चमकदार अभ्रकाची काळीकुट्ट कहाणी
बाळकृष्ण पाडळकर |
सध्या वास्तव्य ट्रॉय, मिशिगन येथे. |
झारखंड राज्यातील कोडेरमा, गिरिडीह जिल्हे अभ्रकाची राजधानी म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी जगातल्या अभ्रकाच्या उत्पनाच्या ६०% उत्पादन भारतात होत असे. परंतु शासनाच्या धोरणामुळे त्यात थोडी घट निर्माण झाली.
जंगलतोड विरोधी नियमांमुळे जंगलतोड करून डोंगरकपारीतल्या बिळात, गुहासदृश जागेत सापडणाऱ्या अभ्रकाच्या उत्पादनात घट झाली. परंतु ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. अवैध खाणकामाला पुन्हा जोमाने सुरवात झाली.
डोंगर कपारीत, गुहेसारख्या भागात अभ्रक सापडते. अभ्रकाचा अंश असलेले दगड वेचण्याचे, डोंगरातून ते कोरून काढण्याचे जिकरीचे काम जाडजूड असणारी माणसे करू शकत नाही. कारण त्यांना डोंगर कपारीत असलेल्या गुहेत शिरणे शक्य होत नाही. त्याकरता पाच ते पंधरा वयोगटातली लहान मुले अथवा शिडशिडीत अंगकाठी असलेल्या महिलांनाच बेकायदेशीररीत्या अभ्रकाच्या दगडाचे उत्खनन करण्याकरता या भागातले गुत्तेदार निवडतात. झारखंड राज्यातील बहुसंख्य लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे, त्यामुळे लहान मुलांचे पालक त्यांना शाळेत न पाठवता रोजगार मिळविण्यासाठी खाणीमध्ये काम करण्यासाठी पाठवणेच पसंत करतात. लहान मुलांच्या प्रचंड संख्येमुळे गुत्तेदारांचे उत्पन्न वाढते आणि कवडी किमतीची मजुरी देऊन ते अभ्रक असलेले दगड या मुलांना डोंगरातून उकरून काढण्यास प्रवृत्त करतात. लहान मुले दिवसाकाठी २०-२५ किलो दगड कोरून काढू शकतात. त्यामानाने प्रौढ व्यक्ती दिवसाकाठी इतके दगड उकरून काढू शकत नाहीत, कारण अरुंद जागेत जाऊन काम करणे त्यांना शक्य नसते. २०-२५ किलो दगड कोरून काढणाऱ्या मुलांना शंभर -सव्वाशे रुपये रोज मिळतो. एवढी कामे करण्याची प्रौढांची क्षमता नसते. किरकोळ मजुरी देऊन गुत्तेदार अभ्रक असलेल्या दगडावर प्रक्रिया करून त्यातून अभ्रक वेगळे करतात आणि देश-परदेशामध्ये विकून दाम दुपटीने पैसे कमावतात.
लहानपणापासूनच हाताला कोणतेही संरक्षण नसल्यामुळे काही दिवसांनी मुलांची नखे झडायला लागतात, त्यानंतर बोटांची अग्रेही क्षतिग्रस्त होतात आणि हळू हळू संपूर्ण हातच काम करण्याच्या स्थितीत राहत नाही. पंजापासून थेट खांद्यापर्यंत हाताच्या त्वचेला अनाकलनीय अशा त्वचारोगाने पछाडलेले बरेच रुग्ण स्थानिक रुग्णालयांतल्या डॉक्टरांच्या निदर्शनाला आले आहेत. यानंतरची स्थिती म्हणजे क्षयाची लागण. बरीच वर्षे खाणीत काम केल्यामुळे, खाणीत प्राणवायूचा पुरवठा कमी असल्यामुळे, क्षयाबरोबरच श्वसनाच्या व्याधींना कोवळ्या वयातल्या मुलांना सामोरे जावे लागते. स्थानिक रुग्णालयात महिन्याकाठी क्षयरोगाचे ३०-४० नवीन रुग्ण दाखल होतात, ही अवैध व्यवसायाची शोकांतिका आहे.
जंगलतोड केल्याशिवाय डोंगरातील गुहा पोखरणे शक्य नसते. अवैध खाणकाम करणारे गुत्तेदार जंगलाची सफाई करून वनसंपदाही घश्याखाली घालतात आणि त्यांचा अभ्रक उत्खननाचा व्यवसाय निर्वेधपणे चालू असतो, त्यांना त्यामुळे दुहेरी उत्पन्नाचा फायदा होतो.
वन विभाग जंगलतोडीविरुद्ध सतत कार्यवाहीच्या पक्षाचा असतो, परंतु राजकीय दवाब, अपुरी यंत्रणा आणि स्थानिक लोकांची दडपशाही यामुळे या व्यवसायावर बंधने यायला मर्यादा येतात.
मोठ्या व्यक्तींचीही मुलांप्रमाणे अवस्था होते. अतिपरिश्रमामुळे क्षयाची लागण, तोंडातून रक्त पडणे, श्वसनाच्या व्याधी, त्वचारोग या सारख्या जीवघेण्या स्थितीला त्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते. कमाई बुडेल म्हणून या व्यक्ती दवाखान्यात जाऊन उपचारही घेऊ शकत नाहीत, परिणामी त्यांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे कौटुंबिक, सामाजिक घडी विस्कटून दुरवस्था निर्माण होते.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लहान मुलांची ही दुरवस्था दिल्लीस्थित कैलास सत्यार्थी या इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या निदर्शनाला आली. वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी त्यांनी लहान मुलांच्या पुनरुत्थानाकरता काम करण्याचा संकल्प सोडला. आजवर त्यांनी लहान मुलांना काम करण्यापासून मुक्त करण्याकरता अनेकविध कार्यक्रम राबविले आहेत. मध्य प्रदेशच्या विदिशा शहरात जन्मलेल्या या तरुणाने पोटतिडिकेने बालमजूर मुक्ती संग्राम मोठ्या जोमाने चालवला. जगातल्या सगळ्या बालमजुरांची पिळवणूक थांबविण्यासाठी कैलास सत्यार्थी यांनी जनजागृती करण्यासाठी १०२ देशाची ८३००० किलोमीटरची यात्रा केली. भारतातही पस्तीस दिवसाच्या १९००० किमीच्या पदयात्रेतून कैलास सत्यार्थींनी बाल कामगारांना अवैध कामातून मुक्त करण्याचे अभियान चालवले. याकरता त्यांनी ‘बचपन बचाओ’ आंदोलन सुरु केले . २००४ मध्ये कैलास सत्यार्थींनी ‘कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. त्यापूर्वीच त्यांना प्रतिष्ठेचे रॉबर्ट एफ केनेडी पारितोषिक आणि सन्मान पत्र देण्यात आले होते. हा सन्मान मानवतावादी कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो.
रांचीस्थित बाल कामगार मुक्ती संघटनेने कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशनच्या मदतीने शेकडो बाल मजुरांना भयानक अभ्रक खाणकामातून मुक्त केले, त्यांचे पुनर्वसन करून त्यांना योग्य शिक्षण मिळेल याची तजवीज केली. त्यामुळे झारखंडमध्ये खाणीत काम करणाऱ्या लहान मुलांची संख्या कमी झाली. होणारे बालमृत्यू कमी झाले, बालकामगारांचे अनारोग्य थांबले. यापूर्वी बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणाऱ्या खाणीत अपघात होत, मृत्यू होत, ज्याची नोंद कुठेही ठेवली जात नसे, या अपप्रवृत्तीला आळा बसला.
खाणीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन करतांना कैलास सत्यार्थींनी स्थापन केलेल्या संस्थेमार्फत कुपोषण, लहान मुलांची बेकायदेशीर होणारी तस्करी, लैंगिक अत्याचार कमी करणे यावर भर देण्यात आला. त्यामुळे संस्थेचे काम वाढले. झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशासह सहा राज्यांत संस्थेला आपली कार्यालये सुरु करावी लागली. कामाचा व्याप वाढल्यामुळे संस्थेला ‘बाल मित्र मंडळ’ योजनेद्वारे मुलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन त्यांना निरामय आयुष्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम हाती घ्यावे लागले. ग्रामविकास प्रक्रियेमध्ये मुलांचे म्हणणे ऐकून घेण्याची तरतूद करण्यात आली, मुलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्याची, बालविवाहाला विरोध करण्याची ‘बाल मित्र ग्रामा’मध्ये शक्ती निर्माण झाली. लोकशाही मूल्यांची, आपल्या हक्काची जाणीव त्यामुळे लहानपणापासूनच निर्माण होण्यास मदत झाली. आज भारत, नेपाळ आणि युगांडामध्ये ५४० ‘बाल मित्र ग्राम’ कार्यरत आहेत. यामुळे किमान १,३६,२११ व्यक्तींवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पडला आहे.
निःस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या या संस्थेने कोडेरमा, गिरिडीह जिल्ह्यांव्यतिरिक्त झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमधील अल्पवयीन मुलांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आता अभ्रकाच्या खाणीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या खूपच कमी झाली आहे. अभ्रकाला कृत्रिम अभ्रकाचा पर्याय सापडला आहे. इलेक्ट्रॉनिक चिप्स, मोटारगाड्यांचे चमकदार रंग, आयलॅश, लिप्स्टिकचे रंग या प्रसाधनात अथवा इलेक्ट्रिक उपकरणात जरी अभ्रक आजही मोठ्या प्रमाणात वापरात असले तरी बरेच उद्योग समूह पर्यायी अभ्रकाचा उपयोग करतात, याचे श्रेय कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशनला जाते यात शंका नाही.
अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच कैलास सत्यार्थींना २०१४ मध्ये त्यांच्या सामाजिक कार्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. जरी हे पारितोषिक मलाला युसूफझाई आणि कैलास सत्यार्थी यांमध्ये विभागून मिळाले असले तरी त्यामुळे कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशनच्या कार्याचे महत्त्व कमी होत नाही. २०१५ मध्ये मानवतेच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठाचा सन्मान त्यांना देण्यात आला. युनोनेही त्यांच्या समाजाप्रती, मानवतेप्रती केल्या गेलेल्या कार्यांची नोंद घेतली. ‘जस्टीस फॉर एव्हरी चाईल्ड’ - मुले स्वतंत्र, सुरक्षित, सशक्त आणि शिक्षित असावीत हे संस्थेचे घ्येय आहे.
मात्र जी-७ मधील बलाढ्य, श्रीमंत राष्ट्रांनी जागतिक बालकल्याणासाठी त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केवळ ०.१३% रक्कम राखून ठेवली आहे, हे दुर्दैवी आहे.
Comments
Post a Comment