चित्रसाहित्य - दार

विदुला कोल्हटकर

सकाळी उठल्यापासूनच शिल्पाचा मूड फारसा चांगला नव्हता. चहा पिताना डोळे सारखे भरून येत होते..

‘समीरशी लग्न झालं आणि अमेरिकेत आले तेव्हा पहिले ५-६ महिने न्यू जर्सीमध्ये कसे छान गेले. पण मग त्याची बदली झाली ती इथे डुलूथमध्ये. मिनसोटाचं नाव पण कधी ऐकलं नव्हतं आणि आता या डुलूथ, मिनसोटामध्ये अगदी अडकून पडले आहे!’ शिल्पाच्या मनात आलं. येणारा हुंदका आवरत 'आज जाऊयाच!' असं तिने ठरवलं आणि समीरला सांगितलं. 'आता कोणाचा फोन नको यायला,' म्हणत पटकन आवरून गाडीत जाऊन बसली. निघून १५ मिनिटंच झाली असतील आणि फोन वाजला. व्हिडीओ कॉल. आईचा फोन, न घेऊनही चालणार नाही. "काय गं, गाडीत आहेस वाटतं? अशी कशी गं तू? आजच नववा लागला, त्यातून अमावस्या. म्हटलं होतं ना तुला बाहेर जाऊ नकोस? विसरलीस का?” आईने तर अगदी तोफच डागली. “मी तर तिथे नाहीच, शिवाय सासू, जाऊ, नणंद आम्ही कोणीच तुझ्याजवळ नाही म्हणून जास्त काळजी वाटते." सारवासारव करत आई म्हणाली तरी शिल्पाचा चेहरा पडलाच. "अगं आमच्याकडे अजून नाही लागली अमावस्या, इथे उद्या सुरु होणार आहे!" उसनं अवसान आणत शिल्पाने सांगितलं आणि जुजबी बोलून थोड्यावेळाने फोन करते म्हणून फोन ठेवला. चालता माणूस सोडाच, दुसरी गाडीदेखील नसणारा हा रस्ता. पक्षी नाहीत, फुलं नाहीत, कित्येक महिने अगदी पानं पण नाहीत. फक्त मैलोनमैल पसरलेला स्नो. दुपारीच पडायला लागलेला अंधार, उशिराने उगवणारा सूर्य, हा स्नो आणि जीवघेणी थंडी. बास, बास झाल हे सगळं. गाणी तरी ऐकावी म्हणून शिल्पाने स्पॉटिफायची बॉलिवूड लिस्ट उघडली तर गाणं तरी कुठलं लागावं तर 'शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है'. तिच्या मनात शंका कुशंकाचं वादळ उठलं. अमावस्या, नववा महिना, जास्त काळजी. थकून जाऊन तिने डोळे मिटले. तासभर झाला असेल. मिनियापोलीसमधल्या भारतीय रेस्टॉरंटपाशी आल्यावर "आलो गं आपण" म्हणत समीरने तिचा खांदा हलवत तिला उठवलं. 'हा! पाणीपुरी! किती आठवडे, किती महिने वाट बघितली!' उत्साहाने शिल्पा गाडीतून उतरून रेस्टॉरंटच्या दारापाशी आली आणि दारावरची 'बंद' पाटी वाचून जवळजवळ कोसळलीच. शेजारच्याच रेस्टॉरंटमध्ये बरीच गर्दी दिसत होती. पोटात कावळे ओरडत होते. इतक्यात कोणीतरी बाहेर पडलं आणि त्याबरोबर आलेल्या वासाने शिल्पाला आत खेचून घेतलं. भारतीय सोडून इतर कुठल्याच पद्धतीचं जेवण न चाखलेल्या शिल्पाला या मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये काय घ्यावं लक्षात येईना. समीरने काय काय मिळतंय ते बघून टॅको घ्यायचं ठरवलं.

टॅको आल्याबरोबर आलेला कोथिंबिरीचा वास, त्याच्याबरोबर आलेली टोमॅटोची कोशिंबीर आणि तांबूस घट्टसर चटणी पाहून ती खूश झाली. ती चटणी किंचित चाखून टॅकोवर घातली आणि पहिला घास घेताच ओळखीचे मसाले आणि त्याबरोबर आंबट, गोड, तिखट चवीची चटणी खाऊन ती अगदी तृप्त झाली. पोटभर खाऊन झाल्यावर तिने समीरकडे हसून बघितलं आणि म्हणाली, "एक दार बंद झालं की देव दुसरं दार उघडतो म्हणतात ते असं!"

Comments

  1. खूप खूप छान लिहिले आहेस विदुला

    ReplyDelete
  2. विदुला..मराठी वरचे प्रभुत्व कमी झालेले नाही.हे पाहून आनंद वाटला.गोष्ट जरा शांतपणे वाचून पुन्हा अभिप्राय देईल....छान उपक्रम..चालू ठेवा

    ReplyDelete
  3. Very nice interpretation of Daar

    ReplyDelete
  4. Yogini dahiwadkarJune 3, 2022 at 5:42 AM

    Nicely written. I can relate to this when I was very new to this country.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चित्रसाहित्य - अमळनेरचा दगडी दरवाजा

गृहलक्ष्मी