दोन निरनिराळे दरवाजे, त्यांच्या मागे आणि पुढे काय काय घडतंय किंवा काय काय घडलं, दडलं असेल?
चला, कल्पनेवर स्वार होऊन पाहूया!
अरे! हे तर माझ्या कोकणातील घराचं दार! पाऊस असो की वारा, नेहमी उघडं. गेला महिनाभर पावसाने नुसता कहर मांडला होता. अश्या वेळी कपडे वाळवणं म्हणजे एखाद्या दिव्यातून जाण्यासारखंच. पण कालपासून थोडा बदल झाला आहे. आता पावसाची जागा उघड आणि झापेच्या लपंडावाने घेतलीय. आज उघडीप पडली पाहून, कपड्यांवर सूर्याची थोडीतरी कोवळी किरणं पडावी म्हणून कपडे बाहेर टाकले पण पावसाने एकाएकी आगमन करून थेंबाथेंबांच्या मोतीमाळा कौलांवरून सोडल्या.
हे मोती कपड्यावर गुंफले गेले आणि तारेवरती पसरले. टपटप आवाजाने मी माझा हात नकळत दाराबाहेर काढला आणि विखुरलेलया माळेचे छोटे छोटे मोती हातात अलगद पडत नाचायला लागले. कपडे ओले झाले त्याचं वाईट वाटत नाही, उलट मोत्याच्या माळेने त्यांना अजून सुंदर केलं आणि मातीच्या सुगंधाने त्यांना सुगंधित केलं. घरातले दिवे गेले आहेत, पण अंधार जाणवत नाही, कारण तारेवरचे मोती दिव्यांसारखे चमकत आहेत. जणू दिवाळी सजावटीची अभूतपूर्व भेटच निसर्ग देत आहे.
हा आमच्या पुण्याच्या घराचा दरवाजा. विविध पाटयांकरता प्रसिद्धी फक्त पुण्यानेच कमावली आहे. एके काळी श्रीमंत, गजबजलेला वाडा आज असा भग्नावस्थेत पाहून मन भरून आलं आहे. एके काळी सुंदर नक्षीकाम केलेल्या दोन दरवाज्याची जागा आता पत्र्याच्या दारांनी घेतली आहे. आतील भग्नतेला लपवण्यासाठी उचललेला त्यांचा विडा अपयशी पडल्याचं दिसत आहे. पण त्यांवर लिहिलेली अक्षरं जणू अजूनही सांगताहेत की त्या दारांमागे श्रीमंतीला दुरावलेल्यांना आश्रय देणारा वाडा अजूनही उभा आहे. ती अक्षरं ह्याची जाणीव येणाऱ्या-जाणाऱ्यांना करून देत आहे. गरीब की श्रीमंत या भेदात न पडता वाडा आपले कर्म उत्तम प्रकारे वर्षानुवर्षं करत आहे.
Comments
Post a Comment