संपादकीय


एप्रिल २०२३
अंक २

मैत्र संपादक मंडळ २०२३ 

वरदा वैद्य 

विदुला कोल्हटकर 

रोहित कोल्हटकर 

कपिल धाकड 

मधुर पुरोहित 

दीप्ती जोशी 

 

बाममं कार्यकारिणी २०२३ 

अध्यक्ष 

अनीश पाटील 

उपाध्यक्ष 

सम्राज्ञी शिंदे  

 उपाध्यक्ष- विपणन 

पंकज शिवपुजे  

चिटणीस 

केतन शहापुरे 

खजिनदार 

योगेश खैरनार 

सह-खजिनदार 

स्मितेश लोकरे

मुलांच्या कार्यक्रमांचे आयोजन-
वैशाली खैरनार

ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन-
सुषमा भोसले

बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधी -
राजेंद्र मोडक

नमस्कार मंडळी,

वृक्षलतांचे देह बहरले, फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिला
आला वसंत ऋतू आला

मराठी मनात वसंत ऋतू सुरू होतो तो आम्रवनांतून वसंतवैभव गाणाऱ्या कोकीळकूजनाने. आंब्याच्या मोहरात लपून गाणारा कोकीळ काही दिवसांतच चाखायला मिळणाऱ्या आंब्यांच्या सुमधुर चवीची आठवण करून देत असतो. चैत्रगौरीच्या वाटल्या डाळीची आणि पन्ह्याची आठवण ह्या दिवसांत होतेच. आंबा आणि आंब्याचे पदार्थ खाल्ल्याशिवाय उन्हाळा मार्गी लागला असे वाटत नाही. बाल्टिमोर मराठी मंडळाच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक कलाकारांनी गुढीपाडव्यानिमित्त सादर केलेल्या ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाला तुम्ही हजेरी लावली असेलच. ह्या पट्टीच्या कलाकारांना ऐकण्याची संधी आपल्याला पुन्हा मिळेल अशी आशा करू या.

उन्हाळा आणि प्रवासाचेही अतूट नाते असते. उन्हाळी सुट्टीमध्ये आजोळी, मामाच्या गावाला जाऊन राहण्यासाठी, नातेवाईकांना भेटण्यासाठी, देशविदेशाच्या सफरी करण्यासाठी वेळ काढला जातो. मुलांच्या शाळांना सुट्टी असल्यामुळे प्रवासाचे बेत आखले जातात. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही कुठे जाणार आहात? तुमच्या प्रवासातील अनुभव आम्हाला जरूर लिहून कळवा. शिवाय उन्हाळ्याची सुरुवात म्हणजे ‘ग्रॅज्युएशन’ची वेळ. तुमच्या घरी कोणी शाळेतून, कॉलेजातून ग्रॅज्युएट होणार असतील तर त्यांचे अभिनंदन आणि त्यांना पुढच्या शिक्षणासाठी, पुढच्या आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा. तुमचा, तुमच्या मुलांचा कॉलेज प्रवेशाचा अनुभव कसा होता? कॉलेज, शिक्षण विषय तुम्ही कसे निवडलेत, त्यासाठी कोणते निकष लावलेत, त्याबद्दल जरूर लिहा. इतरांना तुमचे अनुभव मार्गदर्शक ठरतील.

२०२३ वर्षातला दुसरा अंक वाचकांच्या हाती ठेवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ह्या अंकासाठी भरभरून लेखन पाठवलेल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार. पुढील अंकांसाठीही तुम्ही लेखन पाठवत राहाल अशी आशा करतो. ह्या अंकामध्ये देशविदेशातील तीन प्रवासवर्णने आहेत - राजस्थानमधल्या प्रवासातील अनोखा अनुभव, पॉंडिचेरीला दिलेली भेट आणि इटलीतील नेपल्स शहरातील वास्तव्याचे अनुभव अंकात वाचायला मिळतील. जात्या हिवाळ्यात इथे बर्फ पडला नसला तरी अमेरिकेतील बर्फयाचा अनुभव एका लेखात वाचता येईल. एक व्यक्तिचित्र, दोन कविता, दोन कथा आणि लहानपणीचा एक अनुभवही ह्या अंकात आहेत.

गेले वर्षभर आपण चित्रसाहित्य हे सदर चालवले. आम्ही एखाद्या सूत्राला धरून असलेली चार चित्रे प्रत्येक अंकात दिली आणि त्यावरून सुचलेले लेखन तुम्ही आम्हाला पुढच्या अंकात प्रकाशित करण्यासाठी पाठवले. गेल्या अंकामध्ये ‘चंद्र’ ह्या सूत्रावर आधारित चार चित्रे दिली होती. त्यावर आधारित एक कथा आणि दोन लेख ह्या अंकासाठी मिळाले. चंद्र कसा तयार झाला त्याची कहाणी एका लेखात, तर आपल्या सौरमालेतील वैशिष्ट्यपूर्ण चंद्र वा उपग्रहांबद्दलची माहिती दुसऱ्या लेखात वाचता येईल. चंद्राला साक्षी ठेऊन घडलेली एक कल्पित कथाही ह्या अंकात वाचा. गेल्या अंकाप्रमाणेच ‘कवितेचं पान’आणि ‘पौराणिक कथा’ ह्या सदरांतले पुढचे भाग प्रकाशित केले आहेत. त्याचबरोबर, विष्णूच्या चोवीस नावांची माहिती देणारे नवे सदर ह्या अंकापासून सुरु करत आहोत. सदरांतर्गत भागांचे लेखन पाठवणाऱ्यांचे आभार.

मैत्राचा पुढचा अंक जुलै महिन्याअखेरीस प्रकाशित होईल. त्या अंकासाठी तुम्ही भरभरून साहित्य पाठवाल अशी आशा करतो. अंकासाठीचे साहित्य १५ जुलैपर्यंत editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर पाठवायचे आहे. नेहमीप्रमाणे कथा, कविता, लेख, अनुभव, पाककृती, कला/छायाचित्रे, छंद, प्रवासवर्णन, मुलाखत, वगैरे सर्व साहित्यप्रकारांचे स्वागतच आहे. तसेच, मैत्र संपादक मंडळामध्ये सहभागी होण्याची तुमची इच्छा असल्यास आम्हाला जरूर कळवा.

चैत्रापासून सुरु झालेल्या नवीन वर्षात तुमच्या हातून सातत्याने आणि सकस लेखन घडो, ही सदिच्छा!

कळावे,
संपादक मंडळ

मुखपृष्ठ - ‘ही वाट गुलाबी’
छायाचित्रकार - विदुला कोल्हटकर

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी