युरेका क्षण!
मुग्धा मुळे |
सॉफ़्टवेअर डेव्हलपर आणि फ़ॅशन डिझायनर. |
बाल्टिमोर मराठी मंडळाने आयोजित केलेला पावनखिंड चित्रपट पहिला. जाताना मी, सासूबाई आणि आई गेलो होतो. चित्रपटाची गोष्ट आधीपासून सर्वश्रुत आहे. तरीही चित्रपटाने पकड घेतली ती शेवटपर्यंत.
पाहताना बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या/जाणवल्या. शिवाजी महाराज हे खरं तर आजपर्यंत होऊन गेलेले सर्वोत्तम उद्योजक आहेत, ज्यांनी शून्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं.
आताचे अडानी /अंबानी वगैरे उद्योजकांची त्यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. कारण अंबानी/अडानी पैशाने माणसे जोडतात/कामाला ठेवतात. महाराजांनी एका स्वप्नावर/शपथेवर जीव ओवाळणारे मावळे जमा केले. उपाशी पोटी धावून, नंतर असंख्य वार झेलत लढणारे मावळे बघितले. तसा उपाशी राहायचा प्रयत्न मी पण .. जाऊ दे.
मग विचार केला, की मी एक साधी सामान्य मुलगी (बऱ्याच वर्षांपासून माझे वय वाढतच नाहीये, पंचविशीतच अडकलेय!) नोकरी, संसार, काहीतरी छंद आणि गेला बाजार मित्रमैत्रिणींशी गप्पा, एवढंच माझं जग. मला हा चित्रपट बघून काय कळणार? खरं तर काय कळलं? महाराजांची कीर्ती, पराक्रम माहीत होते; मी श्रीमान योगी, छावा, जाणता राजा हे दोनदा तरी वाचले/पाहिले असतील. तरी सुद्धा चित्रपट पाहताना एक वेगळे शिवराय कळले/उमगले. ज्यांनी नुसते स्वप्नच पाहिलं नाही तर इतरांना त्यात सामील करून ते प्रत्यक्षातही उतरवलं.
इकडे साधा सॉफ्टवेअर कोड कम्पाइल झाला नाही तर मला त्याचा किती त्रास होतो. इथे तर शत्रूने वेढा दिलाय, जगू की मरू अश्या परिस्थितीमध्ये मावळ्यांचं अवसान गळालं असेल का? नखं कापताना चुकून थोडं जास्त कापलं गेलं तर मलमपट्टी करणारे आपण, शत्रूच्या गोळ्या/वार झेलत रक्ताने माखले तरी लढणारी, अविरत काम करणारी माणसं येतात कुठून? तर ध्यासातून.
मी मात्र ‘ही असं बोलली, ती बोललीच नाही' अश्या फालतू चक्रात फिरतेय. चित्रपटाने अश्या आणि तत्सम बिनकामाच्या चक्रातून बाहेर पडून काहीतरी कार्य करण्याचा पाठ दिला असं म्हणेन. प्रत्येकालाच काही महान /मोठे कार्य करता येत नाही. माझी तर तेवढी कुवतपण नाही. पण ज्या कामात आनंद मिळतो ते करायचे आणि कायम व्यापक दृष्टिकोन ठेवायचा प्रयत्न तरी करीन.
Comments
Post a Comment