गेले ते दिन गेले

बाळकृष्ण पाडळकर

सध्या वास्तव्य ट्रॉय, मिशिगन येथे.

डिसेंबर, २०२१मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये श्री. पाडळकरांच्या 'कथेकरी या पुस्तकाचे विमोचन श्री. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक नाशिकच्या सुप्रसिद्ध दिशोत्तमा प्रकाशन यांनी प्रकाशित केले. यापूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'कथनी' या कथा संग्रहाबरोबर 'कथेकरी' ग्रंथ विक्रीस उपलब्ध होता. वाचकांनी दोन्ही ग्रंथांना पसंती दर्शवून त्यांच्या प्रति विकत घेतल्या.

(हा लेख लेखकाच्या आगामी आत्मचरित्रातील भाग आहे). माझा जन्म सामान्य बालकांच्या जन्माप्रमाणे झाला नाही. मला एक थोरला भाऊ आणि एक बहीण होती.

बहिणीच्या पाठीवर जन्मणारे अपत्य अल्पायुषी असे. तिच्या पाठीवर जन्मलेल्या दोन भावांचा आणि एका बहिणीचा अल्प काळातच मृत्यू झाला. तिच्या पाठीवर अपत्य जास्त दिवस जगू शकत नाही असा सर्वसाधारण समज आमच्या कुटुंबात पसरला. या पार्श्वभूमीवर माझा जन्म झाला. मी सुद्धा माझ्या पूर्वीच्या भावंडांप्रमाणे अल्पायुषी असेन असा सगळ्यांचा कयास होता. त्यामुळे माझ्या जन्माचे कुटुंबात फारसे औत्सुक्य नव्हते. त्यात चांगली बाजू अशी की माझा जन्म गौरी आगमनाच्या दिवशी झाल्यामुळे ज्योतिषांच्या मते ही एक शुभ घटना होती. परंतु ही जमेची बाजू सोडल्यास बाकी काही नव्हते.

सकाळी मी जन्माला येताच माझ्या आत्याने मला एखाद्या सुवासिनीच्या ओटीत टाकावे असे सुचविले. मुले, मुली सुदृढ असलेल्या, नांदत्या घरातल्या सुवासिनीचा शोध घ्यायला सुरवात झाली आणि आमच्या शेतावर बटाईदाराचे काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीला या बाबत विचारावे असे ठरले. साधारण एक मैलाच्या अंतरावर हे बटाईदार कुटुंब वस्ती करून राहत होते. शेती हा त्यांचा पिढीजात धंदा होता. खाऊन पिऊन कुटुंब समाधानी होते. आत्या लगबगीने त्या बटाईदाराच्या पत्नीकडे गेली आणि तिने तिला गळ घातली. तिला हा तिचा बहुमान वाटला. ती लगेच या गोष्टीला तयार झाली. माझ्या आत्याने तिला पुढे घालून आमच्या घरी आणले आणि दुपारी मला त्या नवीन आईच्या ओटीत घालण्याचा कार्यक्रम नक्की झाला. आजूबाजूच्या सुवासिनींना बोलावण्यात आले. धार्मिक विधी झाल्यानंतर मला माझ्या नव्या आईच्या मांडीवर झोपवण्यात आले. मला ओटीत टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. बऱ्याच सुवासिनींनी माझी, माझ्या नव्या आईची दृष्ट काढली.

बटाईदाराची पत्नी त्या दिवशी आमच्याच घरी राहिली आणि दुसरे दिवशी माझे सगळे करून सकाळीच आपल्या वस्तीवर गेली. ती नित्यनेमाने रोज सकाळी आमच्या घरी येई, मला मांडीवर घेऊन बराच वेळ बसे, अंघोळ घाली आणि मी झोपल्यावर ती तिच्या घरी निघून जाई.

अंगाने कृश असलो तरी लहानपणापासून मला दोन दोन आयांचे प्रेम मिळाले. वडिलांचा व्यवसाय वकिलीचा होता त्यामुळे त्यांच्याकडे रोज मौकिलांचा राबता असे. सकाळी नऊ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांचे ऑफिस माणसांनी फुलून गेलेले असे. वडील गावातले नावाजलेले वकील होते. फौजदारी आणि महसूल खटल्यांमध्ये त्यांचा हात धरणारा कोणीही वकील गावात नव्हता. मौकील आसपासच्या खेड्यांमधून तारखेकरता येत. त्यांना माझ्या अनोख्या जन्माची गोष्ट माहीत असलेमुळे प्रत्येक मौकील आपल्या मकदूराप्रमाणे खेळणी, कपडे, दागिने मला भेट म्हणून आठवणीने आणीत असत. ओटीत गेलेल्या बालकाला निदान पांच वर्षे तरी घरातल्या कोणत्याही व्यक्तीने कपडेलत्ते, खेळणी देऊ नयेत असा अलिखित नियम होता. घरी येणारे लोक कधीही रिकाम्या हाताने येत नसत. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक कपडे, खेळणी जमा होत. देणाऱ्यांना “नको” म्हणण्याचे धारिष्ट कोणीही करीत नसे. पांच वर्षे घरच्या खर्चाने मला कपडे मिळालेच नाहीत. उलट भेटवस्तू म्हणून मिळालेले कपडे, खेळणी कित्येक वर्षे सांभाळावी लागली. माझे प्राथमिक शिक्षण निझाम राजवटीत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात झाले. निझाम राजवटीमध्ये माध्यमिक आणि उच्य माध्यमिक शिक्षणात उर्दूला प्राधान्य होते. एका खाजगी घरगुती शाळेत माझ्या शिक्षणाला सुरवात झाली. माझे गुरुजी हे शिक्षक कमी आणि अध्यात्मगुरु अधिक होते. शिक्षणात पाढ्यांऐवजी गायत्री मंत्र, रामनामाचा जप यांचा समावेश असे. त्यानंतर पाढे, उजळणी शिकविण्याचा त्यांचा प्रघात होता. याबरोबरच श्रीमद्भगवद्गीतेचे श्लोक तोंडपाठ करून घेण्याकडे त्यांचा कल असे. हे सगळे तोंडपाठ झाल्यानंतर मराठी अक्षर ओळख करून देण्याची त्यांची पद्धत होती. शाळा म्हणजे एक पुरातन मंदिर होते. या मंदीर वजा शाळेत मुलींचा समावेश नसे. बालवाडी, प्लेग्रुप वगैरे भानगड नव्हती. पहिली आणि दुसरीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय शाळेत प्रवेश घ्यावा लागे.

आमचे गुरुजी शाळा संपल्यानंतर गायत्री ध्यानात मग्न होत. त्यानंतरच ते अन्नग्रहण करीत. गुरुजींचे मूळ गाव जवळच होते. त्यांना बहुतेकजण कोंडापूरकर गुरुजी या नावाने ओळखीत. शाळेमध्ये शिकण्यासाठी फी वगैरे आकारण्याचा भानगडीत गुरुजी कधीही पडल्याचे मला आठवत नाही. मात्र श्रीमंत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या गायत्री देवीच्या मूर्तीसमोर मोठी रक्कम दक्षिणा म्हणून ठेवीत. गुरुजींनी या करता कधी कोणापाशी आग्रह धरला नाही. गुरुजींची हीच कमाई. त्यांना संसार, घरदार नव्हते. बहुदा ते बालसंन्यासी असावेत. त्यांचे घर म्हणजे गायत्री देवीचे छोटेखानी मंदिर. ते त्या मंदिरातच राहात.

मंदिराला लागून असलेल्या रिठ्याच्या झाडाखाली गुरुजी शाळा भरवीत. पाऊसपाण्याच्या दिवसात जवळच असलेल्या हनुमान मंदिराच्या प्रशस्त हॉलमध्ये त्यांचे शिक्षणाचे कार्य चाले.

विद्यार्थ्यांच्या कोणत्याही पालकाला भेटताच ते मोठ्याने “हरी -हरी” असे म्हणून अभिवादन करीत असत. त्यांचा पाढे म्हणवून घेण्याकडे, परवचा तोंडपाठ करवण्याकडे, निमकी, औटकीचे पाढे तोंडपाठ करवून घेण्याकडे विशेष कटाक्ष असे. त्या खालोखाल श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचे विशुद्ध उच्चार करवण्याकडेही त्यांचा कटाक्ष असे. त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या विद्यार्थ्याला तिसऱ्या वर्गात सहज प्रवेश मिळत असे. कोंडापूरकर गुरुजींचा धाक आम्हाला कधीही वाटला नाही. प्रत्येक विद्यार्थ्यावर पुत्रवत प्रेम करण्यात त्यांचा हातखंडा होता.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय