परत आम्लेट कॉफी आंघोळच ना?

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन.








 परत आम्लेट कॉफी आंघोळच ना?

महाशिवरात्र. तिथीने वाढदिवस.
येऊन पासष्ठ वर्षे झाली. आल्या आल्या
सर्वांना निर्जळी उपवास. तू लेका "तसलाच",
उपवास न करणारे मित्रही चेष्टेने म्हणत
(एकही संधी सोडत नसत. त्यातले दोघे
आता गेले. इमेल आली होती.)
तर सांगायचे काय की सकाळी उठावे
आम्लेट खावे, कॉफी प्यावी, आंघोळ करावी
यातून बाहेर कसे पडावे हे समजत नाहीये.
फार जगून झाले आहे असे नाही. नाही असेही
नाही. काय डॉक्टर तुम्ही तर दीडशे ला
टच करण्याचे विज्ञान लिहिताय ना? अरे हो,
पण ते ज्यांना "ते" हवे आहे त्यांना. मधून मधून
तोही प्रोजेक्ट (जगणे प्लॅन करण्याचा, पुस्तक
लिहिण्याचा नव्हे!) उत्साहाने करतो. कधी कधी
थकलो की म्हणतो मरो तिच्यायला. उद्या सकाळी
परत आम्लेट कॉफी आंघोळच ना? तर गुर्जी
तसे नाही. डोळ्यासमोर घुमणारी सूर्य-पृथ्वी सिस्टीम
केवळ अद्भुत आहे. कितीही वेळ पहात रहावी.
बाहेर पडण्याची मूर्ख बडबड केवळ वयस्क
उद्विग्नेतून, चुकून कधीतरी. कवितेचे शीर्षक
चुकले आहे. माफ करा. स्वतःलाच
"वाढदिवसाच्या शुभेच्छा!" कसे?

Comments

Popular posts from this blog