चित्रसाहित्य - अमळनेरचा दगडी दरवाजा

श्रीमती चित्रा धाकड
Elkridge MD

आश्चर्य वाटले असेल ना? दगडाचा कुठे दरवाजा असतो का? दगडाचे जाते, दगडाची मूर्ती असते मग दरवाजा का असू नये? लाकडी दरवाजा, लोखंडी दरवाजा ठीक पण दगडी दरवाजा?

हो! दगडी दरवाज्याबद्दल आश्चर्य वाटत असेल, पण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात बोरी नदीकिनाऱ्यावर एक भुईकोट किल्ला होता. ह्या किल्ल्याचा दगडी दरवाजा अजूनही टिकून आहे. अमळनेर शहर प्रतिपंढरपूर म्हणूनही ओळखले जाते. तिथे सखाराम महाराजांची वाडी आहे. विशेष म्हणजे आजही नदीपात्रात वैशाख शुद्ध एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत यात्रा असते. पौर्णिमेच्या चंद्राचे प्रतिबिंब त्या पाण्यात पडते व ते पाणी चकाकते. हे दृश्य खूप आकर्षक असते. आजही त्या किल्ल्याच्या परिसरात टाळ-मृदंगांचा ध्वनी दुमदुमतो, हरिनामाचा 'पुंडरिक वरदे हरी विठ्ठल' चा गजर ऐकायला मिळतो. दरवाजातून जातानाच त्या लहरी जाणवतात. असंख्य वारकऱ्यांच्या, संतांच्या, भाविकांच्या पदस्पर्शाने तो दरवाजा धन्य झालेला आहे व त्या परिसरात जाताच खूप प्रसन्न वाटते. रथ व पालखी या दगडी दरवाजातून बाहेर पडतात. नदीकिनारी तोडकी-मोडकी तटबंदी आहे. परंतु आजही त्या किल्ल्याचे प्रवेशद्वार ताठ मानेने उभे आहे. इतिहासाची ती साक्ष आहे. त्या दरवाज्याने कितीतरी सुख-दुःख, युद्ध, लढाया पाहिल्या असतील, अनेक शूरवीर योद्धे धारातीर्थी पडलेले पाहिले असतील! राजे, राजवाडे, तोफा, हत्ती, नगारखाने सगळ्यांना सांभाळून त्याने या अमळनेरच्या, महाराष्ट्राच्या भूमीचे रक्षण केले. हा दरवाजा किती वर्षांपूर्वीचा असेल हे नेमके नाही सांगता येणार, तरी ११/१२व्या शतकातला असावा असे वाटते. या किल्ल्याचा इतिहास आणखी कुणाकडून तरी जाणून घ्यायला हवा, पण तो सांगणारे आता कुणीच नाही.

देश स्वतंत्र झाला तेव्हा अमळनेरमध्ये पहिले झेंडावंदन या दगडी दरवाजावरच झाले. आमचे बालपण त्या दरवाजाच्या सहवासात गेले. त्यावेळी या दरवाज्याबद्दल मोठ्यांकडून माहिती घेण्याचे सुचले नव्हते. आता त्या दरवाजाची खूप आठवण येते. छाती अभिमानाने व गर्वाने फुलून येते व त्या दरवाजापुढे मस्तक नकळत झुकते. पूर्ण किल्ला भुईसपाट झाला तरी हा दरवाजा आज तेवढ्याच प्रेमभराने, आदराने आमचे स्वागत करत असतो. आजही तो दरवाजा आपल्याशी बोलत आहे असे वाटते. मागील एकदोन वर्षांत दरवाज्याचा थोडा भाग ढासळला असे समजले तेव्हा मनाला खूप वेदना झाल्या, वाईट वाटले. तेवढी तरी आठवण राहू दे, देवा आम्हाला! कुणी त्याच्याकडे बघा, नका बघू, त्याच्याशी बोला, नका बोलू, पण तो तुम्हाला एकच मागणी करतो, की ‘मला मी जिथे आहे तिथे अशाच अवस्थेत उभे राहू द्या! मी खूप वादळ-वारे, ऊन-पाऊस सोसले व पहिले आहेत. मी तुमच्या गावाचे वैभव आहे.’

बाकी नामशेष होत असताना जे आहे ते सांभाळणे, जतन करणे आपल्या हातात आहे. हे किल्ले बांधण्यासाठी आपल्या पूर्वजांनी किती रक्ताचे पाणी केले असेल! तेव्हा कुणी इंजिनिअर नव्हते, तरीही शतकानुशतके ते किल्ले, बुरुज व त्या तटबंद्या टिकून राहिल्या आहेत. पूर्ण दगडी काम आहे. आताच्या इमारती तर शंभर-दोनशे वर्षेही टिकत नाही. जुन्या काळी एवढ्या यंत्रणाही नव्हत्या तरी हे बांधकाम, ही शिल्पकला, स्थापत्यकला आपल्या भारतभूमीत कमी-अधिक फरकाने पाहायला मिळते.

एकंदरीतच दरवाजे नुसते आपले स्वागत करत नाहीत तर आपल्याला शक्ती व प्रेरणा देतात. शिवाजी महाराजांच्या काळात संध्याकाळी गडाची दारे बंद झाली तेव्हा हिरकणीला बाळाच्या ओढीने घरी जाण्यासाठी बुरुजावरून उतरण्याची शक्ती या दरवाज्यानेच दिली. दरवाजा उघडा असता तर ती सरळ घरी गेली असती. पण हे बंद दरवाज्यामुळे घडून आले व आजही हिरकणीचा बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. तसेच कारागृहाचे दरवाजेही बंद असतात. ठराविक वेळेलाच ते उघडतात. कैद्यांना जेवण, चहा एका खिडकीतून देतात. उजेड येणासाठी उंचावर झरोके असतात. तरीही आमच्या लोकमान्य टिळकांना ‘गीतारहस्य’ नावाचा महान ग्रंथ लिहिला. ही प्रेरणा कुठून मिळाली? तुरुंगाचे दरवाजे तर बंद होते, पण मन व बुद्धीचा दरवाजा कुणीच बंद करू शकत नाही! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर खूपच लेखन व काव्य लिहिले आहे. लेखणी जवळ असेल-नसेल तर त्यांनी स्मृतीपटलावर लिहून ठेवले व वेळ मिळेल तसे कागदावर उतरविले. त्यांचे बरेच साहित्य, काव्य इंग्रजांनी जप्त केले. जे आपल्याजवळ आहे ते विचार, तो ठाव आपण जतन करू. ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे लेखन पूज्य सानेगुरुजींनी कारागृहातच केले. आपल्याला जर कोणी असे कैदेत ठेवले असते तर आपण वेडे झालो असतो. हे महान लोक देशप्रेमामुळे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी वेडे झाले होते. एकच ध्यास होता की माझी भारतमाता केव्हा स्वतंत्र होईल?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची झोपडी हाच त्यांचा महाल होता व सर्व सुखे त्या झोपडीत होती. झोपडीला धरतीचा गालिचा, आकाशाचे छत होते, चंद्र, सूर्य हे जणू दिवे होते. खळखळ वाहणारा झरा, पाखरांची किलबिल, अंगाला झोंबणारा झुळझुळ वारा हे त्यांचे संगीत होते. त्यांचा झोपडीला कुलूप काय पण साध्या दोऱ्यासुद्धा नव्हत्या म्हणूनच ते म्हणतात, "पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या!"

अजूनही खेडेगावात दिवसा दरवाजे उघडे असतात. त्यांना पडदापण नसतो. घर बांधताना दाराची चौकट ठेवून त्याची पूजा करतात. वास्तविक चौकटीची पूजा का तर दरवाजा सांगतो की तो या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदरसत्कार करेल, या घराचे रक्षण करेल. आपणही बघा, कधी कुणाकडे गेलो तर सरळ घरात जात नाही. दरवाज्यात थांबतो व आत येऊ का विचारतो. आपल्या दाराचा उंबरठाही आपल्याला आपण कुठे जात आहोत, केव्हा परत येऊ ते विचारतो. चांगले विचार घरात येतात. वाईट विचार बाहेरच राहतात. घरात जर काही भांडण झाले तर वडीलधारी मंडळी सांगतात, "तू या दरवाजाबाहेर पडताना दहा वेळा विचार कर, मग बाहेर पाऊल टाक! नाहीतर हा दरवाजा तुझ्यासाठी कायमचा बंद आहे!" किती जबरदस्त शक्ती आहे या दरवाज्यात! आपण संध्याकाळी दाराबाहेर दिवा लावतो. आपल्याकडे प्रत्येक घराच्या दरवाजाला शुभ कार्यात आंब्याच्या पानांचे तोरण व इतर वेळेस किंवा कायमसाठी विविध प्रकारचे आकर्षक तोरण लावलेले असते व ते या दरवाज्याचे सौंदर्य वाढवतात. दारापुढे आकर्षक रांगोळी असते. नववधूही सासरच्या घरात येते तेव्हा ती गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश करते व त्या घराची अन्नपूर्णा बनते.

आपल्या भारताचेही प्रवेशद्वार आहे. या भारत मातेचा दरवाजा आपल्या सर्वांसाठी उघडा आहे, अगदी अंमळनेरच्या या दगडी दरवाजाप्रमाणेच. आपल्या पुढच्या पिढीला ते उरलेले अवशेष दाखवत, तो इतिहास सांगत, आपला हा दगडी दरवाजा त्यांचेही तितक्याच उत्सुकतेने स्वागत करणार आहे. असे बरेच किल्ले आहेत की त्यांच्या दरवाजाला वेगवेगळी नावे आहेत. उदाहरणार्थ, अमरावतीच्या परकोट किल्ल्याचे प्रवेशद्वार, अंबागेट, दिल्ली गेट, नागपूर दरवाजा, जवाहर दरवाजा अशी बरीच नावे आहेत. तसे अमळनेरच्या या दरवाजाला दगडी दरवाजा म्हणूनच ओळखतात. हा दरवाजा आपल्याला दगडाप्रमाणे कणखर होण्याची प्रेरणा देतो.

जे जुने अवशेष आहेत त्यांचे आपण जतन करूया, त्यांना प्राणपणाने जपूया, इथल्या मातीचा टिळा कपाळीं लावून, इथल्या शूरवीरांच्या शौर्यगाथा पिढ्यानपिढ्या गात त्यांचे स्मरण करूया. आपली संस्कृती, आपली मायबोली टिकवून ठेवूया.

Comments

  1. अप्रतिम!!! खुप सुंदर वर्णन केलंय मावशी तुम्ही त्या दगडी दरवाजा च! 🙏 मी सून आहे अमळनेर ची...पण मला एवढी माहिती नव्हती. आज तुमचं लिखाण वाचून मला मोलाची माहिती मिळाली. मी प्रणम्या लाही सांगेन ही माहिती वाचायला☺️

    ReplyDelete
  2. खूपच छान मावशी 👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  3. Khupch sundar varnan kele mavashi

    ReplyDelete
  4. राजेंद्र धाकड,धुळे.May 2, 2022 at 10:18 AM

    खूप छान.

    ReplyDelete
  5. ताई मला लेख लिहिला खूप आवडले आणि राहा अपडेट 😂

    ReplyDelete
  6. Bhagyshri dhakad very nice mavshi😥

    ReplyDelete
    Replies
    1. हेमलता वाकड, अमळनेर

      Delete
  7. नमस्कार आत्या....वा... अप्रतिम लेख , काही नविन माहिती मिळाली.. खूप छान.

    ReplyDelete
  8. Khup chan mawshi

    ReplyDelete
  9. Khup chan mawshi

    ReplyDelete
  10. Sunder mahiti. Hence Abhinandan by Ravindra K Dhakad

    ReplyDelete
  11. खूप छान माहिती दिली ताई..

    ReplyDelete
  12. खूप सुंदर लेख आहे ताई🙏👌

    ReplyDelete
  13. खूप छान......

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान आजी

      Delete
  14. खूप छान माहिती व लेखही खूप छान लिहिला आहे.

    ReplyDelete
  15. ताई खुप छान शब्दरचनेने प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दृष्ये उभे राहीलीत व काही वेळ त्या वास्तूत भ्रमण केल्यासारखे जाणवले.
    खुप छान माहीती.💐👏💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

मी पाहिलेला हिमालय