मराठी भाषा दिनानिमित्ताने
शारदा ग. सबनीस |
|
१९६९-७० सालची गोष्ट. अमेरिकेत नवीनच आले होते. मराठीपासून आणि मराठी माणसांपासून खूप लांब. मराठी बोलायला आणि ऐकायला मिळत नसे. त्याचा त्रास होत असे. तशी २-३ मराठी कुटुंबे ह्यांच्या ओळखीची होती, पण ती रहायला आमच्यापासून खूप लांब. तरीही मराठीच्या ओढीने ६०-७० मैल कारने जाऊन त्यांना भेटण्याची संधी आम्ही घालवत नसू.
पुढे टेलिफोन डिरेक्टरीच्या मदतीने मराठी आडनांवे शोधणे, त्यांना फोन करणे इत्यादि सुरु झाले. त्यातूनच पहिल्या सहलीची योजना ठरली. अश्या भेटीतून मराठी मंडळाची सुरवात साधारण १९७२ साली वॉशिंग्टन डी.सी.मध्ये झाली. आता तर दर छोट्या-मोठ्या गावात मराठी मंडळे स्थापन झाली आहेत.
अश्याच छोट्या सुरवातीपासून बृहन महाराष्ट्र मंडळाची (BMM) स्थापना झाली आणि दर दोन वर्षांनी त्याची अधिवेशने अमेरिकतल्या वेगवेगळ्या शहरात होऊ लागली. कोविडमुळे २ वर्षे थांबल्यानंतर आता ऑगस्ट २०२२ मध्ये न्यू जर्सीतल्या अटलांटिक सिटीमध्ये हे संमेलन भरणार आहे. ४-५ हजारांवर मराठी माणसं इथे जमतात आणि मराठी भाषेला उभारी येते.
आता तर प्रत्येक मराठी मंडळाच्या छत्राखाली मराठी शाळा सुरू आहेत. अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना त्यांना समजतील आणि आवडतील अशी शिकवण्याची साधनेही (टेम्प्लेट्स) आता उपलब्ध आहेत. इथे अमेरिकेत आपण आपापल्या परीने मराठी जोपासण्याची काळजी घेत आहोत. असेच मराठीचे संवर्धन व्हावे हीच इच्छा!
Comments
Post a Comment