पाँडिचेरी : एक अविस्मरणीय अनुभव!

शुभदा जोशी-पारखी

शुभदा जोशी मूळच्या सांगलीच्या. व्यवसायाने आर्किटेक्ट असून सांगलीला प्रॅक्टिस होती. सध्या कोलंबिया, मेरीलँडमध्ये वास्तव्य. गायनाची आवड आहे. सांगलीत असताना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे.

पाँडिचेरी, दक्षिण भारतातील एक अगदी लहानसा केंद्रशासित प्रदेश. ह्या पर्यटन स्थळाबाबतच्या अनेकविध गोष्टींमुळे - निसर्गसौंदर्य, आध्यात्मिक पार्श्वभूमी आणि फ्रेंच वसाहतींचा वारसा - निर्माण झालेलं कुतूहल मला स्वस्थ बसू देत नव्हतं.

तिथे प्रत्यक्ष जाण्याची इच्छा कधी पूर्ण होईल याचा विचार मनात तरळत असतानाच एक दिवस माझ्या मैत्रिणीबरोबर त्याबाबत बोलणं झालं आणि तीदेखील तिथे जाण्याबाबत इच्छुक आहे हे कळल्यानंतर काही दिवसातच प्रवासाचा बेत आखून आम्ही तारीख निश्चित केलीदेखील! प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते ह्याचा प्रत्यय मला पुन्हा एकदा आला. मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याचे ते दिवस होते. माझी खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होणार होती, त्यामुळे माझ्या उत्साहाला उधाण आलं होतं. पाँडिचेरीबद्दल शक्य होईल तेवढी माहिती जमवून आम्ही रेल्वेमार्गाने प्रवासाला सुरुवात केली.

पाँडिचेरीच्या रेल्वेस्थानकावर उतरलो तेव्हा सकाळचे ९ वाजत आले होते. तिथून हॉटेलपर्यंतचा प्रवास आम्ही खाजगी कारने करण्यास पसंती दिली. कारमधून जातानाच तिथले पुढचे तीन दिवस आम्हाला एका वेगळ्या विश्वात रममाण होण्याची संधी मिळणार याची जणू खात्रीच पटली!

आम्ही तीन दिवसांचा मुक्काम “सी-साईड गेस्ट हाऊस” नावाच्या हॉटेलमध्ये आरक्षित केला होता. कारमधून साधारण तासभर प्रवास केल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. नावाप्रमाणे त्या हॉटेलसमोरील रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला विशाल असा बंगालचा उपसागर साद घालत होता. हॉटेलमधील आमच्या खोलीमधूनदेखील समुद्र अगदी दृष्टीक्षेपात होता. ते सागराचं खळाळतं सौंदर्य पाहून आमचा प्रवासाचा शीण कुठच्या कुठे पळून गेला. दुपारचे जेवण झाल्यावर थोडा वेळ आम्ही खोलीमध्येच सुस्तावलो. संध्याकाळी सूर्यास्ताची वेळ जवळ आली तेव्हा मात्र आम्ही हॉटेल समोरच्या रस्त्यापलीकडे गर्दीने फुललेल्या किनाऱ्यावर पोहोचलो. सूर्य अस्ताला जात असताना निसर्गाने आकाशाच्या पटलावर केलेली ती विविध रंगांची उधळण, माझ्या मनात आणखी एक नयनरम्य संध्याकाळ कोरून गेली. किनाऱ्यावर फेरफटका मारताना खळखळणार्‍या लाटांचे गाणंही सोबतीला होतंच. अंधार जसजसा गडद होऊ लागला तसे आम्ही रात्रीचे जेऊन हॉटेलमध्ये परतलो. दुसर्‍या दिवशी तेथील प्रसिद्ध श्री अरबिंदो आश्रम आणि त्यानंतर पॅराडाईज बीच येथे जाण्याचं निश्चित करून आम्ही गप्पांमधे रंगलो आणि थोड्या वेळातच निद्राधीन झालो.

बंगालच्या उपसागरावर उदयास आलेल्या सूर्याची कोवळी किरणं सुप्रभात म्हणत असताना आमच्या दुसर्‍या दिवसाची पहाट झाली. सगळं आवरुन झाल्यावर सकाळी ९च्या सुमारास आम्ही श्री अरबिंदो आश्रम पाहायला बाहेर पडलो, जो आमच्या हॉटेलपासून फक्त १० मिनीटांच्या अंतरावर होता. श्री. अरबिंदो घोष हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रभावशाली नेता तर होतेच पण त्यानंतर त्यांनी एक तत्त्वज्ञानी, योगी आणि आध्यात्मिक गुरु म्हणूनदेखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी त्यांच्या सहकारी, ज्या तिथे “मदर” या नावाने प्रसिद्ध आहेत, त्यांच्यासमवेत जवळपास शंभर वर्षांपूर्वी या आश्रमाची स्थापना केली. आश्रमात पोहोचताच तिथल्या वातावरणातील शांती आणि तृप्ती आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. हा आश्रम श्री अरबिंदो यांच्या असंख्य अनुयायींसाठी एक प्रेरणास्थान आहे. आश्रमात श्री अरबिंदो यांच्या जीवनप्रवासाबद्दल माहीती देणारी अनेक पुस्तके आणि त्यांच्या काही आध्यात्मिक ग्रंथांचे दालन, तसेच ध्यानधारणा करण्यासाठी प्रशस्त खोली आणि त्यांच्या समाधीची जागा आहे. हे सगळं फिरून बघताना श्री अरबिंदो यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा जीवनप्रवास आपल्याला प्रेरित करुन एक सकारात्मक ऊर्जा देऊन जातात. तसंच या आध्यात्मिक गुरूने त्यांच्या ग्रंथसंपदेतून केलेलं मार्गदर्शन आपलं जीवन समृद्ध करतं. खरंच, हा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यावा असाच होता…!

आयुष्यभर जतन करावा असा ठेवा सोबत घेऊन आम्ही आश्रमातून बाहेर आलो. दुपारचे बारा वाजत आले होते. त्यानंतर जेवण करून आम्ही हॉटेलमध्ये परतलो. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आम्ही तेथील प्रसिद्ध ‘पॅराडाईज बीच’कडे जायला निघालो. ह्या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या बीचवर जाण्यासाठी चुनांबर नावाची खाडी बोटीतून पार करून जावं लागतं. त्यासाठी लागणारं बोटीचं तिकीट काढून आम्ही बोटीत चढण्यासाठीच्या रांगेत उभे राहीलो. १० मिनीटांतच बोटीतून आमचा प्रवास सुरु झाला. बोटीतून जाताना बाजूने दिसणारी गर्द हिरवी झाडं आणि त्या झाडीतून स्वच्छंदपणे विहार करणारे विविध जातींचे पक्षी आपलं लक्ष वेधून घेतात. त्यांच्यासोबत बोटीतील हा प्रवास जास्तच सुखावतो. १५ ते २० मिनीटांच्या प्रवासानंतर जेव्हा आपण पॅराडाईज बीचवर उतरतो तेव्हा तो अथांग पसरलेला सागर आणि किनाऱ्यावरील ती अतिशय मुलायम, पांढरीशुभ्र रेती आपल्या नैसर्गिक सौंदर्याने मन मोहीत करतात. खरंच, जिकडे नजर फिरवावी तिकडे, निसर्गाने आपल्या सौंदर्याची मुक्त हस्ताने केलेली उधळण “पॅराडाईज बीच” हे नाव सार्थ ठरवते. तिथे स्थलांतर करून आलेले विविध जातींचे पक्षी म्हणजे पक्षीप्रेमींसाठी खास पर्वणीच ठरते. पॅराडाईज बीचचे ते सौंदर्य अनुभवत आणि कॅमेर्‍यात टिपत, आम्ही संध्याकाळी ६च्या सुमारास पुन्हा बोटीतून परतीचा प्रवास करून हॉटेलकडे जाण्याचा रस्ता धरला.

तिसरा दिवस तेथील प्रसिद्ध “ऑरोवील”, जे वैश्विक शहर म्हणून वसवलं आहे, त्यासाठी राखून ठेवला होता. तिथे लागणारं बुकिंग करून सकाळी ८च्या सुमारास आम्ही निघालो. ऑरोवील हे वैश्विक शहर म्हणून वसवण्याची मूळ संकल्पना ही आध्यात्मिक गुरु, ज्या तिथे “मदर” या नावाने प्रसिद्ध आहेत, त्यांची आहे. जगभरातील विविध देशांतील, अनेक धर्मांचे, संस्कृतींचे लोक तिथे आपलेपणाच्या भावनेने दैनंदिन व्यवहार सांभाळतात. ही संकल्पना खरंच खूप वेगळी आणि स्तुत्य आहे. ऑरोवीलमधील मुख्य आकर्षण म्हणजे “मात्रीमंदीर”! सोनेरी रंगाचा प्रचंड मोठा, गोल आकारातील, स्थापत्यशास्त्राचा हा उत्कृष्ट नमुना, पाहताक्षणीच आपली नजर खिळवून ठेवतो. ध्यानधारणा आणि योगाभ्यास करण्यासाठी तिथले रहिवासी तसेच बाहेरून येणारे अन्य पर्यटक तेथे जातात. हे मात्रीमंदीर ऑरोवील शहराचा जणू आत्माच आहे, असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही…! तीन दिवस चालू असलेल्या या पाँडिचेरी पर्यटनाची सांगता “ऑरोवील“ने झाली. निसर्गसौंदर्याला मिळालेली आध्यात्मिकतेची जोड आणि फ्रेंच तसेच दक्षिण भारतीय वास्तुशास्त्राच्या मिलाफातून उभ्या राहिलेल्या वसाहतींचा वारसा लाभलेल्या पाँडिचेरीबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच! हा अनुभव प्रत्यक्ष तिथे जाऊन घेतल्याशिवाय मनाचं समाधान होणं अशक्यच आहे. तरी देखील शब्दांतून व्यक्त होत, तो अनुभव नाही पण आनंद देण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय