रंग प्रेमाचा

अश्विनी तातेकर-देशपांडे

मी क्लार्क्सबर्गमध्ये राहते. एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजियनर म्हणून नौकरी करते. लहानपणा पासून मला मराठी भाषेबद्दल प्रेम व आवड असल्यामुळे माझा मराठीमधून काहीतरी लिहिण्याचा सतत प्रयत्न असतो

गेल्या काही दिवसांपासून राधाचं मन कशातच लागत नव्हतं. एरवी शांत स्वभावाची, लाघवी, सहनशील राधा गेल्या काही दिवसात फारच चिडचिडी झाली होती. घरातील कामं, नवरा आणि मुलांच्या जबाबदाऱ्या, त्यांच्या वेळा, ऑफिस, सासूसासऱ्यांची सेवा या सगळ्या गोष्टी जी ती पूर्वी अगदी आनंदाने मनापासून करायची, त्या गोष्टी हल्ली यांत्रिकरित्या तिच्याकडून व्हायला लागल्या होत्या.

मुळात तिचा तसला स्वभावच नसल्यामुळे तिला आणखीच वैताग आला होता या सगळ्या यांत्रिक घडामोडींचा! आपल्याला नेमकं काय झालंय हे तिचं तिलाच कळत नव्हतं. वर्क फ्रॉम होम चालू असल्यामुळे ऑफिसमधील तिची घनिष्ट मैत्रीणसुद्धा तिला रोज भेटू शकत नव्हती. दुपारी लॅपटॉपवर ऑफिसचं काही काम करत असताना अचानक आईचा फोन आला. तिची आई खरं तर तिला यावेळी कधी फोन करत नसे, मग आजच काय बरं काम पडलं असेल आईला?

"हं आई, बोल."

"अग राधा, आहेस कुठे तू? इतक्यात तुझा काही फोन नाही म्हणून चुटपुट लागली होती. शेवटी न राहवून फोन केला तुला. ठीक आहेस ना गं?"

"हो आई, ठीकच आहे मी."

"ठीक वाटत नाहीयेस बेटा... मोहन कसा आहे? काही भांडण वगैरे झालं का तुमचं?"

"नाही गं, आमचं बरं चाललंय सगळं. तो त्याच्या कामात व्यग्र असतो आणि मी माझ्या. भांडायला वेळ कुठाय इथे?"

" हम्म ....उद्या होळी आहे. रंगपंचमी तुझा आवडता सण. सगळे छान मजा करा. आम्हाला प्रत्येक रंगपंचमीला तुझी आठवण येते. किती मनापासून तू हा रंगांचा सण साजरा करायचीस! तुझ्या संसारात तुझ्या आपल्या माणसांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भर. जशी पूर्वी हसत राहायचीस तशीच खूश रहा बेटा!"

एवढं बोलून आईने फोन ठेऊन दिला. पण राधाला आईच्या बोलण्याने गहिवरून आलं. ‘खरंच गेली ३-४ वर्षं आपण पहिल्यासारखी रंगपंचमी साजरी केलेलीच नाही याची तिला जाणीव झाली. आपण खरंच बदललो आहोत की मोहन, आधीचा भरभरून प्रेम करणारा मोहन, नाही राहिला?’ हा विचार ती करायला लागली. मोहन आणि तिच्या पहिल्या रंगपंचमीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. दोघं कॉलेजमध्ये शिकायला एकत्र होती. सतत हसरी, अवखळ आणि निरागस स्वभावाची राधा मोहनला खूप आवडायची. त्या दोघांमध्ये छान मैत्री होती. आपल्या मनातील भावना राधाला कळल्या, आणि तिला त्या आवडल्या नाहीत तर आपण एक चांगली मैत्रीण गमावून बसू याची भीती मोहनला होती. पण राधालासुद्धा मोहन मनोमन आवडायला लागला होता.

त्या वर्षी नेहमीप्रमाणे राधाच्या सोसायटीमध्ये रंगपंचमी साजरी होत होती. आसमंतात उधळले जाणारे रंग बघून राधा एखाद्या लहान मुलीप्रमाणे आनंदी झाली होती. होळीच्या रंगांमध्ये तिच्या आनंदाचे, उत्साहाचे आणि चैतन्याचे रंग एकरूप झाले होते. हे सगळं मोहन लांबून बघत होता. शेवटी न राहवून, सगळं बळ एकवटून तो तिच्यामागे येऊन उभा राहिला. त्याने तिच्या खांद्यावर हलकीशी थाप मारली. राधाने वळून बघितलं तर तिचा आवडता मित्र मागे उभा. ती काही बोलणार तितक्यात तो तिला म्हणाला, "तुझी हरकत नसेल तर तुला रंग लावू?" राधाला त्याच्या डोळ्यांतले प्रेमाचे भाव कळून चुकले होते. तिने लाजून डोळ्यांनीच त्याला संमती दिली, आणि मोहनने हळुवारपणे गुलाबी रंग लावताना राधाला लग्नाची मागणी घातली होती. ‘ती’ रंगपंचमी राधासाठी खास होती. आसमंतातील रंगांपेक्षा ती मोहनच्या प्रेमाच्या रंगात अधिक रंगली होती.

"ए मम्मा ..चल ना गं तू पण आमच्यासोबत रंग खेळायला," धाकट्या अभीरच्या हाकेने राधा भानावर आली.

"अरे, मला ना जरा काम आहे. तू दीदीबरोबर जा खाली रंग खेळायला," असं म्हणत तिने मुलांना खाली खेळायला पाठवलं आणि ती बाल्कनीच्या खिडकीतून आकाशात उधळले जाणारे रंग भावनाशून्य नजरेने बघत राहिली. मोहन सोबत नसलेली ही चौथी रंगपंचमी. लग्नानंतर नोकरीमध्ये झालेली प्रगती आणि त्या अनुषंगाने वाढलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये मोहन जणू हरवून गेला होता. दर महिन्याला ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी किंवा परदेशी वाऱ्या असतातच आणि त्या नसल्या तरी दिवसभर मिटींग्स आणि ऑफिस कॉल्स. तिच्या वाट्याला तो हल्ली येतच नव्हता आणि हेच मुख्य कारण होतं की राधाला कशातच रस राहिला नव्हता. आजही मोहन कंपनीच्या कामासाठी, मीटिंगकरता बाहेरगावी गेला होता. ‘आयुष्य किती बेरंगी आणि यांत्रिक झालं आहे आपलं!’ असा विचार करत असतानाच तिच्या खांद्यावर बसलेल्या हलक्याश्या थापेने भानावर येऊन राधाने मागे वळून बघितले, तर समोर हातात रंग घेऊन नेहमीप्रमाणे मिश्किल हसत मोहन उभा होता. क्षणभर तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना!!

"मोहन तू? अरे पण तू तर…"

"हो... मीटिंगकरता गेलो होतो, पण गेल्या काही दिवसांपासून आपलं काहीतरी चुकतंय याची सारखी जाणीव होत होती. नेमकं काय चुकतंय हे पाकिटातल्या तुझ्या हसऱ्या फोटोकडे बघून चटकन ध्यानात आलं आणि मग कसलाच विलंब न करता पहिलं विमान पकडून धावत पळत घरी आलो... माझ्या राधाच्या चेहेऱ्यावरचं हसू बघायला!"

"मोहन, मला माफ कर... मी फार वाईट आहे, मला वाटलं तू बदललास," असं म्हणताना राधाच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं.

"वेडाबाई! आणि तू अगदी तशीच आहेस, निरागस फुलासारखी... जरासं काही झालं की लगेच कोमेजणारी... तू माझ्यासाठी काय आहेस हे मी तुला शब्दांमध्ये नाही सांगू शकत राधा. मान्य करतो, की कामाच्या वाढत्या व्यापामुळे अनिच्छेने का होईना पण मी तुला वेळ देऊ शकत नाही, पण त्यामुळे माझं तुझ्यावर असलेलं प्रेम कमी थोडीच होतं? ते तर अगदी पहिले होतं तसंच आहे. माझ्या आयुष्यात असलेलं तुझं स्थान अबाधित आहे," असं म्हणत मोहनने राधाला मिठीत घेतलं आणि राधाच्या इतके दिवस धरून ठेवलेल्या अश्रूंना वाट मिळाली. तिचे अश्रू अलगद पुसत, गोड हसत मोहन राधाला म्हणाला, "तुझी हरकत नसेल तर तुला रंग लावू?"

जणू राधासमोर कित्येक वर्षांपूर्वी हरवलेला तिचा पूर्वीचा मोहन उभा होता. डोळ्यांमध्ये तेच भाव, ओठांवर तेच हंसू!! आज कितीतरी दिवसांनी राधा लाजली होती. लाजून लाल झालेल्या तिच्या गालांवरचा रंग ती मोहनच्या प्रेमात पूर्ण रंगून गेलेली आहे याची साक्ष देत होता. आज पुन्हा आसमंतातील होळीच्या रंगांपेक्षा राधा आणि मोहनच्या प्रेमाचा रंग कितीतरीपट सुंदर दिसत होता.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय