शहाण्याला शब्दांचा…

वरदा वैद्य

एकास एक संगतीची अपेक्षा करत गणित शिकावे तसा मराठी शिकण्याचा प्रयत्न (खरेतर कंटाळा) करणाऱ्या माझ्या मुलाकडून आलेले काही प्रश्न मला मराठी भाषेबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडतात.

तर आमच्यातला सुरुवातीचा संवाद काहीसा असा होता-
मुलगा: आई, व्हॉट इज ‘उडी मारली’?
मी: उडी म्हणजे जम्प. उडी मारली म्हणजे ही ऑर शी जम्पड.
मुलगा: पण मारणे म्हणजे टु किल ऑर हिट ना? मग हाऊ डु यु किल अ जम्प?
उडी म्हणजे जम्प आणि मारणे म्हणजे किल/हिट, पण म्हणून उडी मारणे म्हणजे किलिंग अ जम्प असा एकास एक संबंध भाषेबाबत कसा लावायचा नसतो हे बरीच लांबण लावत मला त्याला समजावून सांगावे लागले. ते समजावताना आपोआपच माझाही ह्या क्रियापदाचा जरा खोलात विचार/अभ्यास झाला.

मारणे ह्या मराठी क्रियापदाची व्युत्पत्ती मृ (अर्थ -मरणे, मृत्यू पावणे) ह्या संस्कृत धातूच्या प्रयोजक रूपापासून झाली आहे. मार (नाम) आणि मारणे (क्रियापद) ह्या शब्दांचे कोशांतले अर्थ पाहू.

मार - पुल्लिंगी एकवचन. ठोक; चोप; ताडण. वझे आणि मोल्स्वर्थ शब्दकोशांमध्ये शाब्दिक माराचाही उल्लेख आहे. दाते कोश आणि बापट पंडितांच्या शुद्ध मराठी कोशामध्ये तसेच (वा. गो. आपटेकृत) मराठी शब्दरत्नाकरामध्ये ‘मार’चा अर्थ मदन असाही दिलेला आहे. शब्दरत्नाकरामध्ये मार शब्दाचे अर्थ माप आणि गर्दी असेही दिलेले आहेत. शुद्ध मराठी कोश, शब्दरत्नाकर आणि (कृ. पां. कुलकर्णीकृत) मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये भार, पुष्कळ, फार, विपुल असाही अर्थ मार ह्या शब्दासाठी दिलेला आहे.

मारणे - ठार करणे, जीव घेणे (शब्दकौमुदी कोश, शब्दरत्नाकर), ह्याबरोबरच आघात करणे (मराठी व्युत्पत्ती कोश), प्रहार करणे (शब्दरत्नाकर) असा मारणे क्रियापदाचा अर्थ दिलेला आहे.

ठोकणे, पिटणे, हाणणे, झोडणे, ताडणे, कुटणे, बडवणे, सडकणे हे मारण्याचे समानार्थी शब्द म्हणता येतील, पण त्यात जीवे मारण्याचा अर्थ येत नाही. काहीवेळा मारपीट, मारझोड, मारहाण/हाणामारी, मारामारी, माराकुटी (करणे), असे जोडशब्द वापरले जातात. मारण्यास उत्सुक व्यक्तीला मारकुटा/मारकुटी वा मारका/मारकी म्हटले जाते. उदाहरणार्थ, मारकी म्हैस.

मार शब्दाचा पुष्कळ/फार हा अर्थ मारा, भडिमार (भडीमार, भडेमार वा भडमार असेही म्हणतात), उपासमार, मारामार वगैरे शब्दांमध्ये येतो, असे मला वाटते. भडिमार म्हणजे त्वेषाने/मोठ्याने/सातत्याने केलेला हल्ला वा मारा. उदाहरणार्थ, तोफगोळ्यांचा भडिमार. खूप काळ खाण्यास न मिळाल्याची स्थिती (शुद्ध मराठी कोश) म्हणजे उपासमार. मारामार म्हणजे अतिशय श्रम. उदाहरणार्थ, दिवसभर मारामार करावी तेव्हा कुठे पोटाला दोन घास मिळतात. एखाद्या वस्तूची, गोष्टीची, कौशल्याची मारामार असणे म्हणजे अतिशय प्रमाणात उणीव वा कमतरता असणे. घेमार/घेघेमार (दाते, मोल्स्वर्थ) म्हणजे घनचक्कर, अतिशय गडबड, बेसुमार. उदाहरणार्थ, घेमार गर्दी. पुष्कळ मारामारी असलेल्या चित्रपटाचा उल्लेख देमारपट असा केलेला वर्तमानपत्रात पूर्वी वाचल्याचे आठवते.

मारणे म्हणजे आघात करणे. तो आघात कशाने तरी आणि कशावर तरी केलेला असतो. त्यामुळे मारण्याला कर्माची गरज असते, म्हणजेच ते सकर्मक क्रियापद आहे. हा आघात एखाद्या शस्त्राने जिवे मारण्यासाठी केलेला आघात असेल, जीव न घेता दुखापतीच्या उद्देशाने केलेला आघात असेल वा कोणतीही दुखापत न होणारी क्रिया करण्यासाठी केलेला आघात असेल. तो वस्तूने वा शरीराच्या अवयवाने केलेला असेल वा शब्दाने केलेला आघात असेल.

नुसते मारले म्हटल्यावर संपूर्ण अर्थबोध होत नाही. काय मारले? तर उडी मारली (जमिनीवर आघात), थाप मारली (शाब्दिक आघात किंवा तबल्या/ढोलक्यावर हाताने आघात), बाता मारल्या, गप्पा मारल्या (शाब्दिक आघात), फटके मारले/लाथ मारली (हाताने/काठीने/पायाने आघात), टोमणे मारले (शाब्दिक), (पाण्यात) सूर मारला, (घोड्याला) टाच मारली, (आमटीचा, चहाचा) भुरका मारला, हाक मारली, डोळा मारला, मिठी मारली, वगैरे. ‘वास मारण्या’मध्ये थेट आघात नसला तरी नाकावर दुर्गंधीमुळे होणाऱ्या अत्याचाराचा आघात अपेक्षित असावा.

आपण आघाताच्या जोरानुसार आणि मारण्यासाठी वापरलेल्या अवजारानुसार धक्का, चापटी, फटका, धपाटा, रट्टा, गुद्दा, बुक्का/बुक्की, लाथ वगैरे शब्द वापरतो. मारण्याने जखम झाली नाही, पण मार लागल्या ठिकाणी दुखत असेल तर त्याला आपण मुकामार म्हणतो. बेदम मार म्हणजे मनुष्य निपचित पडेपर्यंत दिलेला मार (संदर्भ - फारसी-मराठी शब्दकोश). शब्दकोश धुंडाळल्यावर माराचे विविध प्रकार आणि मारासाठी वापरलेले विविध शब्द सापडले. ह्यातले काही ‘मार’ मी पूर्वी कधी ऐकलेही नव्हते.

टाप/टापर- घोड्याच्या खुरांचा मार (मोल्स्वर्थ शब्दकोश), भरकांडा/भिरकांडी/भराका - (भिरकावण्यातून मिळालेला) मार (मोल्स्वर्थ), चौखुंटीमार - चोर, दरवडेखोर लोकांकडून पैसे काढण्यासाठी एखाद्याला पोटावर झोपवून त्याचे हात-पाय खुंटाला बांधून पाठीवर चोप देत त्याला चौखुंटीमार म्हणतात (दाते शब्दकोश), देवढामार - लागोपाठ, सततचा मार वा भडीमार (दाते), गपका/भतका (मोल्स्वर्थ), घेघे- निकराचा हल्ला (दाते), तमांचा - कुस्ती वा लाठीमारामध्ये प्रतिस्पर्ध्याच्या कानशिलावर दिलेला मार, धपका - हिसका, धक्का, काठीचा मार (दाते), गोंगरण/गोंगराण - जेरीस येईपर्यंत द्यायचा मार (दाते), गुपतमार (दाते)/गुप्तघाला (मोल्स्वर्थ) - गुप्तपणे केलेला हल्ला, झटका/झणाटा - झटकारा, सपका (मोल्स्वर्थ), माचेमार - खेटराने, पायताणाने दिलेला मार (दाते), धरदमार - दरोडा (दाते), वगैरे (संदर्भ-बृहद्कोश.ऑर्ग). आणखीही प्रकार सापडू शकतील.

एवढी लांबण लावूनही पुन्हा “आई, हाऊ कॅन एनीवन ईट मार?” असा प्रश्न आला तेव्हा मी कपाळावर हात ‘मारत’ म्हटले, “थांब हो, चांगला ठोक देते. एकदा मार खाल्लास की तुला थेटच कळेल कसा खातात ते!” शहाण्याला शब्दांचा तर मूर्खाला टोणप्याचा मार अशी म्हण आहेच.

Comments

  1. लई भारी 👍👍💐

    ReplyDelete
    Replies
    1. फारच सुंदर..

      Delete
  2. Very nice, enjoyed your writing

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख! या निमित्ताने 'माराचे' प्रकार कळले. :D

    ReplyDelete
  4. Chakhal shabda vishleshan kele aahes tu Varada, goshta rupat. Faarach masta.

    ReplyDelete
  5. Nice article. End is perfect.

    ReplyDelete
  6. खूप अभ्यासपूर्ण आणि रंजक झाला आहे लेख

    ReplyDelete
  7. खूपच छान !

    ReplyDelete
  8. अतिशय अभ्यास पूर्ण

    ReplyDelete
  9. Thank you All! - Varada

    ReplyDelete
  10. "मारणे" किती प्रकारे होऊ शकते याचे छान वर्णन. ताना (गाण्यातल्या) मारणे आणि थापा (द. मा. मिरासदारांचा "नाना नव्व्याणवबाद" आठवतो) या तर वेगळ्याच कला आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चित्रसाहित्य - अमळनेरचा दगडी दरवाजा

गृहलक्ष्मी