ठिकठिकाणच्या केशव मूर्तींचा परिचय येथे करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

नारायणाय नम:

नारायणSS नारायणS असे शब्द ऐकताच आपल्याला नारदमुनींची आठवण येते. त्यांचे वेगवेगळ्या पट्टीतील, नारायण, नारायण हे शब्द, त्यात प्रेम आहे, राग आहे, त्रयस्थपणा आहे, निर्विकारपणा आहे, ‘विजयी भव’ हा भावही आहे, मिश्किलपणा, हतबलताही आहे. असे विविध हावभाव दाखवणारा त्यांचा चेहरा आपल्याला आठवतो.
नारायण हे आचमनातील दुसरे नाव. नर म्हणजे आत्मा. त्यापासून उत्पन्न झालेल्या आकाशादि गोष्टींना नार म्हणतात. त्या कार्यांना, कारणाने जो व्यापून राहतो, तो नारायण. नार शब्दाचा अर्थ आहे पाणी. पाण्यामध्ये ज्याचे स्थान आहे, आसन आहे, शयन आहे, निवासही आहे तो नारायण.

विष्णू षोडशनाम स्तोत्रात ‘नारायणं तनुत्यागे’ असे म्हटले आहे. म्हणजे अखेरच्या क्षणी नारायणाचे नामस्मरण करत रहावे असे सांगितले आहे. ‘अन्ते नारायणस्मृति:’. विष्णू सहस्रनामातील २४५ वे नांव नारायण आहे. भगवद्गीतेत नारायण नावाचा उल्लेख पहायला मिळत नाही.

नारायण रूपात हातातील आयुधे अश्या पद्धतीने असतात : उजव्या समोरच्या हातात - पांचजन्य शंख, उजव्या पाठीमागच्या हातात - पद्म, डाव्या पाठीमागच्या हातात - कौमोदकी गदा, डाव्या समोरच्या हातात - सुदर्शन चक्र, नारायणाची शक्ती कांती तर लक्ष्मीरूप लक्ष्मीच आहे.

समर्थ रामदास म्हणतात, अंतरी वसता नारायणे, लक्ष्मी काय उणे । ज्याची लक्ष्मी वो आपणा, बळकट धरावा ॥
म्हणजे, नारायणाचे अखंड नामस्मरण, ध्यान, चिंतन, आराधना करून नारायणाला प्रसन्न करा, कारण जेथे नारायण आहे तेथे लक्ष्मी असतेच.

लक्ष्मीनारायणाची गुरूवारी उपासना करावी, म्हणजे संसार सुखाचा होतो पतिपत्नीत दुरावा राहात नाही. अनेक घरी प्रतिवर्षी श्रावण, मार्गशीर्ष महिन्यांत सत्यनारायण व्रत केले जाते. सत्यनारायण व्रतात मूर्ति नारायणासारखी नसते, तर जनार्दनस्वरूप असते. फक्त उजव्या समोरचा हातात पद्माऐवजी हा हात अभय मुद्रेत असतो.

कर्नाटकात गदग व बेलवडी येथे वीरनारायण मंदिर ही विष्णूमंदिरे आहेत. बेलवडी येथे मूर्तीचा समोरचा उजवा हात व्याघ्रहस्त मुद्रेत तर पाठीमागच्या हातात पद्म (कमळ) आहे. डाव्या पाठीमागच्या हातात गदा तर समोरचा हात वीरहस्त मुद्रेत आहे. प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत, त्यात श्रीकृष्णाऐवजी बलराम आहे. बेलवडी, हळेबिडुपासून वीस मिनिटांच्या अंतरावर आहे.

एकमेकांना उंची, वर्ण, शरीरयष्टी अशा सर्वार्थाने अनुरूप असलेल्या जोडप्याचे वर्णन लक्ष्मीनारायणाचा जोडा असे केले जाते. विवाहाच्या दिवशी नवदांपत्याला लक्ष्मीनारायणस्वरूप मानून पूर्वी वृध्द माणसे वाकून नमस्कार करीत असत. विवाहाच्या दिवशीचे भोजन प्रसाद समजले जाते.

आपल्याकडे काही लक्ष्मीनारायण मंदिरे असतात, पण तेथे प्रत्यक्षात गदा, चक्र, शंख, पद्म आयुधे असलेली विष्णूमूर्ति असते. अनेक कुटुंबांचे कुलदैवत लक्ष्मीनारायण आहे.

माधवाय नमः

माधव हे आचमनातील तिसरे नांव. भगवान ब्रह्मांनी सृष्टीनिर्मितीचे कार्य यशस्वीपणे पूर्ण केले त्यावेळी प्रयागराज (२०१८पूर्वी अलाहाबाद नाव होते)(प्र-मोठा याग-यज्ञ म्हणून नांव - प्रयाग) येथे मोठा यज्ञ केला. त्यावेळी भगवान विष्णू, यज्ञाचे पावित्र्य, संरक्षण करण्यासाठी बारा विविध माधव रूपांत प्रकट झाले ते द्वादश माधव म्हणून प्रसिध्द आहेत - १. त्रिवेणीमाधव, २. शंखमाधव, ३. संकष्टमाधव, ४. वेणीमाधव, ५. असिमाधव, ६. मनोहरमाधव, ७. अनंतमाधव, ८. बिंदुमाधव, ९. पद्ममाधव, १०. गदामाधव, ११. आदिमाधव, १२. चक्रमाधव. कार्तिक पौर्णिमेला येथे द्वादश माधव दर्शनाची पांच दिवसाची पंचक्रोशी परिक्रमा केली जाते.

पूर्वजन्मीच्या ब्राह्मणकुलातील राक्षसाचा इंद्राने वध केला, त्याचे पापपरिमार्जन, प्रायश्चित्त म्हणून भगवान ब्रह्मदेवाने इंद्राला पांच तीर्थक्षेत्री माधव मंदिरे बांधण्यास सांगितले. ती पांच मंदिरे अशी - काशी (बिंदुमाधव), प्रयाग (वेणीमाधव), रामेश्वर (सेतुमाधव), त्रिवेंद्रम (सुंदरमाधव) आणि पिठापुर (कुंतीमाधव). ओरिसामध्ये नीलमाधव, राधामाधव, दुर्गामाधव तर आसाममध्ये हयग्रीवमाधव मंदिरे आहेत.

विष्णू षोडशनाम स्तोत्रात म्हटले आहे की, ‘गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवम्’, म्हणजेच प्रवासाला निघताना वामनाचे स्मरण करावे, तर राहिलेली सर्व कामे सिद्धीस जाण्याकरता माधवाचे स्मरण करावे.

विष्णू सहस्रनामातील ७२, १६७ व ७३५वे नांव माधव आहे. भगवद्गीतेत पहिल्या अध्यायातील ३७व्या श्लोकात अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतात, “आपण धृतराष्ट्रपुत्रांबरोबर युध्द करून त्यांना ठार मारणे उचित नाही. आपणच आपल्या नात्यातल्या लोकांना ठार करून कसे बरे आनंदी होऊ, हे माधवा?”

माधव रूपात हातातील आयुधे अश्या पध्दतीने असतात : उजव्या समोरच्या हातात - कौमोदकी गदा, उजव्या पाठीमागच्या हातात - पद्म, डाव्या पाठीमागच्या हातात - पांचजन्य शंख, डाव्या समोरच्या हातात - सुदर्शन चक्र. माधवाची शक्ती तुष्टी तर लक्ष्मीरूप कमला आहे.

मा म्हणजे महालक्ष्मी, धव म्हणजे पती. लक्ष्मीचा पती तो माधव. मधुकुलात जन्म घेतलेला तो माधव. मधु म्हणजे मध, मधासारखा गोड तो माधव, ज्याचे लोकांबरोबर आपल्या वागणुकीने मधुर संबंध आहेत असा.

माधव रूपातील एकमेव विष्णूमूर्ति कर्नाटक-आंध्रप्रदेश सीमेवरील मुथकुरू (Muthakuru, Near Bargur Siva) जिल्हा नेल्लोर (Nellore) येथील मंदिरातील बाह्य भिंतीवर पहायला मिळते. बिंदुमाधव व नीलमाधवाच्या मूर्तीची आयुधे माधवरूपाप्रमाणे नाहीत.

गोविंदाय नमः

गोविंद हे आचमनातील चौथे नांव. हे नांव उच्चारताना डाव्या हातातील पळीने उजव्या हातात घेतलेले पाणी ताम्हनात सोडायचे असते.

विष्णू षोडशनाम स्तोत्रात असे म्हटले आहे की, ‘दु:स्वप्ने स्मर गोविंदम्, संकटे मधुसुदनम्’, म्हणजे, रात्री वाईट स्वप्ने पडत असतील तर गोविंदाचे स्मरण करावे. जेवतानाही अधूनमधून गोविंद गोविंद म्हणावे. विष्णूसहस्रनामातील १८७, ५३९वे नांव गोविंद आहे. भगवद्गीतेत गोविंद नांवाचा उल्लेख नाही.

गोविंद रूपात हातातील आयुधे अश्या पध्दतीने असतात : उजव्या समोरच्या हातात - सुदर्शन चक्र, उजव्या पाठीमागच्या हातात - कौमोदकी गदा, डाव्या पाठीमागच्या हातात - पद्म, डाव्या समोरच्या हातात - पांचजन्य शंख. गोविंदाची शक्ती पुष्टी तर लक्ष्मीरूप पद्मा आहे.

गो व विंदाम् या शब्दांचे विविध अर्थ आहेत त्याप्रमाणे गोविंदचे अनेक अर्थ आहेत. गो म्हणजे गाय. गोवर्धन पर्वत उचलून गाईंचे, गुराख्यांचे रक्षण केले म्हणून इंद्राने श्रीकृष्णाचे गोविंद असे नामकरण केले. गो म्हणजे इंद्रिय. इंद्रियांवर स्वामित्व ठेवणारा तो गोविंद. गोवु म्हणजे वेद. भगवान विष्णुंनी हिरण्याक्षाचा वध करून त्याने पळवलेले वेद परत आणले, वेदांचे रक्षण केले त्या अर्थाने गोविंद. वेदातील वाणीद्वारा जाणला जाणारा तो गोविंद. गो म्हणजे पृथ्वी, विंदम म्हणजे वरती उचलणारा - म्हणजे गोविंद म्हणजे पृथ्वीचे रक्षण करणारा असाही अर्थ होतो. श्वेतवराह रूपात श्रीकृष्णाने भूदेवी पृथ्वीला वरती उचलून तिचे रक्षण केले. गो म्हणजे लक्ष्मी, विंदाम् म्हणजे कमळ. लक्ष्मी ज्याच्या कमळाप्रमाणे कोमल असलेल्या ह्रदयात राहते तो गोविंद.

विष्णूच्या गोविंद स्वरूपाची खास मंदिरे आढळून येत नाहीत.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय