जागतिक आरोग्य दिवस, ७ एप्रिल २०२२

डॉ. जयश्री कुलकर्णी- खेरा

भारतात नेत्ररोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ म्हणून शासनात उच्च पदावर काम केले. वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित. सध्या साइक्सविल, मेरीलँड येथे वास्तव्य. भटकंती, लिखाण, वाचन, संगीत, नृत्य, हेल्दी कुकिंगची आवड.

मित्र-मैत्रिणींनो, कोविडच्या जागतिक महामारीमध्ये (Pandemic) गेली दोन अडीच वर्षे आपण जागतिक आरोग्य संघटनेचे नाव सातत्याने ऐकत आहोत.

ही संघटना दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक स्तरावर जागतिक आरोग्य दिवस साजरा करीत असते. याचा उद्देश जगभर सर्वसामान्य जनतेत आरोग्याविषयी जनजागृती करणे असा असतो. दरवर्षी एक सूत्र ठरवून एक ब्रीदवाक्य बनविले जाते. साधारण त्या वेळेस ज्या आरोग्यसमस्येला प्राधान्य असते, त्यानुसार सूत्र निवडले जाते. १९५० पासून ही प्रथा सुरु झाली. जरी या दिवशी ब्रीदवाक्य जाहीर केले जात असले तरी वर्षभर त्यानुषंगाने कार्यक्रम घेतले जातात. या वर्षीचे म्हणजेच ७ एप्रिल २०२२ चे सूत्र आहे ‘Our planet, our health - आपली पृथ्वी, आपले आरोग्य’.

आपण सध्या ज्या जगात राहतो आहोत त्यात सर्वांसाठी स्वच्छ, शुद्ध हवा आणि पाणी उपलब्ध आहे का? आपली अर्थव्यवस्था चांगल्या आरोग्यासाठी केंद्रित केलेली आहे का? आपली गावे, शहरे आरोग्यपूर्ण आहेत का? आणि आपला आपल्या आरोग्यावर आणि वातावरणावर ताबा आहे का? दुर्दैवाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर *नाही* असेच येईल! आपले राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक निर्णय आरोग्याशी खेळ करणारे आहेत. ९०% लोक श्वासाद्वारे दूषित हवा आत घेतात.

अजून कोविड-१९ महामारी संपलेली नाही. प्रदूषणामुळे दमा (अस्थमा), कर्करोग (कॅन्सर), हृदयविकार (हार्ट डिसीजेस) वाढीस लागले आहेत. जागतिक स्तरावर दूषित हवेमुळे दर मिनिटाला १३ लोकं मृत्युमुखी पडतात. ३६० कोटी (३.६ बिलियन ) लोकांना अजूनही स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. वीस लाख (२ मिलियन) लोकांना अजूनही पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. आठ लाख २९ हजार लोक दरवर्षी अतिसाराने (डायरिया) मृत्युमुखी पडतात, ज्याचे कारण दूषित पाणी आणि उघड्यावर शौच हे आहे. दरवर्षी वीस लाख (२ मिलियन) लोकांना डासांपासून पसरणारा डेंग्यू होतो.

या ७ एप्रिलपासून जागतिक आरोग्य संघटना मानवाचे आणि पृथ्वीचे आरोग्य सुधारण्यासाठी जागतिक स्तरावर तातडीची पावले उचलत आहे. त्यांच्या मते दरवर्षी वाईट वातावरण, दूषित हवेमुळे होणारे १३ लाख (१.३ मिलियन) मृत्यू रोखले जाऊ शकतात. म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणावर आलेले संकट हे मानव जातीवर आलेले संकट आहे. तापमानात होणारी वाढ आणि त्यामुळे वाढणारी डासांची संख्या ही त्यापासून होणारे आजार कितीतरी जास्त पटीने पसरवत आहेत. कमालीचे ऊन, कमालीची थंडी, वारंवार येणारी वादळे, अवकाळी पाऊस, पाण्याचे दुर्भिक्ष्य असे सर्व वातावरणातील सर्व बदल मानवी आरोग्यास घातक ठरत आहेत. प्लास्टिक आणि इतर कचऱ्यामुळे पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. असा कचरा अक्षरशः हिमालयात सुद्धा सापडू लागला आहे!

सतत बाहेरचे, प्रक्रिया केलेले अन्न खाणे, चुकीचे खाणे, कधीही खाणे, यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. पर्यायाने अगदी लहान वयात मधुमेह (डायबेटिस), हृदयविकार, कर्करोग वाढीला लागला आहे. महामारीमुळे आपल्या समाजातील या आणि या सारख्या अनेक त्रुटी समोर आल्या. त्यामुळे आपणच पुढाकार घेऊन आपली पृथ्वी आणि पर्यायाने आपले आरोग्य सुधारण्याचा मनापासून प्रयत्न सुरु करू. यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो - १. आठवड्यात किमान एकदा सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्टेशन) उपयोग करा. २. गरज नसेल तेव्हा आणि तिथले पंखे, दिवे बंद ठेवा. सौरऊर्जेचा वापर वाढवा. ३ प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) अन्न खाणे टाळा. घरी शिजवलेले ताजे सकस अन्न खा. ४ धूम्रपान सोडा. ५ प्लास्टिकचा वापर टाळा. पुनःपुन्हा वापरता येण्याजोग्या (Recyclable) म्हणजेच कागदाच्या, कापडाच्या पिशव्या वापरा. ६.पाण्याचा अपव्यय टाळा. घरगुती रसायने (केमिकल्स), तेल, पाण्याच्या स्रोतात मिसळू देऊ नका. ७. वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) काळजीपूर्वक हाताळा. वापरलेल्या सुया टोचल्याने कावीळ होऊ शकते. ८. सर्व प्रकारच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. वगैरे.

चला तर मग आपण आपल्या पुढच्या पिढीला शुद्ध, स्वच्छ, आरोग्यपूर्ण वातावरण देऊ या.

Comments

Popular posts from this blog

चित्रसाहित्य - अमळनेरचा दगडी दरवाजा

गृहलक्ष्मी