डोपामिन उपवास

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर.

आपल्या मेंदूत संदेशवहन दोन प्रकारे होते: पेशींमधून निघणाऱ्या ‘धाग्यांमधून’ सरळ विद्युतप्रवाह जातो. पण दोन पेशींना जोडणाऱ्या या धाग्यांच्या मध्ये छोटीशी जागा असते, जिला सायनॅप्स असे नाव आहे. या जागेच्या एका बाजूने लहान रासायनिक संयुगे सोडली जातात, जी दुसऱ्या बाजूच्या रिसेप्टर नावाच्या खोबणीला चिकटून पुढचा विद्युतप्रवाह निर्माण करतात. या संयुगांना ‘न्यूरोट्रान्समीटर’ असे नाव दिले जाते. मेंदूत अशी किमान सत्तर संयुगे सापडली आहेत, पण त्यातले एक अत्यंत महत्वाचे संयुग म्हणजे डोपामिन.

डोपामिन हे संयुग दोन महत्त्वाची कामे करते: एखादी गोष्ट ‘दखलपात्र’ आहे हे मेंदूच्या निदर्शनास आणून देणे आणि आपल्याला हवे ते मिळाल्यास त्याचा ‘आनंद’ (प्लेझर) निर्माण करणे. सामान्य, नेहमीच्या अवस्थेत ही कामे महत्त्वाची आहेतच, पण आपल्या मेंदूच्या या जैवरासायनिक वैशिष्ट्याचा गैरफायदा घेत त्यातून मोठी जाहिरातबाजी आणि व्यसनाधीनता निर्माण केली जात आहे. यामुळेच सध्या ज्या देशात पैसा अधिक तिथे दुःख, निराशा अधिक असे विचित्र चित्र निर्माण झाले आहे.

सर्व सोशल मीडिया याचा फायदा उठवितात. तुम्हाला त्या मीडियावर अडकवून ठेवण्यासाठी ‘अटेन्शन इंजिनीअरींग’ नावाचे नवे 'शास्त्र’ निर्माण झाले आहे, ज्याच्या विकासावर अब्जावधी डॉलर्स खर्च केले जात आहेत. तुमच्यासमोर जाहिरातबाजी करणे असा यामागील सुप्त उद्देश असतो. पाश्चात्य देशांत आता याविरुद्ध लोक न्यायालयांतही जाऊ लागले आहेत. तसेच नशेची अनेक द्रव्येही असा आनंद निर्माण करतात. शेअर-बाजारातल्या ‘सट्टेबाजीचे’ व्यसन, तसेच जुगाराचे व्यसन यामागेही हे डोपामिन असू शकते.

या सर्व अनिष्ट गोष्टींनी मेंदूत मोठ्या प्रमाणात डोपामिन निर्माण होते. यांच्या ‘किक’ ची एकदा सवय लागली, की कमी डोपामिन देणारी कामे नकोशी होतात. उदाहरणार्थ, अभ्यास, घरकाम, कोणतेही गंभीर काम, वाचन, स्वच्छता, घराची आवरासावर वगैरे वगैरे. हे घडत असल्यास आपल्याला ही समस्या निर्माण झाली आहे/होऊ घातली आहे हे लक्षात घेणे.

तसेच मेंदूमधील एकाच भागात आनंद आणि दुःख/निराशा यांचा खेळ चालतो. कोणत्याही एका बाजूचा अतिरेक झाल्यास, सामान्य स्थिती निर्माण करण्यासाठी मेंदू उलट्या बाजूची कृती करतो. यामुळेच सणासुदीच्या, मोठ्या पार्टीच्या ‘दुसऱ्या दिवशी’, ते सर्व संपल्यावर एक विचित्र निराशा, रिकामपणा, भकासपणा जाणवितो. डोपामीन किक्स अशा सतत चालू ठेवल्यास मेंदू अधिकच दुःख/निराशा या स्थितीकडे दीर्घकाळ आणि अधिक तीव्रतेने झुकतो, ज्यातून मानसिक समस्या निर्माण होतात.

आपण अशा ‘अति-डोपामिन’ जगात सध्या राहात आहोत. पाश्चिमात्य देशांत ही मोठी समस्या निर्माण झाली आहे, आणि भारतही त्याच दिशेने चालला आहे असे वाटायला जागा आहे. यावर मुख्य उपाय सांगितला जातो तो म्हणजे अनेक दिवसांचा (२ आठवडे?) ‘डोपामिन उपवास’ ज्यात -
- सर्व मीडिया, टीव्ही बघण्याचे टाळणे. 'स्क्रीन’ नको. कागद-पेन्सिल लेखन, पुस्तक वाचणे चालू शकेल.
- शक्य तेव्हा बाहेर फिरायला जाणे, जमल्यास गावाबाहेर/शहराबाहेर.
- व्यायाम, योगासने.
- मित्र आणि कुटुंबियांशी संबंध वाढविणे.
- घरात आणि आसपास ‘काय करण्याची गरज आहे’ हे बघणे आणि ते करणे.

  आपल्याला यापासून तीन प्रकारे दूर राहता येते:
१. समय : उदा. फेसबुकवर संध्याकाळी सहानंतरच जाणे, आणि केवळ २० मिनिटेच त्यासाठी देणे.
२. अंतर : संगणक आणि फोनपासून स्वतःला नियोजित काळ दूर ठेवणे. अमेरिकन मुले दर तासाला वीस वेळा फोनकडे बघतात. अगदी नोकरीचा इंटरव्ह्यू चालू असतानाही त्यांना हे केल्याशिवाय राहवत नाही. अशा परिस्थितीत ठरलेला काळ (उदा. दोन तास) फोनपासून दूर राहणे एवढा एकच मार्ग उरतो.
३. प्रकार : यातील अति-हानिकारक प्रकारांपासून (उदा. जुगार) स्वतःला पूर्णपणे दूर ठेवणे.

यातून बाहेर पडण्यासाठी, डोपामिन उपास करण्यासाठी जे मनोबल लागते ते सर्वांकडे असतेच असे नाही. अशा वेळी एखाद्या जवळच्या व्यक्तीला याबाबत सहाय्यक मानून आपली याबाबतची प्रगती/अधोगती अत्यंत प्रामाणिकपणे तिच्यासमोर मांडत राहिल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.

यासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी :
- मुख्य म्हणजे आपल्याला असे 'नादावले’ जात आहे याचे सतत भान ठेवणे. सोशल मीडियाच्या आधी आपण कसे रहात होतो याचा विचार करा. ते आयुष्य वाईट नव्हते!
डोपामिन अनेक प्रकारे उपयुक्तही असतेच, उदाहरणार्थ स्नायूंच्या चलन-वलनासाठी डोपामिनची गरज असते. डोपामिननिर्मात्या पेशी अतिशय कमी होऊन डोपामिनचे प्रमाण अतिशय घटल्यास कंपवात (पार्किन्सन्स डिसीझ ) होऊ शकतो. पण निरोगी, सामान्य माणसांत हे होत नाही. डोपामिन उपवासाशी याचा संबंध नाही.

- मेंदू हळूहळू पूर्ववत नक्की होतो.
(अधिक अभ्यासासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या व्यसन-उपचार विभागाच्या प्रमुख Dr. Anna Lembke यांचे ‘Dopamine Nation: Finding Balance in the Age of Indulgence’ हे पुस्तक उपयोगी पडू शकेल.) शुभेच्छा!

Comments

Popular posts from this blog

गाईड

पौराणिक कथा - भाग २ - अष्टवसूंची कथा