चित्रसाहित्य - कहाणी दरवाजाची

दीपा अनिल नातू

मैत्रच्या मागील अंकामध्ये चार चित्रे दिलेली होती. सर्व चित्रांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे दार किंवा दरवाजा. तर अशा या दरवाज्याला अनेक नावाने संबोधतात - दार, दरवाजा, कवाड, ताटी, अडसर, कडीपाट, वगैरे.

दार हा घरासोबत असणारा एक अविभाज्य घटक आहे. दार मग ते घराचे असो, एखाद्या झोपडीचे असो किंवा देवळाचे असो, प्रत्येक ठिकाणी ते असतेच. दारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. घरांना सागवानी लाकडाचे, मोठ्या इमारतींना लोखंडी, राजवाड्याला असलेले मोठमोठे दरवाजे आणि त्याला दिंडी दरवाजासारखा आणखी एक छोटा दरवाजा असतो. चंद्रमौळी झोपडी असली तरी तिला पत्र्याचा किंवा साधा ताडपत्रीचा दरवाजा तरी असेल, पण दरवाजा हा असतोच. देवापुढे जाताना कायम नतमस्तक होऊन जायला हवे म्हणून देवळाचे प्रवेशद्वार हे नेहमी छोटे असते. घरात आले आणि दरवाजा लावला की प्रत्येकाला आपल्या घरात सुरक्षित वाटते. घरी आई, आजी आपल्याला सांगत असत की तिन्हीसांजेला दरवाजा लावू नये, ती लक्ष्मी घरात यायची वेळ असते.

पूर्वीच्या काळी गृहिणी सकाळी उठून दाराबाहेर सडा टाकून सुंदर रांगोळी काढत असत. अजूनही बऱ्याच फ्लॅटच्या दाराबाहेर रांगोळी काढलेली दिसून येते. घरात प्रवेश करताना प्रसन्न वाटते. सणासुदीला, विशेषतः गुढी पाडवा, दसरा, दिवाळी अशा मोठ्या सणांना आपण दारावर फुलांचं तोरण लावतो. घरात मंगलकार्य असते तेव्हाही दारावर गणपतीचे चित्र लावून तोरण लावायची प्रथा आहे.

आपल्या लहानपणापासून दार हे आपल्या आयुष्याशी निगडित आहे. नवजात बाळाला आई घरी घेऊन येते तेव्हा पहिल्यांदा दारात ओवाळून मगच बाळ आणि आई घरात प्रवेश करतात. बाळ रांगायला लागले की बाहेर जाऊ नये म्हणून दाराला फळी लावली जाते. बाळ शाळेत जायला लागले, शाळेच्या दाराशी आई सोडून गेली की रडवेले होते आणि शाळा सुटल्यावर शाळेच्या दारापाशी आणायला आलेली आई दिसल्यावर बाळाच्या चेहऱ्यावर हसू फुटते. थोडे मोठे झाल्यावर एकटे शाळेत, महाविद्यालयात गेल्यावर घरी यायला नेहमीपेक्षा उशीर झाला तर दारात येरझाऱ्या घालणारे आई-बाबा दिसतात. नववधूचे स्वागत दारावरच्या उंबरठ्यावर माप ओलांडून करण्यात येते. नविन घरात, पहिल्यांदा सासरी आल्यावर ती नववधू बंद दरवाज्याआड डोळ्यांत येणाऱ्या अश्रूंना वाट करून देते. माणूस जन्माला आल्यावरही प्रथम दरवाज्यातूनच प्रवेश करतो आणि अंतिम यात्राही दरवाज्यातून बाहेर पडल्यावरच चालू होते. मित्र-मैत्रिणी, बहिणी, मायलेकी यांच्या गप्पा घरात कितीही मारून झालेल्या असल्या तरीही दारापर्यंत पोहचवायला गेले की तिथे उभे राहून मारलेल्या गप्पांची मजा काही वेगळीच असते. काही घरे अशी असतात जिथे एकत्र कुटुंब असते. अशा घरांचे दरवाजे कधी बंद नसतात. कायम कोणीतरी घरी असतेच. बंद दरवाज्यांच्या आड काही गुप्त मसलती, कटकारस्थाने, अनैतिक धंदे, कौटुंबिक हिंसाचार असे प्रकारही चालतात.

मराठीमध्ये काही वाक्प्रचारही आहेत- घरादारावर नांगर फिरविणे, दारात हत्ती झुलत असणे, दारी आलेल्याला कधी विन्मुख पाठवू नये, दारात पाऊलसुद्धा न टाकणे.

ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून दार हा शब्द अनेक कविता, गाणी ह्यांमध्ये आढळतो - ‘इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी, मोगरा फुलला’, ‘चिंता, क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा’, ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’, ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’, ‘उघड दार देवा आता उघड दार देवा.’

वासुदेव दारात येऊन म्हणत असे, “रामाच्या पारी देवाच्या दारी वासुदेव आला.”
लहान बाळासाठी ओव्या म्हणताना, ‘नको येउस गं घरी अशी भरल्या पायांनी, उभी राहा दारी घेई पायांवर पाणी.’
बडबडगीत आणि लहानमुलांच्या गोष्टींमधले उल्लेख - ‘उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले’ ह्या गाण्यात ‘सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी’, ‘चिऊताई चिऊताई दार उघड!’
भोंडल्याच्या गाण्यांमधले उल्लेख- ‘ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडुदे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी’, ‘अरडी गं बाई परडी, परडीमध्ये काय गं, परडीमध्ये फूल गं, दारी मूल कोण गं’. काही गीतांमधले उल्लेख - ‘दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फडफडे’, ‘सूर गुंफिते सनई येथे, घडे चौघडा दारी’, ‘प्रिय सखे दारी याचक उभा’.

आपल्या देशातील कित्येक ऐतिहासिक वास्तूंचे दरवाजे प्रसिद्ध आहेत. पुण्यातील प्रसिद्ध शनिवार वाड्याला पाच दरवाजे आहेत - १. दिल्ली दरवाजा २. मस्तानी दरवाजा ३. खिडकी दरवाजा ४. गणेश दरवाजा आणि ५. नारायण दरवाजा. ऐतिहासिक औरंगाबाद शहर ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात असे. त्यातील बहुतांश दरवाजे आता नामशेष झाले असले तरी अजून ९ दरवाजे शिल्लक आहेत. फत्तेपूर सिक्रीचा बुलंद दरवाजा, मुंबईमधील ‘गेट वे ऑफ इंडिया’ प्रसिद्ध आहेत.

अशी ही दरवाजांची कहाणी सफल संपूर्ण.

Comments

Popular posts from this blog

गाईड

कवितेचं पान - शिशिरागम