पिझ्झ्याच्या गावाची गोष्ट

मैत्रेयी कुलकर्णी

"नेपल्सला गेलात तर तुम्ही दोनदा रडता. पहिले ते तिथे गेल्या गेल्या आणि दुसरे म्हणजे तिथून निघताना" इटालियन भाषेत अशी म्हण आहे. आता मी पडले शब्दाला जागणारी मुलगी! अस्मादिकांना कंपनीने प्रोजेक्टसाठी एक वर्षभर नेपल्स, इटलीला पाठवलं होतं, तेव्हा हे वाक्य अक्षरशः जगले.

म्हणीतला तो पहिला भाग मुद्दाम सांगण्याचं कारण हे की नेपल्स म्हणजे बाकी मुख्य युरोपियन शहरांसारखं शहर नाही. एकदा फक्त नेपल्स, इटली असं गूगलवर टाकून बघा! तिथे का राहू नयेच्या कारणांची जंत्री मिळेल!

त्यात ते होतं माझं पाहिलंच सीमोल्लंघन. तिथे प्रदीर्घ काळासाठी राहायला जाणारी प्रोजेक्टमधली मी पहिलीच भारतीय. तिथे ना धड कुणी ओळखीचं! असं भरपूर ओझं पाठीवर घेऊन गेले होते. पहिले काही दिवस चांगलेच रडापडीत गेले (उगाच खोटं कशाला बोला ना!). पण हळूहळू ते ओझं हलकं होत गेलं आणि त्या एका वर्षात आलेले भन्नाट अनुभव, केलेली फिरस्ती, भेटलेली माणसं आणि गोळा केलेल्या आठवणी ह्यांनी मात्र मला पार वाकवून टाकलं आणि नेपल्स माझं घर झालं.

प्रचंड वैभवशाली भूतकाळाच्या खुणा मिरवणारं हे शहर तसं आपल्याला माहीत आहे ते नापोलिटन पिझ्झ्यामुळे (नेपल्स -इटालियन नाव नापोली). पिझ्झ्याचा शोध लागलेल्या ह्या शहरात अगदी कोपऱ्यावरच्या बारक्या हॉटेलातपण जगातला भारी पिझ्झा मिळतो. आणि हो, इथे पिझ्झा म्हणजे जिभेचे चोचले, रंगीबेरंगी भाज्या, चीजचा भडीमार आणि खिशाला भार नाही बरं! इथला पिझ्झा ह्या सगळ्याच्या अलीकडे सुरु होतो. तो कधी गडबडीच्या वेळी पटकन तोंडात टाकायची गोष्ट असतो, कधी दमल्याभागल्या जीवाचा पोटाचा आधार असतो, रविवारी सगळ्या कुटुंबासोबत घेतल्या गेल्या जाणाऱ्या जेवणाचा महत्वाचा भाग असतो तर कधी संध्याकाळी मित्रांबरोबर गप्पांचा फड जमवायच्या वेळी हमखास हजर असणारा भिडू असतो! अगदी साध्यातला साधा पिझ्झा इथे कायम सुरात गाणारा कलाकार असतो. तो कायम रंगत जातो, चढत जातो आणि आपण त्याच्या आसपास रेंगाळत राहतो. हीच गोष्ट पास्त्याची आणि एकुणातच खाण्याच्या सगळ्याच पदार्थांची. तो एका वेगळ्या लेखाचाच विषय होईल! इथली स्थानिक, वैशिष्ट्यपूर्ण घरगुती वातावरणातली खाद्यपरंपरा "खाण्यासाठी जन्म आपुला" अक्षरशः सार्थ ठरवते.

अरे हो! सस्पेंडेड कॉफी इथलीच बरं का! फार सुंदर कल्पना ही! आपण एक कॉफी घेत असताना पैसे २ कॉफीचे भरायचे म्हणजे नंतर एखाद्या गरजूला त्याने सस्पेंडेड कॉफी संदर्भात विचारणा केल्यास त्याला फुकटात कॉफी मिळते. ही नंतर एक चळवळच बनली आणि असे कॅफे अजूनही नेपल्समध्ये सापडतात.

असो, खूप झाल्या खायच्याप्यायचा गोष्टी! नेपल्स इथेच संपत नाही. पोटोबानंतर विठोबा शोधायचा म्हटलं तरी फार काही धावाधाव करावी लागत नाही. संख्येने १००च्या वर चर्चेस, कमीतकमी २८०० वर्षाच्या गोष्टी सांगणाऱ्या Medieval, Renaissance आणि Baroque पद्धतीच्या इमारती, ३ वैशिष्टयपूर्ण किल्ले, संग्रहालयं, ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट’ म्हणून मिरवणारं आणि युरोपमधलं सगळ्यात मोठं ‘सिटी सेन्टर’, जमिनीच्या फक्त वरच नाही तर खालीपण आढळलेले आणि जतन करून ठेवलेले ग्रीक-रोमन अवशेष.... ही यादी मारुतीच्या शेपटासारखी!

हा तर आहे फक्त नेपल्स शहरातल्या कलाकृतींचा उल्लेख. नेपल्सपासून अर्ध्या तासावर आहे जगप्रसिद्ध पॉम्पेई. पार ७९ AD मध्ये ज्वालामुखी उफाळल्याने गाडली गेलेली, आता जतन करून ठेवलेली आणि ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ असणारी ही जागा आणि त्याला कारणीभूत ठरलेला आणि गेल्या १०० वर्षात उफाळून आलेला युरोपमधला एकुलता एक असा माऊंट व्हेसुव्हिअस पाहायला जगभरातले पर्यटक गर्दी करतात.

असो. काही म्हटलं तरी ही झाली दगडाधोंड्यांची कला. पण हे शहर इथेच थांबत नाही. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात कोणत्या ना कोणत्या रूपात कला भरभरून वाहते आणि ती बिनधास्तपणे आयुष्यावर भाष्य करते. तिला इथे मखरात बसवत नाहीत आणि खड्यासारखी बाजूला काढूनही ठेवत नाहीत.

त्यावरून एक गंमत आठवली. म्हणजे झालं असं की एकदा भर गावात फेरफटका मारत असताना मला मदर मेरीचं हातात पिस्तूल घेतलेल भित्तीचित्र दिसलं. खोटं नाही सांगत, जरा उडालेच! जरा माहिती घेतली तर प्रसिद्ध ग्राफिटीवाल्या बॅन्क्सी (Banksy ) बद्दल कळालं. एक तर हा ब्रिटिश भित्तिचित्रकार बुवा आहे का बाई हे पण मला आधी माहीत नव्हतं. पण माहिती मिळाल्यावर त्याच्या प्रेमातच पडले. त्याचं "Madonna with a pistol" हे इटलीमधलं एकुलतं एक उरलेलं काम नेपल्समधल्या खोलवर रुजलेल्या कॅथॉलिझम आणि बरोबरीने शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारी विश्वावर भाष्य करतं.

गोष्ट कला आणि कलाकारांची चालली आहे तर अजून एक गंमत आठवली, ती सांगते. एकदा ऑफिसमध्ये काम करत असताना कुठून तरी मला आपल्या "नशा ये प्यार का नशा हैं" ची धून ऐकू आली. आईशप्पथ, म्या पामराला सोडून अजून कुणी भारतीय आलाय का हे पाहायला मी वर पहाते तर माझाच एक इटालियन सहकारी गुणगुणत होता. अगदी एक सेकंद का होईना पण आपल्या बॉलीवूडच्या प्रसाराच्या विचाराने मन भरून आलं. पण चौकशी केल्यावर कळालं की त्याच चालीत एक खूप जुनं इटालियन गाणं आहे. मग काय सांगता! चोरीच्या आरोपाखाली गंमतीगमतीत मीच बिचारी झाले. पण जेव्हा खरंच त्यांना बॉलीवूडमधला कुणी माहीत आहे का हे विचारलं तेव्हा बाकी सगळे सुपरस्टार्स सोडून मला पाहिलं नाव सांगितलं गेलं ते कबीर बेदीचं!! कुण्या इटालियन सिरीयलमुळे तो तिकडे फार प्रसिद्ध आहे म्हणे. ऐकावं ते नवलच होतं माझ्यासाठी!

आपण अजूनही कलेबद्दल बोलत असू तर रोमच्या उल्लेखाशिवायपुढे जात येणार नाही. खरंतर एका ओळीत रोमला उरकणे हा त्या शहराचा अपमान केल्यासारखं आहे! जलद ट्रेनने गेल्यास नेपल्सपासून अगदी २ तासांवर असणारं हे गाव म्हणजे चालता बोलता इतिहास आहे. इथे प्रत्येक वळणाची गोष्ट आहे, एक मंत्रमुग्ध करणारा ताल आहे. ती एक वेगळीच दुनिया आहे. डॅन ब्राउनच्या दुनियेतलं रोम, रोमन हॉलिडेवालं रोम, व्हॅटिकन सिटी आणि पोपचं रोम, 'सुख' ह्या शब्दाला समानार्थी असणाऱ्या जेलातोचं रोम, एका दिवसात बांधलं न गेलेलं रोम (Rome was not built in a day! eehhhh…) ही मला दिसलेली काही रूपं.

बरं, कलेचा कल्ला खूप झाला. नेपल्स मध्ये कल्ला असतो तो लोकांचा पण! इथली माणसं जितकी गोड तितकीच, अंमळ जास्तच बडबडी! (म्हणजे माझ्यासाठी तरी! ). जोरजोरात हातवारे करत, आपल्याच मस्तीत हसत खिदळत जथ्थ्याने जाणारी तरुण मुलं-मुली इथे जिकडे तिकडे पाहायला मिळतात. आणि वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर जरा जुजबी ओळख आणि तुम्ही दोस्त बनणार. जरा तारा जुळल्या तर अगदी कुटुंबाचा हिस्सापण. इथली कुटुंबव्यवस्था तशी मजबूत. जोवर अगदी गरज पडत नाही तोपर्यंत तरुण मुलं आपल्या आईवडिलां सोडून राहात नाहीत. म्हणूनच की काय, माझ्या इटालियन हाऊसमेटला कितीतरी वेळ हे पचनीच पडत नव्हतं की मी एक पूर्ण वर्ष माझ्या घरच्यांपासून दूर राहत आहे.

इथे जरा पार्श्वभूमी सांगायला हवी. मी नेपल्समध्ये दोन इटालियन कन्यकांबरोबर घर शेअर करून राहात होते. एकीशी माझं जास्त जमायचं. लहानशी होती ती. पहिल्यांदाच घरच्यांना सोडून राहत होती. तिला तिचं इंग्लिश सुधारायच होतं, आणि मला इटालियन. तर आम्ही जगभराच्या गप्पा मारायचो. तिला भारताबद्दल अगदीच काही माहिती नव्हती. तिने मला घाबरत घाबरत "तुमच्याकडे अजूनही राज्य करायला राजा असतो का?” आणि नेहमीचचंच आपलं "तुमच्याकडे रस्त्यावर हत्ती आणि नाग असतात का?" वगैरे प्रश्नही विचारले. पण मी तिला भारतदर्शन घडवायचं आणि त्या बदल्यात ती मला तिचं नवं कॉलेज, तिला नुकताच आवडलेला एक मुलगा, सायन्सची तिला वाटणारी भीती, तिचे भविष्याचे बेत असं काय काय तिच्या तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये सांगायची. ती माझं 'घर' होती. आणि माझ्या सुदैवाने अशी अनेक सुंदर माणसं आणि घरं मला तिथे मिळाली.

मी तिथे एकाच वर्षांसाठी असल्याने शक्य होईल तेवढं फिरायचं उद्दिष्ट होतंच. मग कुणी मस्त सोबत असेल तर त्यांच्याबरोबर किंवा एकला चालो रे म्हणत १०-१२ देशात भ्रमंती करून झाली. तेव्हा मग फोटोंमधून, चित्रपटांमधून दिसणारा युरोप, रंगीबेरंगी भवताल पाहता आला.

बाकी भाग अलहिदा, पण ह्या सफरींमध्ये लक्षात राहिली ती माणसंच! पाहिलं की दुनियाभरातले लाखो जीव वारं प्यायल्यासारखे इकडूनतिकडे संचार करत असतात, आपली पोतडी भरत असतात. इतकं सहज असतं लोकांचं फिरणं. कासवाचं बिऱ्हाड जसं! जाऊ तिथे मिसळून जाणं, समोर आहे ते टिपून घेणं, हवं तसं व्यक्त होत राहणं.. एक लय असते ह्या आयुष्याला, कधी संथ कधी सरसरती, कधी मंद कधी भिरभिरती. मजा असते ह्या मस्तीत, शिकणं असतं, शिकवणंपण असतं.

युरोपभर भटकंती करत असताना संध्याकाळी जिथे परत यावंसं वाटावं असं घर मला एक वर्ष नेपल्समध्ये मिळालं. सगळंच हसीन नव्हतं आणि म्हणूनच छान होतं. तिथून निघताना ज्या इटालियन म्हणीचा मी सुरुवातीला उल्लेख केलेला त्याची खरी प्रचिती आली.

तसं रोमला गेले असताना तिथल्या Fontana Di Trevi मध्ये नाणी टाकून आले (असं म्हणतात की त्या कारंज्यात नाणी टाकली तर आपण परत तिथे येतो). म्हणजे परत कधी ना कधी तरी तिथे जायला मिळणार ह्या एका विचाराने मी तशी निश्चिन्त आहे.

तुम्ही जाणार आहात किंवा जाऊन आला आहात का इटली, नेपल्सला? मला नक्की सांगा!

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय